‘बधाई हो, टायगर हुआ है!’

0
146

संजय रामगिरवार
चंद्रपूर, २४ मार्च
सगळ्या वन कर्मचार्‍यांना बोलावून लाडू वाटत असतानाच, ‘अजी क्या हुआ, लडकी हुई या लडका…’, असे मागून विचारले जाते. तेवढ्याच तत्परतेने, ‘अरे नही भाई… ना लडकी हुई, ना लडका हुआ… टायगर हुआ है, टायगरऽऽ! बधाई हो.. आओ, आप भी मिठाई लो… टायगर हुआ है…’ असे दमदार आवाजात महानायक अमिताभ बच्चन सांगत असल्याची चित्रफित सध्या सर्वत्र गाजते आहे.
मुलामुलींच्या जन्माच्या वेळी वाटली जाणारी मिठाई… हे संकल्पनासूत्र धरून व्याघ्रदूत अमिताभ बच्चन यांना घेऊन एक चित्रफित तयार करण्यात आली आहे. जागतिक वनदिनाचे औचित्य साधून मंत्रालयात आयोजित कार्यक्रमात ती दाखवण्यात आली. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने खास या कार्यक्रमासाठी तयार केलेली आणि वनविभागाच्या ‘हॅलो फॉरेस्ट १९२६’ ही ‘हेल्पलाईन’ टाकलेली चित्रफित मुख्यमंत्र्यांसह सर्व उपस्थितांना भावली. अगदी मंत्रालयाच्या तळमजल्यापासून सातव्या मजल्यापर्यंत दाटीवाटी करून बसलेल्या सार्‍यांच्याच चेहर्‍यावर यावेळी स्मित उमटले होते.
जंगल आणि वन्यजीवांच्या संवर्धनात लोकांचा सहभाग वाढावा म्हणून अतिशय सक्षमपणे वनविभागाचे काम सुरू आहे. कधी भावनांना हात घालून, तर कधी जनतेला प्रत्यक्ष कामात सहभागी करून, हे कार्य अग्रेसर होत आहे. जंगल हे जीवन आहे. माणसाला जगण्यासाठी लागणारे अन्न आणि प्राणवायू जंगलच आहे. त्यामुळे त्याचे संवर्धन करावयाचे असेल, तर वन विकासाच्या कामात प्रत्येकाचा सहभाग असायला हवा, अशी आग्रही भूमिका या कार्यक्रमातून मांडण्यात आली.
खरं तर, यासाठी आग्रहाची गरज नसावी. माणूस जेव्हा धकाधकीतून चार क्षणांचा विरंगुळा शोधतो, तेव्हा त्याला वनातच मानसिक शांती लाभते. हिरवेगार देखणे जंगल आणि वन्यजीव माणसाला आकर्षित करतात आणि म्हणूनच अलीकडे वन पर्यटनाला महत्त्व आले आहे. वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात वनपर्यटनाचे स्वत:चे धोरण निश्‍चित करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
मुनगंटीवार यांनी वन आणि वन्यजीव विकासाचा घेतलेला ध्यास, हरित महाराष्ट्राचे स्वप्न नक्कीच साकार होईल, अशी हमी देणारे आहे. गतवर्षी १ जुलैला एकाच दिवशी २ कोटी ८३ लाख झाडं लावून वनविभागाने वृक्ष लागवडीचा लोकोत्सव साजरा केला. एवढेच नव्हे, तर ‘लिम्का बूक ऑफ रेकॉर्ड’मध्ये पाच विक्रमांची नोंद केली. येत्या ३ वर्षात ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प सिद्धतेकडे वाटचाल करीत आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या रोपवाटिका तयार झाल्या आहेत. शोभिवंत, औषधी तसेच फळ-फुलांच्या दर्जेदार रोपांची निर्मिती होत आहे. आजवर कधी नव्हे, ते वनविभागाचे काम लोकांच्या नजरेस पडत आहे, पसंतीस उतरत आहे आणि म्हणूनच वनदिनाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, सुधीर मुनगंटीवार यांच्या दोन-सव्वादोन वर्षातील दमदार वाटचालीचे तोंडभरून कौतुक केले.
यंदा ‘युनो’ने वने आणि ऊर्जा ही संकल्पना मांडली आहे. राज्यात २० टक्के म्हणजे, जवळपास ६१ हजार चौरस किलोमीटर इतके वनक्षेत्र आहे. ते ३३ टक्क्के म्हणजे, साधारणत: १ लाख चौरस किलोमीटर असणे गरजेचे आहे. अर्थात, आणखी १३ टक्के म्हणजेच जवळपास ४० हजार चौरस किलोमीटरचे वनक्षेत्र वाढवायचे आहे. त्याचेही गणित वनविभागाने मांडले आहे. अजून जवळपास ४०० कोटी झाडे त्यासाठी लावावी लागणार आहेत. केवळ वनविभागाच्या जमिनीवर आणि एकट्या वनविभागाकडून ते शक्य नाही. तर यात प्रत्येक व्यक्तीच्या सहकार्याची आवश्यकता आहे. सर्वांनी मिळून हे वृक्ष धनुष्य पेलायचे आहे, असे आवाहन मुनगंटीवार करतात.
राष्ट्रीय वन आयोगाने एकंदर खर्चाच्या दोन ते अडीच टक्के निधी वन आणि त्याच्याशी संलग्न क्षेत्रावर खर्च करण्याची शिफारस केली असताना, सन २०१४ पर्यंत केवळ ०.९४ टक्क्यांपेक्षाही कमी आर्थिक तरतूद विभागाला मिळाली. मात्र, आता राज्याचे वनमंत्री राज्याचे वित्तमंत्रीही आहेत. त्यामुळे वनांसाठीची ही वित्तीय तरतूद गेल्या दोन वर्षात दोन टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आली आहे. वनांसंबंधीच्या मानसिक बदलातून वित्तीय बदलापर्यंतचा हा प्रवास लक्षवेधी आहे.
त्याचाच एक भाग म्हणून ही चित्रफित आहे. याशिवाय आणखी एक चित्रफित प्रसारित करण्यात येत आहे. ती म्हणजे, ताडोबा जंगलातील गावांच्या जंगलाबाहेर होणार्‍या पुनर्वसनाची. या पुनर्वसनाने गावकरी आणि वन्यजीवही गुण्यागोविंदाने जगत असल्याची आदर्श संकल्पना आहे, जी वन्यप्रेमींच्या भावनेला हात घालणारी आहे.