असे बेताल का वागतात लोक?

0
200

चौफेर

इगो दुखावला गेल्याचा एका खासदारांना खूप राग आला, मग झोडपले त्यांनी एअर इंडियाच्या एका कर्मचार्‍याला. एकदा दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातले भोजन आवडले नाही, मग काय, दिला चोप लोकप्रतिनिधींनी तिथल्या कर्मचार्‍यांना. संप करणार्‍या डॉक्टरांमुळे अडचण झाली, तर झोडपून काढताहेत लोक डॉक्टरांना. वेगळ्या विदर्भाचा मुद्दा आवडला नाही, केला काही लोकांनी ऍड. श्रीहरी अणे यांच्या गाडीवर हल्ला- केली मोडतोड त्यांच्या वाहनाची. कधी एखाद्या राजकीय नेत्याच्या अंगावर शाई फेकण्याचा ‘कार्यक्रम’, तर कधी एखाद्या सरकारी अधिकार्‍याला जाहीर रीत्या होणार्‍या मारहाणीचा… काय चाललं आहे हे? अशी बेताल का वागताहेत माणसं? सौजन्याची सर्वदूर ऐसीतैसी सुरू आहे. सामाजिक भान राखले जात असल्याचे चित्र कुठेच मिळत नाहीय् बघायला. कशाचा परिणाम समजायचा हा? माणसं असहिष्णू होत चाललीत, वृत्तीच बदलली आहे, की सार्‍या समाजाचा प्रवासच अधोगतीच्या दिशेने होतो आहे?
बरं, ही मंडळी अन्यायाविरुद्ध पेटून उठली आहे म्हणावं तर तसंही नाही. असल्या वागण्यातून लोकांच्या मनातला संताप व्यक्त होत असेल, तर तेही समजता येईल एकवेळ. पण, लोकोपकारार्थ तशी पेटून उठणारी माणसं आताशा राहिली कुठे? समाजहिताच्या यज्ञात स्वत:च्या आयुष्याच्या समिधेची आहुती टाकणार्‍या लोकांची गर्दी असलेल्या चळवळी दिवसागणिक लयाला चालल्या आहेत. आता तर फक्त राजकीय अजेंड्याची छुपी किनार असलेली आंदोलनं तेवढी होतात. त्या अजेंड्यात स्वारस्य असणार्‍यांच्या गर्दीने रस्त्यावर उतरून मांडलेला तमाशा, हे त्याचं दृश्य स्वरूप असतं. त्यांच्या प्राधान्ययादीत पहिल्या क्रमांकावर राजकारणच असतं. बाकी, लोकहितासाठी पेटून उठणं वगैरे सब बकवास! ऍड. श्रीहरी अणेंच्या गाडीची औरंगाबादेत मोडतोड करणारी माणसं कुठल्या कारणासाठी चवताळून उठली होती सांगा?
पदांमुळे पदरी पडलेला अधिकार, त्या अधिकारातून अंगात आलेली गुर्मी. त्या गुर्मीतून सिद्ध होणारी मुजोरी. असाच सारा प्रवास असतो असल्या लोकांच्या वागणुकीचा. एअर इंडियातल्या एका सामान्य कर्मचार्‍याला, आपल्या पदाचा रुतबा दाखवण्याच्या नादातच खासदारांनी त्याला झोडपले ना! नेतेच कशाला, त्यांच्या सभोवताल वावरणार्‍या हौशा-नवशांनाही व्हीव्हीआयपी ट्रीटमेंटच अपेक्षित असते आताशा. नेत्यांनी आणि त्यांच्या सभोवताल वावरणार्‍या चमच्यांनीही, नियम आपल्यासाठी नाहीतच, असा गैरसमज करून घेतलेला असतो. कायदे असतात ते समाजातल्या सर्वसामान्य लोकांसाठी. त्याचे कठोर पालन झालेच पाहिजे. पण ते करावे सामान्यजनांनी. राजकीय नेते अन् त्यांच्या सभोवताल वावरणार्‍यांना त्या बंधनात अडकविण्याचा प्रयत्नही कुणी करायचा नाही. तसा आग्रह कुणी धरला, तर त्याचे काही खरे नाही. कारण नियम, कायदे माझ्यासाठी नाहीत. ते मी पाळणार नाही. एखाद्या कामासाठी लोक तासन्‌तास उभे असतील अन् मी उशिरा आलो असेन, तरी मी रांगेत उभा राहणार नाही. कारण असे रांगेत उभे राहणे हे माझ्या प्रतिष्ठेला शोभत नाही. रांगेत उभे राहावे ते गोरगरिबांनी, सामान्य लोकांनी. मी व्हीआयपी. व्हीव्हीआयपी. मी कशाला उभे राहायचे रांगेत? अशीच भावना प्रत्येकाच्या मनात असते. अधिकार्‍यांवर उगारल्या जाणार्‍या हातांमागे हा अहंगंडच कारणीभूत ठरतो अनेकदा. समाजातला प्रत्येकच जण ‘आय एम समथिंग’-आपण कुणीतरी वेगळे आहोत, या भावनेतून फुशारक्या मारीत असतो. त्याच विचारांतून तो स्वत:ची प्रतिमा आणि अस्तित्व जोपासत राहतो अन् त्यातून निर्माण होणार्‍या अहंगंडातूनच या असल्या बेताल वागण्याचा प्रमाद घडतो.
सुमारे साडेबाराशे वर्षांची परकीय सत्ता अनुभवलेला हा देश आहे. त्यामुळे परकीयांविरुद्ध ‘लढण्या’ची प्रवृत्ती आम्ही अंगी बाळगणे स्वाभाविक होते. पण, आता स्वकीयांच्या सत्तेच्या काळातही नेमक्या त्याच वृत्तीचा परिचय देत बेताल वागणे चालले आहे आमचे. पंतप्रधानपदाची गरिमा केराच्या टोपलीत टाकून, मोदींच्या प्रतिमेचे ‘कार्टून’ करून लोकांपुढे सादर करण्याची पद्धत असो वा मग निवडणूक हरलेल्या राहुल गांधींना हातात कटोरा घेतलेल्या भिकार्‍याच्या वेशात दाखवणारे चित्र असो, दोन्हीही निषेधार्ह अन् त्यामागील वृत्ती आक्षेपार्हच.
युरोपातील धर्मसत्तेविरुद्ध आवाज उठविणार्‍या वॉल्टेअरच्या कोट्या कमालीच्या बोचर्‍या असायच्या. तत्कालीन प्रचलित धार्मिक पद्धतींवर त्यांनी नोंदविलेले आक्षेप तर अगदीच जळजळीत असायचे. कित्येकदा त्याची धार तलवारीच्या पातीसारखी तीक्ष्ण असायची. पण, तरीही त्याला एक दर्जा असायचा. त्यांनी नोंदविलेल्या विरोधातही प्रगल्भता असायची. आता तर लोकांचा विरोध विद्रोहाच्या अन् टीका-शिवीगाळीच्या दिशेने प्रवास करू लागली आहे. उथळपणाने प्रगल्भतेची जागा केव्हाच व्यापून टाकली आहे. शिवीगाळ जेवढी अर्वाच्च, तेवढी त्याची तीव्रता अधिक, अशा गैरसमजातून, विरोध उद्धटपणाची झूल पांघरूण सादर होऊ लागला आहे अलीकडे. विरोधामधला संयतपणा शब्दाकोशात बंदिस्त करण्याचीच जणू धडपड चालली आहे सगळीकडे.
जाळपोळ, दगडफेकीशिवाय आंदोलनाचा प्रभाव पडत नसल्याचा समज दृढ होतोय् दिवसागणिक. शिवीगाळ जमेल तेवढी निम्न दर्जाचीच असली पाहिजे. चारचौघातलेच असले तरीही बोलणे ‘लाऊड’च असले पाहिजे. स्वर टीपेचाच असला पाहिजे. सूर वरचाच असला पाहिजे. समाजाच्या, अभिव्यक्त होण्याच्या या अफलातून पद्धतीत समंजसपणा आपसूकच लयाला जातो आहे. व्यक्त होण्याची संयत पद्धत बाद ठरून आक्रमकतेला नकळत प्राधान्य मिळू लागले आहे. गांधींच्या शांंतिमंत्राची धार बोथट ठरवत कथित लढाऊ बाणा प्रभावी ठरविण्याचे प्रयत्न समाजमान्य होत चालले आहेत आणि तरीही समाजाचे हे अध:पतन दुर्लक्षून अभिरुचिसंपन्न संस्कृतीचे दावे तसेच कायम आहेत…
कुठल्या क्षणी कुणाच्या पाठीशी उभे राहायचे हे लोक परिस्थिती पाहून ठरवीत असतात. कारण तसे वागणे सोयीचे असते. प्रसंगानुरूप स्वत:ची भूमिका बदलता येते. एका खासदाराने एका विमान कंपनीच्या कर्मचार्‍याला केलेली मारहाण योग्य की अयोग्य, हे ठरविण्यासाठी खासदार कोणत्या राजकीय पक्षाचे हे बघणे महत्त्वाचे ठरते. तो विरोधी पक्ष असेल तर मग कुठलाही मुलाहिजा न बाळगता त्याच्यावर तुटूनच पडले पाहिजे. पण जर का तो ‘आपला’ असेल तर मात्र वास्तव खुंटीवर टांगून त्याची पाठराखणच केली पाहिजे. या अहमहमिकेत समाजाची बदलत चाललेली ‘टेस्ट’ प्रकर्षाने उमटतच नाही. आता काही लोक खासदाराची बाजू उचलून धरतील. विमान कंपन्यांच्या कर्मचार्‍यांच्या वर्तणुकीवर ताशेरे ओढतील, तर काही लोक त्या कर्मचार्‍याची बाजू सावरून धरण्यासाठी धडपडतील. पण, यात मुख्यत्वे प्रभावी ठरेल ते राजकारणच- खासदारांना समर्थन वा विरोध करण्याचे! पण ज्यामुळे हा प्रकार घडला तो इगो, तो अहंगंड, ती गुर्मी… या बाबी मात्र पाऽऽर दुर्लक्षित राहतील.
लोकांचे हे असे बेताल, विक्षिप्त वागणे हे समाजस्वास्थ्य बिघडत चालले असल्याचे लक्षण आहे. या वावटळीत शंकरराव पापळकरांची साधी राहणी, त्यांचे ते संयत वागणे लोकांना भावते खरे, पण त्यांचे संपूर्ण चरित्र त्यांच्यासमवेतच्या स्वत:च्या एखाद्या सेल्फीत बंदिस्त करण्यातच लोकांना स्वारस्य असते. त्यांच्यासारखी साधी राहणी, सभ्य वागणूक, सुसंस्कृत आचरण… या सार्‍या बाबी पापळकरांना देवत्व बहाल करून त्यांच्या स्वाधीन करायच्या आणि आपण मात्र बेमुर्वतखोरपणे वागायला मोकळे राहायचे, हीदेखील लोकांच्या वागण्याची रीत झाली आहे आता…
सुनील कुहीकर,९८८१७१७८३३