मधल्या वेळेत

0
175

प्रत्येकाच्या अंगी मुळातच काही कला असतात. पुढे त्या विकसित झाल्यावर त्या कलेच्या क्षेत्रात आपलं एक नावही होतं आणि आपला जीवही त्यात रमतो, त्यामुळे अवतीभवतीच्या कधी आलेल्या थोड्याफार दु:खातून आपल्याला आपल्या अंगी असलेली कला सावरते. त्यामुळे आपल्यातील असलेल्या कलागुणांचा विकास होणं फारच आवश्यक आहे.
आज आपण आपल्या अवतीभवती पाहिल्यास आपल्याला याची जाणीव होईल की, बरीच मुलं जी लहानही आहे, त्यांच्याही अंगी काही कलागुण आहे, याची त्यांना जाणीव असते आणि आपल्याही ती होते. आपल्या शेजारी असणारी मुलं कधीतरी चित्र काढताना दिसतात, तर कधी त्यांच्या शाळेच्या कार्यक्रमांमध्ये ते डान्स केल्याचं आपल्या कानावर येतं. ज्या मुलांची घरची परिस्थिती सुदृढ असते, तयांचे आई-वडील त्यांची आवड पाहून किंवा एखाद्या कलेल्या क्षेत्रात त्यांना खास पुढे आणण्याकरिता क्लास लावून देतात आणि त्या मुलांना तेथे गुरूकडून धडे मिळतात. पण दुसर्‍या बाजून आपण विचार केला तर आपल्याला असे दिसते की, बर्‍याच मुलांच्या घरची परिस्थिती ही अगदी जेमतेम राहाते आणि त्यांच्यात काही गुण असतीलही परंतु त्यांचे आईवडील त्यांना क्लास लावून देऊ शकत नाही. त्यामुळे त्यांच्या अंगी असलेले गुण हे विकसित होत नाहीत, कारण त्यांना मार्गदर्शन करायला कुणीच नसतं.
त्यामुळे अशा मुलांसाठी काहीतरी करणं हे आपलं कर्तव्य राहतं. कारण ते आपलाच एक घटक आहे आणि कुणी सांगावं आपण त्यांच्याकरिता काही योगदान दिलं, त्यातील उद्या कुणी मोठा होऊन कलेच्या क्षेत्रात मोठं नाव करेल आणि आपली मदत सार्थकी लागेल.
आज युवकांनी या बाबतीत विचार करायला हवा. युवकांचा सहभाग असलेल्या अनेक सामाजिक संस्था सुट्‌टीच्या दिवसांत गरीब मुलांकरिता असे अनेक उपक्रम कुठेकुठे राबवताना दिसतातही. पण ते पुरेसं नाही. कारण अनेक मुलं आयोजित केलेल्या शिबिरापर्यंत पोहोचू शकतील, असा भाग नाही. त्यामागे त्यांना अनेक अडचणी येतात. ती लहान असतात. किंवा आई-वडिलांना तेथपर्यंत त्यांना पोहोचवण्याकरिता त्यांना वेळही नसतो कारण प्रश्‍न त्यांच्या रोजीरोटीचा असतो. कामाला गेलं नाही तर घरात पैसा येणार नाही आणि परिस्थिती ही जेमतेम असल्याकारणानं त्यांना दिवस वाया घालवता येत नाही. अशा मुलांना काहीच पर्याय नसतो.
चित्रकला, लेखन, नृत्य, अभिनय, वर्क्तृत्व अशी कोणतीही कला आपल्या अंगी आहे का ? आणि ती आज विकसित झाली आहे? त्यात आपलं नाव झालं आहे? अशावेळी आपण आपल्या अवतीभवती, शेजारी हीच कलागुण असलेली जेमतेम परिस्थितीत मोठी होणारी मुलं पाहतो, ज्यांना कलेची आवड आहे, पण मार्गदर्शन करायला कुणी नाही. तर मग आपल्या फावल्या वेळेत आपण त्यांना त्यांच्यातील कलागुण विकसित व्हावा म्हणून त्यांना मार्गदर्शन करायला हवं, त्यांच्याकरिता थोडा वेळ का होईना, शिकवणी वर्ग आयोजित करायला हवे, ते आपलं कर्तव्यच आहे. कारण आपण आपल्या समाजाचं देणं लागतो. आपल्याकरिता आपण जगत असताना आपण दुसर्‍यांकरिताही काहीतरी भरीव योगदान दिलं पाहिजे, आणि ते आपण चालताबोलता देऊ शकतो. आपला परिसर, आपलं गाव, शहर, राज्य आणि देश आज जर प्रगत व्हायचा असेल तर सामाजिक बांधीलकीची ही भावना अंगी जोपासणे हे अगदी जरूरीचे आहे.
आपल्यातील कलागुणांचा आज गौरव होत असताना, कलागुण पुरस्कृत होताना गहिवरून आलं असेल, तेव्हा अशा चांगल्या वेळी आपल्यातील कलागुण इतरातही रुजवण्याविषयीही निश्‍चय करा.
– दीपक वानखेडे /९७६६४८६५४२