आठवणी

0
185

नभातला चंद्रमा नभात राहिला
नंदादीप एकटा काळोखात राहिला
चित्र रंगवू तरी कसे फुलांचे?
चेहरा माझाच ऐन्यात राहिला?

आभाळातला चंद्र आभाळातच आहे. दूर कोठेतरी एखाद्या डोंगरावरील काळोख्या मंदिरात निरामय नंदादीप जळत असतो. आपण आपल्या सुखाची स्वप्ने रंगवत इतक्या पुढे जातो की, आपल्याला आपल्याच सुखाचा आस्वाद घेता येत नाही. कारण आपला नैसर्गिक चेहरा मागे ठेवून कृत्रिम आवेगाने आपण कागदावरल्या फुलांचा सुगंध शोधत रहातो. आपल्या जिवंतपणाचा स्रोत, आपल्या प्रगतीची प्रेरणा मागे कुठेतरी दूरवर अज्ञातासारखी राहून गेलेली असते. आपण आयुष्याच्या वाटेवरचा एकाकी प्रवास करून थकतो. कदाचित त्या वेळी आपल्याला एकटेपणाची जाणीव होते. प्रवास म्हणजे परिवर्तन, बदल, अज्ञाताची आनंददायी अनुभूती. उभ्या आयुष्याच्या वाटेवर प्रवास करताना नियती जेव्हा आपल्याला व्यक्त होण्याची संधी देते, तेव्हा आपली साद टिपण्यासाठी कुणाची तरी सोबत हवी असते.
शाळेचा पहिला दिवस. पावसाळ्यातील एक रात्र. चांदण्या रात्रीची सहल. असे काजव्यांच्या मिठीतून सोडवून घेतलेले क्षण तरुणपणात जेव्हा आपण आपल्या भावी जोडीदाराच्या ओंजळीत टाकतो तेव्हा आपल्या नजरेसमोर पसरलेले आयुष्याचे वाळवंट आल्हाददायक वाटायला लागते. आयुष्याचा प्रवास सुकर होतो. वाघळांनी चोचीने आम्र डहाळीवरील आम्रफळांचा सौंदर्यासहित गोडवा वाढवावा तसे संसारिक वाद जगण्याचा गोडवा वाढवतात. पण या वादाचे वादळात रूपांतर झाले की, आयुष्य विस्कटून जाते आणि रिकाम्या दोन हातांनी आभाळ पेलण्याची वेळ येते.
घटस्फोटाच्या उंबरठ्यावर उभे असताना आपण आपल्याच हृदयाच्या स्पंदनांना एकदा संधी दिली पाहिजे. घटस्फोट हा पती आणि पत्नी यांच्या विचारांचा संयुक्त पूर्णविराम कधीच नसावा. एकमेकांना आपापल्या आयुष्यातून वजा करणारे हे गणित वाटते तेवढे सोपे नाही. आपापल्या रस्त्यांच्या कडेला प्रश्‍नाचे पीक आले की, चालताना उत्तरांचा सखा शोधून उपयोग नसतो. त्यापेक्षा एकमेकांच्या आयुष्यातील गाळलेल्या जागा जर प्रत्येकाने स्वयंस्फूर्तीने भरल्या तर आयुष्य व्यतीत न करता आनंदाने जगता येईल. अपवादात्मक परिस्थितीमध्ये घटस्फोटाची अपरिहार्यता असेल ती परिस्थिती वगळून सामान्यत: एकमेकांची मने सांधल्या गेली पाहिजेत.
या जगात एकटेपणासारखे दुसरे दु:ख नसावे. म्हणून आयुष्याचा जोडीदार निवडल्यानंतर तो त्याच्या अधिक उण्यासहित जसा आहे तसा स्वीकारल्यास एकमेकांचा अपेक्षाभंग होणार नाही आणि एकमेकांच्या अपेक्षांचे ओझेही जाणवणार नाही. महत्त्वाचे म्हणजे आपण जसे आहोत अगदी तसेच नैसर्गिकपणे आपल्या आयुष्याच्या जोडीदाराशी सामोरे गेले पाहिजे. कारण आपल्याजवळ जे नाही किंवा आपल्याला जे येत नाही ते दाखविण्याचा प्रयत्न केल्यास शेवटी दु:खच वाट्याला येऊ शकते.
घरापासून कार्यालयापर्यंत आणि कार्यालयापासून घरापर्यंत रोज आपल्या कानांवर फक्त गडबड आणि गोंगाटच पडतो. पण एखाद्या दिवशी तुमच्यापासून काही कारणाने दूर गेलेल्या तुमच्या जिवलगाचा आवाज कडे कपारी भेदून तुमच्यापर्यंत पोहोचला तर आश्‍चर्य वाटायला नको.
– दत्तप्रभू ताकतोडे
८३८०९८७३६७