आय ऍम स्टील ग्रोईंग

0
122

कल्पवृक्ष
सर एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी माऊंट एव्हरेस्ट किंवा शिखर सरमाथा पादाक्रांत केले. २९,००० फूट उंचीच्या, जगातील सर्वोच्च शिखरावर त्यांनी पहिले पाऊल ठेवले. पण, हा प्रवास सोपा नव्हता. त्यापूर्वी त्यांना अपयश आले होते, पण त्यांचा निर्धार पक्का होता. एडमंडने आपल्या घरी एव्हरेस्टचे एक मोठे चित्र लावले होते. त्या खाली एक वाक्य लिहिले होते. ते जगातले एक प्रेरणादायी वाक्य ठरले. एडमंड त्या चित्रातील शिखराला आव्हान देतात, ‘‘माऊंट एव्हरेस्ट, यू बीट मी द फर्स्ट टाईम, बट आय विल बीट यू द नेक्स टाईम बिकॉज यू हॅव ग्रोन ऑल… बट आय ऍम स्टील ग्रोईंग.’’ हे पर्वत शिखरा, तू मला पहिल्यांदा हरवलेस, पण पुढच्या वेळी मी तुझ्यावर मात करीन. कारण तुझी वाढ होऊन गेली आहे, पण माझी वाढ मात्र अजूनही सुरू आहे. जीवनात प्रगतीची शिखरं काबीज करायची असतील तर ‘आय ऍम स्टील ग्रोईंग’ ही वृत्ती ठेवावीच लागते. हा प्रवास अनंत अडचणींचा असतो. अनेकदा तर जीवघेणा असतो. अनेक क्षमतांचा कस लागतो. एडमंड हिलरी म्हणतात, ‘‘इट वॉज नॉट द माऊंटन वुई कॉन्कर, बट अवरसेल्वज्.’’ स्वतःवरच्या विजयातूनच कोणत्याही विजयाचा मार्ग प्रशस्त होतो.
‘ऍम आय स्टील ग्रोईंग?’ हा प्रश्‍न कधीतरी थांबून स्वतःला विचारावाच लागतो. माणूस त्याच त्या चक्रात फिरत असतो, गतिमान पण गतिहीन असल्यासारखा. जीवनात एक साचलेपण येते. कधी सोन्याच्या पिंजर्‍याचा मोह होतो. पंख निरुपयोगी होतात. माणूस आयुष्यभर विकसित होत असतो, असे म्हणतात. पण कसा? त्याचा अर्थ काय? त्याची दिशा कोणती? या प्रश्‍नांचा सतत शोध घेणं आणि स्वतःपुरती, स्वतःसाठी उत्तरे शोधणं आवश्यक असते. त्यानेच जीवन प्रवाही राहते.
अमिताभ बच्चनला एका मुलाखतीत प्रश्‍न विचारला होता, ‘‘तुम्ही आधीच्या सुपरस्टारला डावलून हे स्थान मिळवले, त्याबद्दल तुम्हाला काय वाटते?’’ तो म्हणाला, ‘‘सुपरस्टार एकच झाला आणि शेवटपर्यंत एकच असेल, तो म्हणजे राजेश खन्ना. त्यांनी हे पद निर्माण केले, ते शेवटपर्यंत त्यांच्याबरोबर राहणार आहे. मी एक सामान्य कलाकार आहे.’’ राजेश खन्ना सुपरस्टार असताना ते एका मुलाखतीत म्हणाले होते, ‘‘ऐसे कई सारे अमिताभ आयें और चले गयें, लेकीन मुझे कभी कोई छू भी नहीं सकता…’’ पुढचा इतिहास आपल्या समोर आहे. राजेश खन्ना सुपरस्टारच्या भूमिकेतून कधी बाहेर पडूच शकला नाही. अमिताभने मात्र नव्या नव्या भूमिकांची आव्हाने स्वीकारली. त्या यशस्वी केल्या. आजही प्रेक्षकांच्या मनावर त्याची मोहिनी कायम आहे. जीवनातही विकसित व्हायचे असेल, तर नव्या भूमिका स्वीकाराव्या लागतात. जुनी वर्तुळे तोडावी लागतात. नव्या गोष्टी शिकाव्या लागतात. असा बदल झाला नाही तर जीवन यांत्रिक बनते. माणसं रोबोट बनतात आणि जीवनाचा खरा आनंद हातातून निसटून जातो. माणूस म्हणजे शरीर, मन, बुद्धी व आत्मा. हासुद्धा विकासाचा एक क्रमच आहे. ज्ञान अनंत आहे. प्रेमही अमर्याद असते. या दोन शक्तींच्या विकासातून शारीरिक आनंदापासून आत्मिक आनंदापर्यंत आपण प्रवास करू शकतो. यालाच ‘मी’पासून कुटुंब, समाज, राष्ट्र, सृष्टी व परमेष्टीपर्यंत विकास करणे म्हणतात. या प्रवासात किती भूमिका कराव्या लागतात. मला तहान लागली तर ‘पाणी पिणे’ हा स्वधर्म आहे. दुसर्‍याला पाणी देणे, हा सेवाधर्म आहे. पण इतके पुरेसे नाही. जगात पाण्याचा तुटवडा पडणार नाही म्हणून त्याचे नियोजन करणे, हा विश्‍वधर्म असतो. या सर्वच भूमिका पार पाडाव्या लागतात. त्या पार पाडण्याकरिता जेव्हा तो सिद्ध होतो तेव्हा सर्व अंगांनी विकासाची प्रक्रिया सुरू असते. ‘आय ऍम स्टील ग्रोईंग’ असे म्हणत माणूस जीवनाला अर्थपूर्ण करतो.
शरीर असेपर्यंत, या जीवनात मला भेट, असा आग्रह कबीर देवाला करतात. देव एकदा त्यांना म्हणतो, ‘‘अरे हे नश्‍वर शरीर नष्ट झाल्यावर होणारी भेट शाश्‍वत असेल. या जीवनातच भेटण्याचा आग्रह का?’’ कबीराने दिलेले उत्तर फार मार्मिक आहे. कबीर त्याला म्हणतो,
जीवत में मोको मिलो
मुए मिलो ना राम
जब लोहा माटी मिला
तब पारस केही काम
याचा अर्थ हे जीवन, शरीर लोखंड आहे. राम परीस आहे. लोखंड मातीत मिसळल्यानंतर परीस मिळाला तर काय उपयोग? जीवनाचे सोने करणार्‍या परिसाचा शोध घेणे, हाच विकास आणि जीवनाचाही अर्थ आहे.
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११