संवर्धन माणूसपणाचे

0
102

कल्पवृक्ष

हा अनुभव पूर्वीचा आहे. शेगावला दर्शनाकरिता गेल्यानंतर माणसं रांगेत उभी असायची. दोन-अडीच तास तेच विचार मनात असायचे. जसे जसे आपण मूर्तीच्या जवळ जातो, तशी दर्शनाची ओढ लागायची. प्रत्यक्ष तो क्षण उत्कट भावावस्थेचा असतो. ते सुंदर ध्यान डोळ्यात साठविताना वेगळा आनंद होतो. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरही माणूस कितीतरी वेळ त्याच आनंदात तेथे रेंगाळत असतो. आताचे दृश्य वेगळे असते. शेवटपर्यंत माणसं मोबाईलवर बोलत असतात, चॅटिंग करत असतात. कोणते विचार त्या वेळी त्यांच्या मनात येत असतील. दर्शन घेऊन बाहेर पडले की पुन्हा त्या मोबाईलमध्ये तांेंड खुपसतात. कोणता अनुभव त्यांच्या मनाला येत असेल. श्रद्धा, उत्कटता, भावुकता यांचा अंतःकरणाला स्पर्श होणं, ते अनुभवणं कमी झालं तर आपण काही तरी गमावतो आहोत, हे नक्की. श्रद्धा कोठे ठेवायची, हा ज्याचा त्याचा प्रश्‍न आहे. पण माणूस म्हणून मिळालेल्या भावनांच्या अनुभवापासून आपण वंचित होत आहोत काय, हा खरा प्रश्‍न आहे. शेगावचा अनुभव एक निमित्त आहे, पण भावनांच्या बाबतीत आपण नॉट रिचेबल होत आहोत काय? फिलिंग, संवेदना, भावना अनुभवणे, त्या मोकळेपणी व्यक्त करणे, हेच तर माणसाचे वैशिष्ट्य आहे. आज त्याला औपचारिकता, कृत्रिमता, दिखावूपणा, यांत्रिकता व गॅझेट्‌सचे ग्रहण लागले आहे.
आपण सुखी व खूप आनंदी असल्याचा माणसं मुखवटा घालतात. कोणत्याही गोष्टींचे भडक प्रदर्शन करतात. पार्ट्या करतात. मेकअप बिघडणार नाही, अशा बेताने बाहुल्या मिरवतात. सर्वत्र हसरे चेहरे दिसतात. आपली प्रतिमा जोपासण्याचा अट्‌टहास. पण हे सर्व मुखवटे काढून मन मोकळे करणारा संवाद मात्र दिसत नाही. जेथे निःसंकोच पूर्णपणे व्यक्त होता येईल, अशी नाती दुर्मिळ होत आहेत. फ्रेंडशिपची यादी मोठी आहे. जगाच्या आपण संपर्कात आहोत. पण शेजार्‍याचे दुःख मात्र आपल्याला जाणवत नाही. हे तंत्रज्ञान आतून आपल्याला पोकळ तर करत नाही ना? ‘श्यामची आई’ पाहिल्यानंतर मुलांच्या डोळ्यात पाणी येईल की नाही याची आता शंका वाटते? स्वा. सावरकर यांचे जन्मस्थान असलेल्या भगूरला गेलो होतो. ते स्थान पाहून माणूस गहिवरून जातो. त्याच वेळी तेथे एक सहल आली होती. येथे पाहण्यासारखे काहीच नाही, म्हणून काही तरुणांची कुरकुर सुरू होती. भावनांचा गहिवर आणणारे, शरीरावर रोमांच उभे करणारे क्षण अनुभवण्याची क्षमताच कमी होत आहे काय?
एका मुलाच्या शाळेतून पालकांना भेटण्यासाठी निरोप आला. पालकांचा मुलाला पहिला प्रश्‍न असतो, त्याने शाळेत काय गोंधळ घातला. बॉसने कर्मचार्‍याला केबिनमध्ये बोलावले तर बाहेर आल्यावर पहिला प्रश्‍न असतो, काय गडबड झाली. कौतुक करण्यासाठी बोलाविले असेल, असे आपल्या मनात येतच नाही. असे का? कारण कुणाचे तरी मनापासून कौतुक करणे, एखाद्या गोष्टीला दाद देणे, कृतज्ञता व्यक्त करणे, त्यामुळे त्याला झालेला आनंद अनुभवणे, ही मानवी गरज असते, इमॅजिनने ती पूर्ण होत नाही. व्यावसायिक जीवनात शिष्टाचार म्हणून हे केले जाते. रोजच्या जीवनातही असे कितीतरी प्रसंग येतात, पण त्याची आपल्याला जाणीव नसते. एका मित्राने महागडी म्युझिक सिस्टिम घेतली. एकदा सहज त्याला विचारले, त्याचा काही उपयोग होतो की नाही? पण एकदाही त्याने गाणे ऐकले नव्हते. छान पाऊस सुरू आहे, अशा वेळी जगजितसिंगांची एखादी गझल अवर्णनीय आनंद देते. व्यवस्था आहे पण ती फक्त दाखविण्याकरिता. आपण स्वतःलाच फसवत आहोत काय? घरात सर्व अद्ययावत सुविधा आहेत. गॅझेट्‌स, फर्निचर, सजावट सर्व आहे पण हृदयाला श्रीमंत करणारे अंतःकरणातले पाणी आटत चालले आहेत काय? त्यामुळे नात्यांचे रंग उडत चालले आहेत. प्रेम, दया, क्षमा, आपुलकी, माया, जिव्हाळा याऐवजी कोरडेपणा, दुरावा, वैताग याचाच अनुभव जास्त येतो. रडणारा, हसणारा, सहज कुणाच्या पाठीवर हात ठेवणारा, नैसर्गिक साधा सरळ माणूस आहे कोठे? तंत्रज्ञानाने, चंगळवादाने, मी माझे या अति व्यक्तिवादी विचाराने त्याची शिकार केली आहे. संवेदनशीलता किंवा भावुकता म्हणजे दुर्बलता नव्हे, ती त्याच्यातल्या माणूसपणाची खूण आहे. या विचित्र परिस्थितीत माणसांची भावनिक कोंडी, कुचंबना होत आहे. मानसिक तणाव वाढण्याची कारणेही यातच दडली आहेत. आज निसर्गाचे व वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन करण्याचे प्रयत्न सुरू आहे. असेच भावनांची खोली जाणवणार्‍या मानवाचे संरक्षण करण्याची वेळ येऊ नये म्हणजे झाले.
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११