‘स्व’चा शोध

0
170

सेल्फ मोटिव्हेशन
‘लाईफ इज ओन्ली ऍज गुड ऍज युवर माईंड सेट.’ कॉलेज लाईफमधल्या एका आवडीचा फायदाच होतो आहे. कॉलेजमध्ये असताना इंग्रजी, हिंदी, मराठी आणि संस्कृत भाषेतली सुभाषिते, कोट्‌स, कॅप्शन्‌स वाचायचे, लिहून ठेवायचे, बोलण्यात- लिखाण करताना वापरायचेे. पण वर लिहिलेले वाक्य एकदम अचानक आठवले ते काही दिवसांपूर्वी. झाले असे की, एका वकील मित्राला इतवारीमध्ये काही महत्त्वाचे काम होते. लंच टाईम होता आणि बर्‍याच महिन्यांत त्या भागात गेलो नव्हतो. इतवारीच्या त्या भूलभुलैया गल्ल्या कधीच समजल्या नाहीत. तेवढे जाणे पण होत नाही म्हणा. त्या कुठल्या तरी गल्लीतून जात असताना एकदम हाक आली- ‘‘अबे ओये सचन्या!’’ थबकलोच. कारण १९९० मध्ये हिस्लॉप कॉलेज सुटल्यानंतर बहुतेक पहिल्यांदाच ‘सचन्या’ ऐकत होतो. पाहिले तर माझा तेव्हाचा बी.कॉम.मधला मित्र दीपक होता. दोघांनाही प्रचंड आनंद झाला एकमेकांना बघून. मित्र म्हणाला मी जाऊन येतो तुम्ही बोला. दीपकच्या दुकानाच्या गल्ल्यावर बसून गप्पा सुरू झाल्या. डोक्याला चांगलेच टक्कल पडलेले (खरं सांगतो बरे वाटले की, माझ्यापेक्षासुद्धा कोणाचे मैदान साफ आहे जास्त हे पाहून.) पोट सुटलेले आणि आधीच्या उत्साहाने भारंभार असलेल्या त्याच्या चेहर्‍यावर थोडे निरुत्साही भाव. बोलताना तो म्हणाला की, तेच ते आयुष्य आता रटाळ झाले आहे. तीच दिनचर्या, तेच दुकान उघडणे, तेच ते शब्द, तीच ती उत्तरे वगैरे वगैरे. पण हेही लक्षात येत होते की, अनेक दिवसांनी कदाचित अनेक वर्षांनी पण असेल मनातली मळमळ बाहेर पडत होती. बोलू दिले न थांबवता… मित्राला फोन करून सांगितले कोर्टात निघून जायला.
मित्रांनो, ते बोलणे ऐकले, त्याला काही सांगितले. तो सगळं मनातले मळभ बाहेर काढून मोकळा झाला हे ठीक, पण विचार करताना असे लक्षात आले की, प्रत्येकाला केव्हा ना केव्हा ‘स्वयंप्रेरणे’ची, ‘सेल्फ मोटिव्हेशन’ची गरज असतेच. हे लक्षात ठेवायला लागते की, मन कधी ना कधी कच खाणारच, स्वत:वर प्रश्‍नचिन्ह लागणारच, आत्मविश्‍वास डळमळतो की काय ते वाटणारच. पण बॉस, माझे नेहमीचे तत्त्व- ‘जोर का झटका धिरे से लगे…’ असे काही होऊ शकते ही शक्यता कायम ध्यानात ठेवली तर आपण त्यातून लवकर सावरू शकतो स्वत:ला. आता दीपकचेच घ्या ना. १९९० च्या सुमारास बघितलेले तेच दुकान जवळपास तसेच त्याच स्वरूपात आणि त्याच स्थितीत… अगदी थोडाबहुत फरक केलेला.
मित्रांनो, बदल हा काळाचा नियम आहे. आपण आपल्या सर्व कक्षा, सर्व मर्यादा लक्षात घेऊन बदल हा स्वीकारायलाच हवा. हे लक्षात ठेवायला हवे की, तेच जुने रस्ते नवीन त्याच जुन्या वाटा नवीन ठिकाणे किंवा दरवाजे दाखवत नाही. आपले मार्ग बदलायला हवे, हे समजून घ्यावे लागते.
मला एक सांगा अगदी खरे खरे की, ज्या व्यक्तींवर आपण प्रेम करतो ती प्रत्येक व्यक्ती आपल्यावर तेवढेच आणि तसेच प्रेम करते का? उत्तर ते निश्‍चितच नाही असणार. म्हणून म्हणतो की कधी कधी(च) स्वत:वर पण प्रेम करावे. फक्त स्वत:वरच प्रेम करत राहिलो तर आपण स्वत:च करत राहतो. इतरांना आपल्यावर प्रेम करण्याचा मोकाच राहत नाही.
कर्तव्यपूर्ती करताना, अर्थार्जन करताना त्यात समरस होऊन गेलो तर आनंद तर मिळतोच, पण ते थोडे वेगळ्या प्रकाराने, थोडे कल्पकतेने पण करता येते हे सुचायला लागते. लोक त्यांच्यावरच विश्‍वास ठेवतात ज्यांचा स्वत:वर विश्‍वास आहे. जर आपल्याला माहीत आहे की, आपण जे करतो आहे ते योग्य आहे आणि त्याला पर्यायच नाही, अशा वेळेस आपल्या करण्यावर आणि आपल्या स्वत:वर शंका घेणे चुकीचे ठरते.
मित्रांनो, एक गोष्ट कायम ध्यानात ठेवायला हवी की, आपल्याला हवे ते तेव्हाच प्राप्त होते जेव्हा आपण ते मिळविण्याचा मनापासून आणि ते मिळेपर्यंत अविरत प्रयत्न करतो. प्रयत्न मधेच सोडून दिले तर साध्य होणार्‍या गोष्टी बर्‍याचदा अप्राप्य होऊन बसतात. मित्रांनो, जे साध्य करायचे असेल ते थोडे दूर असले तरी बेहत्तर, पण दृष्टिआड होता कामा नये.
बॉस, आपला दिवस कसा सुरू करायचा हे फक्त आपल्या हातात असते. त्यामुळे आपला माईंड सेट नेहमी ऍक्सेप्टिव्ह मोडमध्ये असायला हवा. मी करतो कारण मला माहीत आहे की, ते करावेच लागणार आहे तर ते मी रडतखडत का करावे? आणि तेही तेवढेच खरे की, जोपर्यंत आपल्याला कामाचा दबाव जाणवत नाही तोपर्यंत आपल्याला आपली क्षमताच कळत नाही. आणि एकदा जर का अशा प्रेशर्सना तोंड दिले की, मग पुढे आपण पण सहज टेंशन्स बेअर करू शकतो. कसं आहे मित्रांनो, जेव्हा आपल्याला रात्रीचा अंधार माहीत होतो तेव्हाच सकाळच्या उजेडाचे महत्त्व कळते. तसेच आपल्या आयुष्याचे असते. जेव्हा मनुष्य आयुष्यात कठीण दिवसांना सामोरे जातो, त्या दिवसांमध्ये न हरता त्यांना तोंड देतो तेव्हाच काही काळाने चांगले दिवस बघायला मिळतात. प्रत्येक रात्रीनंतर उष:काल असणारच, हे ध्यानात ठेवायलाच हवे.
कठीण समय आला की, शांत रहायला ज्याला जमते तो कुठलीही समस्या योग्य पद्धतीने समजून घेऊन सोडवू शकतो. बहुतांश वेळा आयुष्यामध्ये शांतपणाच अनेक प्रश्‍नांचे उत्तर ठरतो, तर स्मितहास्य सर्वोत्तम प्रतिक्रिया. माझा हा वाईट आज उद्या निश्‍चितच चांगला होणार, हे स्वत:ला कायम बजावयाचे. कारण हा विचारच आपल्याला स्वप्रेरणा देऊन चांगले फळ मिळण्यास मदत करतो. मी काही इक्वेशन्स तुमच्या समोर मांडतो. बघा पटतात का-
चांगला असो वा वाईट, भूतकाळात जायचेच नाही. वर्तमानातच जगायचा प्रयत्न करायचा.
माझ्याबद्दल कोण काय म्हणतात याचा खूप विचार न करता, पण आपल्याबद्दल वाईट बोलायला चान्सच मिळू न देता कार्यमग्न राहणे.
प्रत्येक गोष्ट ही काळानुरूप बदलते तसेच जीवनाचे पण आहे. दु:ख किंवा दुखणे पण कालांतराने जातातच. थोडा वेळ द्यावा लागतो. थोडी कळ सोसावी लागते.
अनुभवासारखा गुरू नाही. दु:खासारखा प्रशिक्षक नाही आणि चुकांसारखा मार्गदर्शक नाही. कठीण काळात जो चेहर्‍यावर हास्य जपू शकतो, टिकवू शकतो त्याला छेडायला प्रचंड साहस असावे लागते समोरच्यामध्ये.
मित्रांनो, प्रत्येकालाच स्वत:ची लढाई स्वत: लढावी लागते. इतर असतात सोबत पण स्वर्ग पहायला स्वत:लाच मरावे लागते आणि जो जिवाच्या आकांताने पण कुठेही विचलित न होता स्वत:ला आणि स्वकियांना सांभाळत संकटातून बाहेर पडतो अशाला पुन्हा कदाचितच संकटांचा सामना करावा लागतो. त्याला आलेला एकच अनुभव आयुष्याच्या यशाची गुरुकिल्ली देऊन जातो. बॉस, हसर्‍या चेहर्‍यामागे वेदना लपविणे ज्याला जमले त्याला भले भले पराभूत करू शकत नाही. ‘तुम इतना क्यूं मुस्कुरा रहे हो, क्या गम है जिस को छुपा रहे हो,’ असे म्हणत जाणून घ्यायला पण कुवत लागते, सामंजस्य लागते आणि ते सहज मिळतच नाही. हे सामंजस्य फारच विरळ आहे हो.
थोडी शिस्त, थोडे सामंजस्य, थोड्याहून थोडा जास्त आत्मविश्‍वास आणि प्रलोभनांकडे सहजपणे पाठ फिरवता येईल एवढा खंबीरपणा असला की, माणसाचा माईंड सेट प्रचंड मजबूत बनतो. अशा माणसांच्या मनात विकार येतच नाहीत आणि आले तरी तो ते सहजपणे बाहेर फेकू शकतो. आपण आपल्या कर्माने, वागण्याने, बोलण्याने, प्रतिक्रियांनी जे बीज आज रोवू त्याचेच फळ पुढे मिळणार आहे. तेव्हा ते आपल्यालाच ठरवायचे आहे. आजची परिस्थिती थोडी बिकट आहे म्हणून काय झाले हेही दिवस जाणारच आहेत, हा विश्‍वास बाळगत कामाला लागले तर कळत पण नाही की, चांगले दिवस सुरू पण झालेत. आजची परिस्थिती मग ती चांगली असो वा वाईट, कायम तशीच राहणार नाही हे लक्षात ठेवायला हवे आणि त्याचे भान पण हवे.
जी व्यक्ती स्वत:शी प्रामाणिक नाते जोडते, स्वत:च्या चुकांचे समर्थन करत नाही त्या व्यक्तीकडून उत्तम नात्याची आपोआपच अपेक्षा असते. नात्यातला प्रामाणिकपणा, मग ते नाते कुठलेही असो, सारखी गोड गोष्ट कुठलीच नाही. प्रत्येक कृती करायच्या आधी त्यात अहंकार तर नाही ना, त्यात कुणी दुखावले तर जाणार नाही ना, कोणाचे नुकसान तर होणार नाही ना याच्या विचाराची सवय असणे आवश्यक आहे. सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण मग ही चांगली सवय आपोआपच अंगवळणी पडते.
मित्रांनो, स्वत:तल्या ‘स्व’ला ओळखा. त्यातून अहंकार, द्वेष, ईर्षा आणि स्वार्थ यांना जाणीवपूर्वक बाहेर काढायचा प्रामाणिक प्रयत्न करा. तुमच्यासारखा आनंदी, अजेय, अतुल्य, अजिंक्य दुसरा कुणीच राहणार नाही.
– ऍड. सचिन नारळे/९४२३१०४००३