तरुणाईतील फॅशन : एक चिंतन

0
189

एक काळ होता, जेव्हा साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे वाक्य पुस्तकात तर वाचावयास मिळत होतेच, पण त्याचबरोबर ते अनुकरणात देखील उतरलेले अनुभवास येत असे. निसर्गाच्या सान्निध्यात राहाणारा मानव हा समाज जीवनात सर्वसाधारणपणे उदात्त तत्त्वांचा अंगीकार करण्याचा प्रयत्न करत साधे जीवन जगत असे. वस्त्रांवरून व्यक्तिपरिचय होणे तसे अवघड काम त्या काळी नव्हते.
आज आधुनिकतेच्या नावाखाली मानवी जीवनात फार मोठ्या प्रमाणात बदल झालेले जाणवतात.
बदल आपल्याला पदोपदी पाहावयास मिळतो. खरं तर हा नखशिखांत झालेला बदल बर्‍याच अंशी अंधानुकरणातून झालाय्, हे बर्‍याचदा जाणवते.
तरुणींप्रमाणेच आजकाल बर्‍याच तरुणांच्या केशरचनेत झालेला फार मोठ्या प्रमाणातील बदल पाहणार्‍यास कधीतरी सुखावह तर बर्‍याचदा हास्यास्पद ठरतो. सरतेशेेवटी स्टाईल म्हणून समोर येणार्‍या प्रकाराकडे पाहावे लागते. औद्योगिक क्रांतीचा परिणाम मानवी जीवनात फार दूरगामी झालेला जाणवतो. ज्यामुळे मानवी जीवनात बर्‍याच आराम प्रदान करणार्‍या वस्तूंचा प्रवेश तर झालाच. पण त्याचबरोबर बर्‍याच शब्दांचे अर्थ देखील बदललेले आपण पाहू शकतो. अगोदर वस्त्रांचा उपयोग उन्ह, वारा पाऊस यापासून शरीराचे रक्षण आणि लज्जा संरक्षण हा अभिप्रेत होता. आजकाल मात्र वस्त्रांचे विविध प्रकार आणि कितीतरी फॅशन यांचा बाजारातील प्रवेश पाहतो आहे. या फॅशनमुळे वस्त्रपरिधानाचे अर्थ देखील बदलेले आपल्या लक्षात येते. ज्यात प्रदर्शनाला फार महत्त्व प्राप्त झालेले अनुभवास येते.
केशरचना वस्त्रपरिधान शरीरावर नक्षीकाम करून घेणे ज्याला टॅटू म्हणून संबोधले जाते. या बाह्य बदलांसोबतच काही सवयींच्या अंगीकाराला आज फॅशन हे नाव प्राप्त झालेले पहावयास मिळते. जसे चौकातील एखाद्या पानटपरीवर सिगारेटचे झुरके घेत त्याच्या घातक धुराचे वलय तयार करणे. ज्या बाबींची नोंद कधी एके काळी व्यसनात होत होती ती तरुणाईमध्ये आज फॅशन म्हणून केलेली पहावयास मिळते.
चित्रपटाचा समाजजीवनावर फार मोठा प्रभाव असलेला अनुभवास येतो. किंवा समाजात जे दिसते ते चित्रपटांमध्ये पाहावयास मिळते. तरुण-तरुणींचे घर सोडणे, प्रेमविवाह या बाबीदेखील आज फॅशन म्हणूनच पाहिल्या जातात, ज्यात आता वेगळेपण काही समाजाला वाटेनासे झाले. चित्रपट आणि वास्तव यातील फरक फार मोठा असतो हे वेळीच लक्षात आले, तर जीवनातील चुका टळून जिवाभावाचे रक्तसंबंधाची जपणूक केल्या जाऊ शकते.
आधुनिकतेचा विचार फक्त फॅशनपुरता मर्यादित राहाता कामा नये. मानवी मनात बंधुभावाची भावना जागृत होऊन भेदाभेदाच्या श्रुखंला तुटून आपुलकीचे संबंध प्रस्थापित होणे म्हणजे खर्‍या अर्थाने वैचारिक आधुनिकता. कुठलीही फॅशन करत असताना आपण कुणाचे अनुकरण करत आहोत, याचा विचार होणे गरजेचे असते. जसे ते पाश्‍चात्त्यांचे अनुकरण असेल, तर त्यांच्या प्रदेशात हवामानात आणि आपण राहातो, तिथल्या नैसर्गिक प्रदेशात बरेच अंतर आहे हे लक्षात घेणे गरजेचे आहे. त्यामुळे एखादेवेळी त्यांच्या बाह्य पेहेरावाच्या अनुकरणापेक्षा त्यांची विज्ञाननिष्ठा, वक्तशीरपणा, शिस्त, जिज्ञासा, चिकाटी या अंगभूत गुणांचा स्वीकार करणे प्रगतिपथाकडे नेणारे ठरू शकते. अशा गुणांचा स्वीकार करून ते कृतीत आणण्याची फॅशन लवकरात लवकर समाजात येणे हे सर्वहिताचे ठरू शकेल.
– गजानन मोहन गिरी/९८२२८९७४९३