योगी आदित्यनाथ यांच्याबद्दलचा अपप्रचार अनाठायी

0
217

दिल्लीचे वार्तापत्र
उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रिपदी योगी आदित्यनाथ यांची भाजपाने निवड केल्यामुळे देशातील तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांच्या पोटात दुखू लागले आहे. सोशल मीडियातून त्यांच्याबद्दल उलटसुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहे. योगी आदित्यनाथ यांची मोठ्या प्रमाणात निंदानालस्ती केली जात आहे. भगव्या रंगाबद्दलचा या धर्मनिरेपक्ष लोकांचा राग यातून व्यक्त होत आहे. भगवी वस्त्रे धारण करणारी व्यक्ती एका राज्याची मुख्यमंत्री होते, हे या लोकांच्या पचनी पडले नाही. आदित्यनाथ यांची आतापर्यंतची प्रतिमा आक्रमक हिंदुत्ववादी नेत्याची आहे. जहाल भाषणांसाठी ते ओळखले जातात, पण त्यांच्यात तेवढेच सहृदयी असे माणुसकीचे दुसरे मनही आहे.
उत्तरप्रदेशमध्ये जनतेने भाजपाला तीनचतुर्थांश बहुमत दिले आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपदी कोणाची निवड करावी, हा पूर्णपणे भाजपाचा अधिकार आहे. त्याप्रमाणे भाजपाने योगी आदित्यनाथ यांची निवड केली. योगी आदित्यनाथ लोकप्रतिनिधी आहेत, गोरखपूरचे भाजपाचे खासदार आहेत. एकदा नाही तर सलग पाच वेळा ते गोरखपूरमधून निवडून आले आहेत. गोरखपूरच्या नाथ संप्रदायाचे ते महंत आहेत. महंत असल्यामुळे ते भगवे वस्त्र धारण करतात. फक्त भगवे वस्त्र धारण करत असल्यामुळे ते मुख्यमंत्रिपदासाठी अपात्र ठरत नाही, याची जाणीव या लोकांनी ठेवली पाहिजे.
भाजपाने उत्तरप्रदेश वगळता अन्य तीन राज्यांतही मुख्यमंत्र्याची निवड करत सरकार स्थापन केले, त्या राज्यातील भाजपाच्या मुख्यमंत्र्याबद्दल कोणालाही आक्षेप नाही, मग उत्तरप्रदेशच्याच मुख्यमंत्र्याबद्दल आक्षेप घेण्याचे कारण काय? हा आक्षेप योगी आदित्यनाथ यांच्या नावाला आहे की ते घालत असलेल्या भगव्या कपड्यांना आहे. मुख्यमंत्रिपदाची सूत्रे स्वीकारताच आदित्यनाथ यांनी तातडीने जे निर्णय घेतले, ते त्यांच्याबद्दलच्या अपेक्षा उंचावणारे म्हणावे लागतील. उत्तरप्रदेशला पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील प्रदेश, तसेच उत्कृष्ट राज्य बनवण्याचा त्यांचा निर्धार आहे. उत्तरप्रदेशला विकासाच्या वाटेवर नेत दंगामुक्त, तसेच भ्रष्टाचारमुक्त राज्य करण्याचा योगी आदित्यनाथ यांचा संकल्प आहे.
घटनेत असे कुठेच म्हटले नाही, की भगवे वस्त्र धारण करणार्‍याला मुख्यमंत्रिपदी नियुक्त करू नये. त्यामुळे या मुद्यावरून विनाकारण आगपाखड का सुरू आहे, हे कळत नाही. भगवे वस्त्र धारण करणारा स्वत:च्या नाही तर नेहमीच समाजाच्या कल्याणाचा विचार करत असतो, समाजाच्या कल्याणासाठी आपले आयुष्य झिजवत असतो. त्यामुळे हिंदुस्थानमध्ये भगवे वस्त्र धारण करणारा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेत असेल तर ती समस्त हिंदूंच्या दृष्टीने आनंदाची बाब म्हणावी लागेल. मुख्यमंत्रिपदाचा वापर करत समाजाच्या कल्याणाचे निर्णय घेणे आणि त्याची अंमलबजावणी करणे योगी आदित्यनाथ यांच्यासाठी आता आणखी सोपे झाले आहे.
योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री झाल्यामुळे उत्तरप्रदेशातील मुस्लिमांमध्ये भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाल्याचे चित्र काही माध्यमांनी हेतुपुरस्सर निर्माण केले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या राजवटीत उत्तरप्रदेशमध्ये मुस्लिम आता राहू शकणार नाही, असा प्रचार सुरू करण्यात आला आहे. हा प्रचार काही हितसंबधी लोकांनी मुस्लिमांना भडकवण्यासाठी सुरू केला, अशी शंका घ्यायला पूर्ण जागा आहे. ुभाजपाला उत्तरप्रदेशमध्ये जे दणदणीत बहुमत मिळाले त्यात मुस्लिम समाजाचाही मोठा वाटा आहे. मुस्लिम मतदारांनी उत्तरप्रदेशात भाजपाला मोठ्या प्रमाणात मतदान केले आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच मतदार हिंदू-मुस्लिम मानसिकेतून कधीच बाहेर आला आहे, आता तुम्हीही बाहेर या, असा सल्ला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी उत्तरप्रदेश आणि अन्य चार राज्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले, त्या दिवशी भाजपा मुख्यालयात आयोजित पत्रपरिषदेत माध्यमांच्या प्रतिनिधींना दिला होता.
उत्तरप्रदेशच्या मतदारांनी मग, त्यात सर्व जाती धर्माच्या लोकांचा समावेश आहे, उत्तरप्रदेशच्या विकासासाठी भाजपाला निवडून दिले आहे. योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वात उत्तरप्रदेशचा विकास होऊ शकतो, असे भाजपाला वाटले, त्यामुळे भाजपाने त्यांची मुख्यमंत्रिपदी निवड केली आहे. जो खरा संत असतो तो कधीच माणसामाणसात भेदभाव करत नाही. त्याचा जात आणि धर्म पाहत नाही. ज्यावेळी तुम्ही समोरच्या माणसाकडे फक्त माणूस म्हणून पाहता, त्याला माणसासारखी वागणूक देता, त्यावेळी समोरचा माणूसही तेवढ्याच आपुलकीने तुमच्याशी वागत असतो. योगी आदित्यनाथ यांची मुस्लिमविरोधी प्रतिमा निर्माण करणार्‍या तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांनी त्यांच्या मठातील वस्तुस्थिती पाहिली तर ते आदित्यनाथ यांना साष्टांग दंडवत घातल्याशिवाय राहणार नाही. गोरखपूर मंदिरातील अंतर्गत बांधकामाची गेल्या ३५ वर्षांपासून जबाबदारी पार पाडणारे यासिन अन्सारी नावाचे एक मुस्लिम गृहस्थ आहेत. अनेक वर्षे मठातील आर्थिक व्यवहारही हेच यासीन अन्सारी पाहात आहेत. योगी आदित्यनाथ यांना मठात छोटे महाराज म्हणून ओळखले जाते. छोटे महाराजांशी माझा नियमित संपर्क असतो, कामाच्या निमित्ताने ते मला सतत बोलवत असतात, त्यांच्या स्वयंपाकघरापासून झोपण्याच्या खोलीपर्यंत माझा संचार असतो, आमची मोकळेपणाने चर्चा होत असते. अनेकदा आम्ही एकसोबत जेवणही केले आहे, असे यासीन अन्सारी यांनी सांगितले. माझ्या घरच्या लग्नसमारंभातही छोटे महाराज सहभागी होत असतात, याकडे अन्सारी याने लक्ष वेधले. यासीन अन्सारी यांचे या मठाशी असेलेले संबंध पिढ्यान्‌पिढ्यांचे आहेत. महंत दिग्विजयनाथ यांच्या मठाधिपती पदाच्या सोहळ्यासाठी यासीन अन्सारी यांचे काका आले होते, तेव्हापासून त्यांच्याकडे मठाच्या स्वयंपाकघराची व्यवस्था आहे. माझी सासू हमिदा बेगम मठाच्या स्वयंपाकघरात काम करत होती, तर माझे सासरे मठाच्या बगिच्यात माळी होते, असे यासीन अन्सारी यांनी सांगितले आहे.
गोरखपूर मंदिराच्या परिसरात अनेक दुकाने आहेत, यातील काही दुकाने मुस्लिम बांधवांचीही आहेत, आम्हाला मंदिर परिसरात मुस्लिम असल्याचा कोणताच त्रास होत नाही, असे अझिझिन्नुसा हिने सांगितले. विशेष म्हणजे याबाबतचे वृत्त कधीच टाईम्स ऑफ इंडिया या दैनिकाने दिले आहे. तरीही या तथाकथित धर्मनिरपेक्ष लोकांचे डोळे उघडत नाही.
योगी आदित्यनाथ यांची जाणीवपूर्वक मुस्लिम विरोधक अशी प्रतिमा रंगवण्याचा प्रयत्न केला जात आहे. झोपलेल्याला जागे करणे सोपे असते, पण झोपेचे सोंग घेतलेल्याला जागे करणे कठीण असते. कारण या देशात बहुसंख्यक असलेल्या हिंदूंची बाजू घेणारा सांप्रदायिक ठरतो, तर आपल्या राजकीय स्वार्थासाठी हिंदूच्या विरोधात गरळ ओकणारा धर्मनिरपेक्ष समजला जातो.
याआधी शिकागो येथील परिषदेत भारतातीलच भगवी वस्त्रे धारण केलेल्या एका संन्याशाने माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो असे म्हणत त्या परिषदेला उपस्थित सर्वांना जिंकले होते. वसुधैव कुटुंबकम्‌चा संदेश दिला होता. स्वामी विवेकानंद यांच्यानंतर योगी आदित्यनाथ यांच्यावर आता आपल्या कल्याणकारी निर्णयाने उत्तरप्रदेशातील जनतेला जिंकण्याची आणि राज्याला विकासाच्या वाटेवर नेण्याची जबाबदारी आली आहे. आतापर्यंत घेतलेल्या निर्णयाने त्यांनी त्याची सुरुवात केली आहे. आश्‍वासक वातावरण राज्यात निर्माण केले आहे. त्यामुळे मुस्लिम जनतेनेही कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता उत्तरप्रदेशमध्ये राहावे. योगी आदित्यनाथ यासीन अन्सारीसारखीच वागणूकच सर्वांना देतील, याची खात्री बाळगावी.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७