विवेकदीप

0
119

कल्पवृक्ष
ते दोघे सख्खे भाऊ. एक नुकताच तुरुंगातून आलेला. छोट्या मोठ्या गुन्ह्यात त्याला अनेकदा शिक्षा झाली. त्याला सर्व प्रकारची व्यसने होती. त्यामुळे तब्येत पार खालावलेली. त्याला विचारले, ‘‘तुमची अशी स्थिती का झाली?’’ तो म्हणाला, ‘‘मी ज्या परिस्थितीत वाढलो, त्यात यापेक्षा वेगळे काय होणार. घरी दारिद्र्य. बाप दारूडा. रोज आईला मारायचा. त्यातच तो मेला. आई दोन पैसे कमवायची. आम्ही शाळेत जायचो. पण नंतर आई आजारी झाली. एका हॉटेलमध्ये नोकरी करायचो. नंतर आईचाही मृत्यू झाला. हॉटेल हाच निवारा. तेथे वाईट संगत लागली. पैसे कमावण्याकरिता चोर्‍यामार्‍या सुरू केल्या. तुरुंगात जावे लागले. माया करणारे कुणी नव्हते. जाब विचारणारेही कुणी नव्हते. अशा परिस्थितीत वेगळे काय वाट्याला येणार?’’ दुसरा भाऊ उत्तम व्यावसायिक होता. त्याचे मोठे हॉटेल होते. अनाथ मुलांकरिता तो एक संस्थाही चालवत असे. त्याला विचारले, ‘‘तुमच्या यशाचे कारण काय?’’ तो म्हणाला, ‘‘परिस्थिती! त्यामुळेच मला असे करण्याची प्रेरणा मिळाली. आमचे वडील खूप चांगले होते. पण मिलमधली त्यांची नोकरी सुटली. त्या धक्क्यातून ते सावरलेच नाहीत. दारूचे व्यसन लागले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. त्या दिवशी ठरवले, आयुष्यात दारूला स्पर्श करायचा नाही. आई काबाडकष्ट करायची. आम्ही चांगलं व्हावं, मोठं व्हावं, असे तिला वाटायचे. तीही गेली. पण तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास लागला. हॉटेलमध्ये नोकरी केली. रात्रीच्या वेळी अभ्यास केला. शिक्षण घेतले. या व्यवसायाचा अनुभव होताच. हॉटेल काढले. पैसा आला. अनाथ मुलांकरिताही आता थोडे काम करतो.’’
एकच परिस्थिती, एकच अनुभव माणसाला वेगळी शिकवण देतो. एक माणूस त्या परिस्थितीचा शिकार होतो. दुसरा त्याच अनुभवातून जगण्याची दिशा घेतो. आपण कसा विचार करतो किंवा मुळातून विचार करतोच की नाही, यावर सारे अवलंबून असते.
अमेरिकेतील एका रुग्णालयात एक लहान मुलगा बरेच दिवसांपासून किडनीच्या उपचारासाठी लहान मुलांच्या वार्डात दाखल झालेला असतो. दर बुधवार व रविवार अन्य मुलांचे आई-वडील त्यांना भेटायला यायचे. पण या मुलाचे आई-वडील मात्र त्याला बरेच दिवसात भेटायला येत नव्हते. त्या दिवशी त्याचा नववा वाढदिवस होता, पण आई-वडील मात्र आले नाहीत. अन्य मुलांचे वाढदिवस तो पाहात होता. दहा महिन्यांपासून तो अंथरुणावर होता. दोन-तीन महिने आई यायची पण नंतर तिचेही येणे बंद झाले. वाढदिवस असूनही कोणी आले नाही, त्यामुळे तो प्रचंड संतापला. जोराजोरात बेडवर मुठींनी मारायला लागला. ओरडायला लागला. भिंतीवर डोके आपटून घ्यायला लागला. नर्स धावत आली. त्याच्यावर जोरात ओरडली, ‘‘काय हा दर बुधवारी व रविवारी तुझा गोंधळ? परत असा वागलास तर जाड सुईचे इंजेक्शन देईन.’’ भीतीने तो शांत झाला. तो थकून गेला होता. निराश झाला होता. आई-वडिलांना माझ्याबद्दल काहीच कसे वाटत नाही. बाकीच्या मुलांचे आई-बाबा किती छान आहेत, मग माझेच आई-बाबा असे का? पुढे अनेक दिवस तो विचारात मग्न असे. आई-बाबा निवडणे आपल्या हातात थोडेच आहे, असे तो स्वतःलाच समजावू लागला. आपण ते बदलवू शकत नाही. आपल्याला ते असतील तसे त्यांच्यावर अवलंबून राहाणे भाग आहे. आपण काय करू शकतो? ते लक्ष देत नसतील, तर आपणच आपल्याकडे लक्ष देऊ. स्वतःच्याच या विचारांनी तो शांत झाला. हा मुलगा दुसरा कोणी नसून सुप्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ डॉ. अल्बर्ट एलीस होते. जगात मानसोपचारासाठी सर्वाधिक वापरल्या जाणार्‍या ‘विवेक वर्तन उपचार’ पद्धतीचे ते जनक आहेत. त्यांच्या स्वानुभवात त्याची बीजं आहेत.
परिस्थिती व अनुभवासारखा जबरदस्त शिक्षक नाही, असे आपण म्हणतो. ‘ऑलवेज रॉंग पर्सन्स् टीच राईट लेसन्स् ईन लाईफ’ असेही म्हणतात. असे आहे तर सर्वच शहाणे का होत नाहीत? जुना अनुभव गाठीशी असतानाही आपण वेळेवरच अभ्यास करतो. अनुभवातून आपण का शिकत नाही? खरे तर असा प्रश्‍न स्वतःला विचारायला हवा. त्याकरिता मनापासून विचार करण्याची यंत्रणा दुरुस्त करावी लागते. मग अनुभवाचा वस्तुनिष्ठ व योग्य अर्थ लावता येतो. आपल्या नियंत्रणात काय नाही आणि आपल्या हातात काय आहे, याची जाणीव होते. भविष्यातल्या आनंदाकरिता क्षणिक आनंद व आळस टाळता येतो. अनुभवावर प्रकाश टाकण्याकरिता विवेकदीप लावावा लागतो. अंधार दूर करण्याचा हा एकच मार्ग आहे.
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११