अमूर्तातून मूर्ताकडे

0
168

श्रद्धा हा मानवाचा विशेष. आदिम काळापासून मानवाच्या सोबतच श्रद्धेचाही प्रवास विलक्षणच. मानवाला निरंतर आपली श्रद्धा व्यक्त करण्याचं अधिष्ठान निर्माण करावं वाटतं. आपली श्रद्धा-आपली भक्ती मानवानं भव्यतेच्या परिमाणानं उत्कट कलेच्या माध्यमातून साकार केली. प्राचीन काळापासून निसर्गपूजन, अग्निपूजन आणि मग निर्गुण निराकारापासून ते सगुण साकारापर्यंत या श्रद्धेनंही स्थित्यंतरं अनुभवली.
श्रद्धेची अधिष्ठानं मोठ्या कलात्मक लयीत बांधून मानवानं चिरंतन केलीत. श्रद्धेचं हे साकार रूप सिद्ध करायला,या सार्‍या अमूर्तातून मूर्त साकारायला मानवानं आधार घेतला तो दगडाचा. दगडातून काही व्यक्त व्हावं हे कठीणच. पण अव्यक्त दगडाची भाषा माणसाला समजली. यातून जे व्यक्त झालं ते थक्क करणारं. अत्यंत सुंदर आणि सौंदर्यशाली प्रतिमा साकार झाल्या. भव्य देवालयं आणि तेवढीच भव्य कलापूर्ण अशी त्यांची शिखरं. कल्पनेच्याही कक्षेत येणार नाहीत असे प्रचंड गड कोट किल्ले. त्याही पूर्वी साकार झाली शैलगृहं, कुठं एखादं तर कुठं दोनतीन तर कुठं असंख्य शैलगृहं- लेण्या, जणू एखादी नगरीच. असे समूह शैलगृहांचे केवळ दगडांतून आकारा आलेले आणि अत्यंत सुंदर कलाकृतींनी सजलेले. हे सारं साकार व्हायच्या आधीच दिसलं असेल माणसाला- कलावंताला. जिथं काहीच नाही अशी जागा, मोकळा आसमंत, तिथं मानवानं मानवी इतिहासातली सर्वोत्कृष्ट कला निर्माण केली. या निर्मितीमागची त्याची प्रेरणा कोणती? त्या निर्मितीतून होणार्‍या सौंदर्याचा साक्षात्कार करून देणारी उत्कटता आली कुठून? आणि अशी दिव्य निर्मिती करून नंतर आपलं नावही मागे न ठेवण्याचं निर्मोहीपण माणसानं कसं मिळवलं? सारे प्रश्‍न मानवानं निर्मिलेल्या भव्य कलाकृतीपुढचे. प्रश्‍नांकडून उत्तराकडे असा रूढ प्रवास नाकारणारे प्रश्‍न. त्या सार्‍या कलाकृती बोलावून ओढून नेतात कुठल्याकुठं आणि मग त्या कलाकृतींना शरण जाण्याशिवाय त्याच्यापुढे नतमस्तक होण्याशिवाय दुसरा पर्यायच नसतो. त्या शतकानुशतकं उन्ह, वारा, पाऊस झेलणार्‍या दगडांना शरण गेलं की थोडं का होईना पण त्यांचं अंतर्मन मोकळं होतं. दगडांच्या राशीतला एखादा अनवट दगड लक्ष वेधून घेतो आणि त्या कलाकृतीचं अंशभर रहस्य उलगडल्यासारखं वाटतं. जाणवतं की या सार्‍यामागे आहेत आकार. या सगळ्या दगडांनी मिळून जे साकार केलंय त्यामागे मूळ प्रेरणा त्या आकाराची.तो आकार ज्या कलावंताला दिसला असेल तो धन्य. त्या केवळ दिसलेल्या जाणवलेल्या आकाराचं मूर्तरूप त्यानं जो ध्यास घेतला ती खरी उत्कटता आणि जे जाणवलं ते त्या दगडातून साकार करण्याचं आत्मिक समाधान. या समाधानातूनच आलं असावं निर्मोहीपण.
जन्मापासून साथ करणार्‍या सार्‍याच अमूर्तावर मानवानं प्रेम केलं.त्या अमूर्तावर मानवपणाचं आरोपण केलं आणि निर्मिल्या त्या अमूर्ताची आराधना करण्यासाठी हजारो प्रतिमा. त्या प्रतिमांना विलक्षण सुंदर केलं. या मूर्तरूपाकडे पाहिलं की या रूपाला साकार करणारा जो आकार त्याला दिसला असेल तो किती मंत्रमुग्ध करणारा असेल हे समजतं. प्रत्येक कलाकृती साकार करताना त्या माणसाच्या-कलावंतांच्या डोळ्यांपुढे असणार्‍या किंवा त्याला जाणवणार्‍या त्या आकाराचा माग थेट शैलगृहापर्यंत जाऊन पोचतो, जेव्हा मानव रहात होता नैसर्गिक गुहांमध्ये. मानवानं जगात पहिल्यांदाच शैलगृह निर्माण केलं, असेल तेव्हा नेमका कोणता आकार त्याच्या नजरेसमोर असेल? निर्माण होणार्‍या प्रत्येक कलाकृतीमागे या अशा आकाराआकाराची एक निश्‍चित प्रेरणा असतेच. कलाकृती निर्माण व्हायच्याही आधी, तिचा संपूर्ण आराखडा, संपूर्ण दृश्यरूप वगैरे सर्व बाबी स्पष्ट व्हायच्याही आधी, ती कलाकृती कशी असेल हे कळण्याच्या आधी त्या कलाकृतीच्या निर्मितींच्या कोणत्याही शक्यतेच्या आधी या सगळ्याच बाबी प्रभावित करणारा एक आकार असतो.
एखादा विचार यावा डोक्यात सहजच आणि ठाण मांडून बसावा डोक्यातच तसा सहज जाणवतो आकार एखाद्या कलावंताला. मग तो साकार-सिद्ध करायचा उरलेल्या आयुष्याचं मोल देऊन यापेक्षा दुसरा कोणता पर्यायच असत नाही कलावंताच्या आयुष्यात. जाणवून गेलेल्या अमूर्त आकाराआकाराचा मग तो ध्यास घेतो आणि तो आकार साकार करण्याचा प्रयत्न करतो. यातूनच आज सर्वत्र सर्वश्रेष्ठ कलाकृती निर्माण झालेल्या दिसतात.
प्राचीन लेण्या, मंदिरं अभ्यासताना-अनुभवताना ही आकाराची संकल्पना अधिक स्पष्ट होते. मंदिर हा एक संपूर्ण आकार गृहीत धरला तरी तो संपूर्ण एकसंध असा आकार असत नाही. पायापासून ते शिखरांपर्यंत मंदिरात अनेक छोटे छोटे आकार स्वतःचा आकार संपूर्ण विलीन करून एकत्वानं नांदत असतात, एक संपूर्ण मंदिर साकार करत असतात. हे असे अनेक छोटे छोटे आकार असंख्य दगडांतून साकार झालेले असतात. प्रत्येक दगडावरची नक्षी, स्तंभ, तुळया असे अनेक आकार स्वतंत्रपणे एकेक संपूर्ण आकार असतात पण त्यांचं प्रयोजन एका मोठ्या आकाराआकारासाठीच असतं.जिथं मंदिर आहे तिथं मंदिराच्या पूर्वी काय होतं? तर संपूर्ण मोकळा आसमंत. हा आसमंत बंदिस्त करायचा, एका कोणत्यातरी सूत्रबद्ध विकास पावणार्‍या आकारात. बरेचदा आधी मंदिर निर्मितीची योजना आणि मग स्थाननिश्‍चिती असंही घडत असेल तरी मंदिराचा आकार गृहीत धरायला आसमंत आवश्यकच. या आसमंतात या मोकळ्या जागी मूदिराचं निर्माण स्फू रल्यानंतर ते प्रत्यक्ष कसं असेल हे जाणवणं, निर्माणानंतर त्याचं दृश्यरूप कसं असेल हे प्रत्यक्ष निर्माणाआधी जाणवणं, जे जाणवलं ते त्यानत्यानुसार निर्माण करायचा प्रयत्न करणं, जे प्रत्यक्ष नाही केवळ कल्पनेत आहे ते साकार करणं हे सारं होत असताना त्यामागे जे सूत्र असते तो असतो ‘आकार.’ हा आकार जाणवला नाही, स्फू रला नाही तर पुढे होणारी संपूर्ण निर्मिती सूत्रहीन होते. केवळ दगड कोरले, क्रमानं संगतवार नक्षी कोरली, स्तंभ तयार केले, गर्भगृहाची शिखराची सिद्धता केली आणि एक रचना केली असं या भव्य दिव्य कलाकृतींबाबत निश्‍चितच झालं नसावं. नाहीतर आजवर त्या एवढ्या सामर्थ्यानं सौंदर्याची पखरण करत राहिल्या नसत्या.
कलेच्या आणि निष्ठेच्या जोरावर उत्कटतेनं त्या अनाम कलावंतांनी त्यांना जाणवलेल्या अमूर्त आकारांना मूर्त रूप देऊन अजरामर कलाकृती निर्माण केल्या. आज ते धन प्राचीन झालंय. ती दृष्टी उरली नाही पण ते संचित अबाधित आहे. हे मूर्त रूप पाहून त्या अमूर्ताचा वेध अशक्यच. अमूर्ताचा वेध घेऊन साकारलेल्या असंख्य कलाकृती आज उपेक्षेमुळे पुन्हा अमूर्ताची वाट चालू लागल्या आहेत.
– संजीव देशपांडे
९०१११६५०७९