भारतीय धर्मसंस्कृतीच विश्‍वशांतीला प्रेरक

0
87

प्राचीन काळापासून धर्म हा मानवजीवनाचा अत्यावश्यक भाग झाल्याचे आपणाला दिसून येईल. पृथ्वीवर अस्तित्वात असलेल्या मानवजातीपैकी एखाद् दोन टक्के लोकच धर्म न मानणारे असतील. परंतु, या दोन टक्के नास्तिकांनाही धर्माने सांगितलेल्या नीतिनियमांचे पालन करावे लागते, अन्यथा एवढ्या मोठ्या धर्मवादी समाजात जगणे त्यांना सोपे गेले नसते. खरे तर धर्म ही नैतिकतेची शिक्षा देणारी व आध्यात्मिकतेची किनार असणारी सर्वात मोठी मानव कल्याणकारी संस्था आहेे. धर्माचा खरा अर्थ ‘धारण करणे’ असा होतो. समाजात शिस्तबद्धता, सुरक्षा, शांतता व एकात्मता निर्माण करण्यासाठी जी नैतिकमूल्ये धारण करतो, त्यालाच आपण धर्मसंस्था असे म्हणतो. समाज हा सुचारूपाने चालण्यासाठी त्याला कायदे व नीतिनियम घालून देणे आवश्यक असते. अन्यथा समाजात ‘बळी तो कानपिळी’सारखी परिस्थिती निर्माण होऊन, समाज अराजकतेकडे वाटचाल करू लागतो. सामूहिकदृष्ट्या समता, बंधुत्व व एकात्मतेमुळे समाज बळकट व संघटित होत असतो. अशा समाजबांधणीकरिता समाजातील सुज्ञ व प्रभावशाली लोकांनी नैतिकतेची शिक्षा देणारी व आध्यात्मिक कल्याण साधणारी धर्म ही संस्था निर्माण केली, जी संस्था संपूर्ण समाजाला एकत्रित बांधून ठेवण्यास कारणीभूत ठरलेली आपण पाहतो. परंतु, अशी संस्था जेव्हा काही चतुर व धूर्त लोकांच्या हातचे बाहुले बनते तेव्हा दुर्बलांचे कसे शोषण होते, ते आपण इतिहासकाळात बघितलेच आहे.
जगातील कोणत्याही धर्माची मूळ विचारधारा ही मानवतेचा उद्धार करणारी असते. परंतु, समाजातील प्रभावशाली गटाने याचा वापर आपल्या स्वार्थासाठी केल्यास समाजातील एकात्मतेस तडा जातो, हेही तेवढेच खरे आहे. यामुळे धर्माचा खरा मानवतावादी दृष्टिकोन बाजूला पडून समाजातील दुर्बल घटकांवर अन्याय व अत्याचार होण्यास सुरुवात होते. अशा धर्मातील धूर्त धर्माचार्य व सत्ताधारी वर्ग आपल्या स्वार्थपूर्तीसाठी समाजात जातीय उतरंड निर्माण करतो व आपल्या सोयीनुसार कायमची दुही निर्माण करून ठेवतो. ही परिस्थिती आपल्या भारतीय उपखंडात मोठ्या प्रमाणावर झालेली दिसेल. परंतु, जगातील इतर देशांतील धर्ममार्तंड व सत्ताधार्‍यांनी मानवतावादी विचारांचा प्रचार व प्रसार करण्याऐवजी सत्ताकांक्षा व धर्मवाढीसाठी हातात शस्त्र घेतलेल्या धर्मयोद्ध्यांची निर्मिती करून जगात नरसंहार घडवून आणला. या सत्तापिपासूंनी धर्मपरायण प्रचारकांना प्रेमाचा संदेश देण्याकरिता प्रेरित करण्यापेक्षा त्यांच्याकडून धार्मिक उन्माद निर्माण केल्याचेच दिसून येते. धर्ममार्तंडांनी व शासकांनी आपले वर्चस्व कायम ठेवण्यासाठी लवचीक व सदाचारी धर्मनियमांना कर्मठ बनविण्याचेच कार्य केले. जगातील प्रत्येक धर्मसंस्थापकांनी आपल्या अनुयायांना शांती व मानवतावादाचा पाठ दिला, परंतु त्याच्या उपदेशांचे अनुकरण करण्यापेक्षा त्या महान द्रष्ट्या पुरुषांना अनुयायांनी चार भिंतीत बंदिस्त करून त्यांच्या विभूतिपूजनातच धन्यता मानण्याचे एकमेव कार्य केलेले दिसते. अशा महामानवांच्या मानवतावादी विचारांनाही या अनुयायांनी या चार भिंतीच्या आतच मूठमाती दिली, असे म्हणावे लागेल. धर्मग्रंथातील मानव कल्याणकारी उपदेशांचा आपल्या सोयीनुसार अर्थ लावून, समाजमनाला चमत्कार, अंधश्रद्धा, कर्मकांड व भाग्यवादाच्या खाईत लोटले व समाजातील विचारस्वातंत्र्याला कुंठित करून त्यांना धर्मशास्त्रात बंदिस्त करून टाकले. ज्यामुळे समाजातील विचारप्रवाह धार्मिक अंधश्रद्धेच्या कुचक्रातून बाहेर न पडल्याने समाजाला साचलेल्या डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले. याचे फलित म्हणजे मागील कित्येक शतके जग वैज्ञानिक, औद्योगिक व तांत्रिकदृष्ट्या माघारले. धर्मश्रद्धा जेव्हा अंधश्रद्धा बनू लागतात तेव्हा सॉक्रेटिस, प्लुटो, रुसो, कार्लमार्क्स व आद्य शंकराचार्य यांसारखे परिवर्तनवादी महापुरुष जन्माला येतात. परंतु, इतिहासाचा अभ्यास केला असता असे दिसून येते की, अंधश्रद्धेने पछाडलेल्या समाजाला महान संत-महात्मे व विचारवंतही आपल्या उपदेशांनी पूर्णपणे बदलवू शकले नाहीत. असा प्रयत्न प्रत्येक धर्मातील मानवतावादी व पुरोगामी धर्मपंडितांनी केलेला आहे. मग ते हिंदू संत-महात्मे असो, की इस्लाम धर्मातील सूफी संत असो किंवा ख्रिश्‍चन धर्मातील उदारमतवादी व पुरोगामी धर्माचार्य असो. या सर्वांचा धार्मिक कट्टरवाद्यांनी पाला-पाचोळाच केलेला आपल्याला आढळून येईल.
संपूर्ण जगात काळानुसार राजकीय, सामाजिक व औद्योगिकदृष्ट्या मोठे परिवर्तन घडून आल्याचे आपणास दिसेल. परंतु, कालबाह्य झालेल्या धर्मश्रद्धेत किंवा आचार-विचारात कोणतेही बदल झालेले आढळत नाही. धार्मिक नियमात परिस्थितीनुसार लवचीकता येण्यापेक्षा त्यात कर्मठताच जास्त आली व धर्मश्रद्धांना हळूहळू अंधश्रद्धेचे स्वरूप प्राप्त झाले. त्यातही काही धर्मांत तर याला धर्मांधतेची धार आलेली दिसून येते. खरे तर भौतिक जीवन सुखी करण्यासाठी त्याला अध्यात्माची जोड देणारा खरा व्यावहारिक मार्ग गौतमबुद्धांनी पहिल्यांदा समाजाला आपल्या पंचशील तत्त्वांद्वारे सांगितला. परंतु, कालांतराने बुद्धांचे अनुयायीच त्यांच्या महान शिकवणुकीपासून दूर गेल्याने, त्यांना सांसारिक व आध्यात्मिक मार्गाचा समन्वय साधता आला नाही. अशा बुद्धिवादी व पुरोगामी धर्माचा त्याच्याच जन्मभूमीतून हळूहळू र्‍हास होत गेला, ही अत्यंत दु:खदायक घटना म्हणावी लागेल. जगातील बहुतेक धर्मांचा अभ्यास केल्यास असे आढळून येते की, धर्म एकदा धर्ममार्तंड व सत्ताधारी यांच्या हातात एकवटत गेला की, अशा समाजात वर्गभेद निर्माण करून समाजधुरिणांना त्यांच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे जाते. परंतु, असा असंघटित समाज कालांतराने कमकुवत होत जातो व अशा विभाजित समाजाला पराजित करून परकीय शक्ती आपली सत्त प्रस्थापित करते, हे आपण अनेक देशांतील संस्कृती कशा नष्ट झाल्या याचा अभ्यास केल्यास दिसून येईल. जगातील दोन धर्मांतील अनुयायांनी तर एका हातात धर्मग्रंथ व दुसर्‍या हातात शस्त्र घेऊनच धर्मप्रसार व सत्ता स्थापन केलेली दिसून येईल. या धर्मयोद्ध्यांनी अमाप कत्तली घडवून आणल्या व धर्मप्रसाराच्या नावाखाली प्रत्यक्ष मानवतेलाच आपल्या पायाखाली चिरडले. याचा फटका मोठ्या प्रमाणात भारतालाही बसला. परंतु, भारतीय संस्कृती जगातील एकमेव संस्कृती आहे, जी राजकीयदृष्ट्या कित्येक शतके गुलाम राहूनही सामाजिक, धार्मिक व सांस्कृतिकदृष्ट्या तिला कुणीही नष्ट करू शकले नाही. याला एकमेव कारण म्हणजे धार्मिक सहिष्णुता व सर्वांना सामावून घेण्याची प्रवृत्ती. भारतीय संस्कृतीत अनेक धर्मांची निर्मिती झाली, परंतु प्रस्थापित धर्माने नवीन निर्माण झालेल्या धर्मावर हिंसक अत्याचार केल्याचे आढळत नाही किंवा नव्याने उदयास आलेल्या धर्मानेही आपल्या उत्कर्षाच्या काळात वैदिक धर्मावर अत्याचार केल्याचे प्रमाण नाही. वैचारिक मतभेदाला कधीही रक्तलांच्छित स्वरूप आल्याचे दिसत नाही. उलट, वैदिक धर्माने जैन व बौद्ध धर्मातील कित्तेक तत्त्वविचारांचा सन्मान करून त्यांचा अंगीकार केला. या धर्मसमन्वयामुळेच जगातील इतर धर्मांत जो नरसंहार झाला तो येथील धर्मांतर्गत झाल्याचे आढळत नाही. अनेक धर्मविचारी समाज एकाच संस्कृतीत इतक्या गुण्यागोविंदाने नांदताना आपल्याला जगात कुठेही दिसणार नाही.
भारतीय शासकांनी कुठेही सत्ता स्थापित करताना धर्माचा दुरुपयोग केलेला दिसत नाही. सत्तस्थापनेत धर्माचा वापर परकीयांच्या स्वार्‍यांपासून सुरू झाल्याचे आढळते. शक, हूण, कुशाण यांनी अहिंसावादी बौद्धधर्माला सर्वप्रथम लक्ष्य केले, परंतु त्यांनी त्याकरिता कोणत्याही धर्माचा आधार घेतला नाही. मात्र महंमद बिन कासीमच्या स्वार्‍यांपासून इस्लाम धर्माने सत्ताप्राप्तीला धर्मद्वेषाचे स्वरूप दिले. केवळ धर्मांधतेतून नालंदा व तक्षशिला येथील बहुमूल्य ज्ञानसंपदा नष्ट करून भारतीय प्राचीन साहित्यक्षेत्राची फार मोठी हानी केली. परंतु, अशा धर्मांध सत्तापिपासूंना प्रखर विरोध करून धर्मसंस्कृतीचे रक्षण भारतीय समाजाने चिवटपणे केले, हेही जगातील एक महान आश्‍चर्यच म्हणावे लागेल. या चिवटपणामुळेच भारतीय आपले अस्तित्व कायम ठेवू शकले. जगात आजही काही धर्मांध अनुयायांनी धर्माच्या आधारावर दहशतवाद मांडला आहे. परंतु, भारतीय धर्मसंस्कृती ही आपल्या शांती व मानवतावादाच्या भूमिकेवर ठाम असल्याचे दिसून येते. वैदिक संस्कृती ही जगातील पहिली सनातन संस्कृती आहे जिने ‘सर्वे सुखिन: सन्तु…’ असा उद्घोष सर्वप्रथम करून विश्‍वकल्याणाचा संदेश दिला. याचाच पुनरुच्चार भारतीय संस्कृतीतील प्रत्येक धर्माने केलेला आपणाला आढळून येईल. त्यामुळे जगात खरोखर शांती प्रस्थापित करायची असेल, तर मानवतावादाचा खरा पुरस्कार करणारी भारतीय धर्मसंस्कृती हाच शेवटचा पर्याय आहे, हेही तेवढेच खरे…!
– श्रीराम पत्रे
९४२३४२५५७०