हवाई दलाची युद्धसज्जता : चिंतेचा विषय

0
105

राष्ट्ररक्षा
विमानांचा अपघात चिंतेचा
हवाई दलाच्या विमानांचे दोन मोठे अपघात १४ मार्च रोजी झाले. त्यात सुखोई ३०एमकेआय हे लढाऊ विमान अपघातग्रस्त झाले. त्याच दिवशी चेतक हेलिकॉप्टरही अपघातग्रस्त झाले. या अपघातांमध्ये पायलट बचावले. मात्र, जिथे हे अपघात झाले त्या जमिनींवर सामान्य माणसे मात्र जखमी झाली. दोन्हीपैकी सुखोई हे विमान अत्याधुनिक समजले जाते. त्या आधीचे अपघात हे मिग या जुन्या विमानांचे होत असत. मात्र, हवाई दलातील सर्वात अत्याधुनिक समजले जाणार्‍या विमानांचा अपघात होतो तेव्ही ती नक्कीच चिंतेची बाब आहे. जेवढी विमाने पाकिस्तानबरोबरील लढाईमध्ये अपघातग्रस्त झाली नाहीत त्याहून जास्त विमाने शांतता काळात अपघातग्रस्त झाली आहेत. १९७० पासून हवाई दलातील सर्व प्रकारांची १३०० विमाने अपघातग्रस्त झालेली आहेत. यामध्ये ५०० हून अधिक मिग फायटर, १५० हून अधिक चिता आणि चेतक ही हेलिकॉप्टर्स सामील आहेत. २०११ पासून ६० विमाने अपघातग्रस्त झाली आहेत. ज्यात जमिनीवर कोसळल्याने ८० हून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. २०१३-१४ मध्ये २३ फायटर विमाने आणि १० हेलिकॉप्टर्स आणि तीन इतर विमाने अपघातग्रस्त झाली आहेत. त्याशिवाय उत्तराखंडात आलेल्या पुरामध्ये एक मि-८ विमान अपघातग्रस्त झाल्याने त्यातील वीस कर्मचारी एकाच वेळी मृत्युमुखी पडले. अत्याधुनिक सी१४० चे सुपर हर्क्युलिस एअर क्राफ्ट हे २०१४ मध्ये अपघात ग्रस्त झाले होते. हे अमेरिकेतून आयात केलेले विमान होते. त्यात पाच पायलट आणि इतर कर्मचारी मृत्युमुखी पडले.
सुखोई ३० एमकेआयचे अपघात
सुखोई ३०-एमकेआय या लढाऊ विमानाला १४/१०/२०१४ ला पुण्याजवळ अपघात झाला. हे विमान प्रशिक्षणार्थी वैमानिकाकडून चालवले जात होते. सुखोई विमान सुरक्षित मानले जाते; परंतु या विमानांना अलीकडे अपघात होऊ लागला आहे. हे विमान तांत्रिकदृष्ट्या सक्षम आणि निर्दोष आहे; अपघात झाला म्हणून पूर्ण विमानावरचा विश्‍वास उडण्याची काही गरज नाही. झालेले अपघात विमान उड्डाण सुरू असताना अचानक, अनपेक्षितपणे निर्माण झालेल्या तांत्रिक दोषामुळे किंवा वैमानिकांच्या चुकीमुळे झाले असावेत. म्हणून याची कसून चौकशी झाली पाहिजे. भारताने रशियाकडून खरेदी केलेल्या सुखोई ३० या लढाऊ विमानांपैकी पाचव्या विमानाला झालेल्या अपघातानंतर या २०४ विमानांचे उड्डाण थांबविण्यात आले होते.
अपघाताची कारणे
हे असे का होते आहे त्याला अनेक कारणे आहेत. अजूनही हवाई दलातील पायलटना मिग २१, चिता, चेतक ही जुनाट झालेली विमाने चालवावी लागतात. विमाने जुनाट असल्याने अपघाताची शक्यता अधिक असते. ही जुनाट विमाने लवकरात लवकर बदलण्याची गरज आहे. मात्र, संरक्षण दलासाठी असलेली अर्थसंकल्पीय तरतूद कमी असल्याने या जुनाट विमानांची बदली कमी वेगाने होत आहे. अजूनही मिग विमाने हवाई दलातून बाद करण्यासाठी पुष्कळ वर्षे लागणार आहेत. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विमानांच्या देखभालीची गुणवत्ता वाढवण्याची गरज आहे. विमानांच्या अपघातांची तुलना प्रगत राष्ट्रांमध्ये होणार्‍या विमान अपघातांशी करतो तेव्हा त्याच प्रकारच्या विमानांचे अपघात भारतात अधिक प्रमाणात होतात. त्याचे मुख्य कारण विमानांचे देखभाल व्यवस्थापन. त्यात सुधारणा होण्याची गरज आहे. दुसरे महत्त्वाचे कारण म्हणजे विमानांचे सुटे भाग. ते बदलावे लागतात. दुर्दैवाने हे सर्व सुटे भाग अजूनही परदेशातून म्हणजे रशिया किंवा अमेरिका इथून आयात करावे लागतात. या सुट्या भागांची कमतरता भासल्याने अपघातांचे प्रमाण वाढते. त्याव्यतिरिक्त महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैमानिकांचे प्रशिक्षण. काही अपघातांमध्ये मानवी चुका होतात. त्यासाठी वैमानिकांच्या प्रशिक्षणासाठी विविध प्रकारची एअरक्राफ्ट हवाईदलात आणण्याचा प्रयत्न करीत असतो. मात्र प्रगत जेट ट्रेनर हे विमान लवकरात लवकर हवाई दलात सामील करायला हवे.
आधुनिक विमान
सुखोई ३१ एमकेआय हे हवाई दलातील सर्वांत आधुनिक आणि कोणत्याही कामगिरीसाठी अत्यंत उपयुक्त विमान आहे. सध्या अशी २०४ विमाने हवाई दलात आहेत, आणखी ६८ पुढील दोन वर्षांत दाखल होणे अपेक्षित आहेत. भारताने १९९० साली रशियाशी या विमानासाठी करार केला आणि २००२ पासून भारतीय हवाई दलामध्ये या विमानाचा शिरकाव झाला. या विमानाचे तंत्रज्ञान रशियाने विकसित केलेले आहे आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारावर भारतामध्ये हे विमान बांधले जाते. २००२ सालापासून सुखोई ६० विमाने देशातच तयार करून भारतीय नौदलात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय हवाई दल (आयएएफ) जगातील चौथ्या क्रमांकाची सर्वांत मोठी असून, संरक्षण साहित्याच्या वाढलेल्या किमती व विलंबाने होत असलेल्या साहित्याचा पुरवठा या सर्व अडचणींवर मात करून जास्तीतजास्त स्वदेशी बनावटीची उपकरणे विकसित करण्यात अयशस्वी होत आहे. सोव्हिएत संघाच्या फाळ्णीनंतर मिग विमानांचे सुटे भाग मिळणे बंद झाल्यामुळे भारतीय वायुसेनेची संरक्षणसिद्धता सातत्याने घटत गेली. ऐंशीच्या दशकात चाळीस लढाऊ स्क्वाड्रनपर्यंत पोचलेली भारतीय वायुसेनेची मारक क्षमता आता ३१ पर्यंत घटली आहे.
विमानांची काळजी आणि देखभाल
अपघातांमुळे विमानांची संख्याही कमी होते, एवढेच नव्हे, तर कोणत्याही विमानाचा अपघात होतो तेव्हा त्या श्रेणीतील सर्वच विमाने ग्राऊंड करून त्यांची पूर्ण तपासणी होईपर्यंत उड्डाणे थांबवून विमानतळावरच ठेवली जातात. म्हणजेच अचानक गरज पडल्यास ती लढाईकरता उपलब्ध नसतात. त्या सगळ्या विमानांचा तांत्रिक अवस्था तज्ज्ञांकडून तपासून घेतली जाते. त्यामुळे पुढील अनेक महिने सर्वच सुखोई विमाने उड्डाण करू शकणार नाहीत. त्यांची नवीन पुनर्तपासणी केली जाईल.
हवाई दलासमोरील सर्व आव्हाने स्वीकारून हवाई दलाच्या अपघातांचे प्रमाण कमी करण्याचा प्रयत्न करु असे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी म्हटले होते. आता नव्या अपघातांमुळे हे प्रमाण कमी झाल्याचे दिसून येत नाही. हवाई दलासमोरील अपघातांचे आव्हान कमी अपघातांचा दर कमी करायला हवा. कारण एक विमान कोसळते तेव्हा देशाचे दोनशे ते अडीचशे कोटी रुपयांचे नुकसान होते. त्यामुळे अशा प्रकारच्या महागड्या विमानांची काळजी आणि देखभाल करणे महत्त्वाचे आहे.
कोर्ट ऑफ चौकशी
वायुदलाकडे असलेली विमाने युद्धाच्या दृष्टीने दोन विभागांमध्ये विभागली असतात. एका विभागात सुखोई २९, मिग, जग्वार यांसारखी फायटर एअरक्राफ्टचा समावेश होतो. तर दुसर्‍या विभागात साहित्यसामग्री किंवा सैनिकांची ने-आण करण्यासाठी वापरली जाणारी एएन-३२, आयएल-७६, किंवा हर्क्युलीस या विमानांचा समावेश होतो. याखेरीज जवळपाच्या प्रवासासाठी हेलिकॉप्टर्सचा वापर केला जातो.
रशियाचे विभाजन झाल्यानंतर या विमानांची देखभाल-दुरुस्ती करणे फार कठीण झाले होते. या विमानांचे आयुष्य वाढविण्याकरिता त्यांचे पुन्हा ओव्हरऑल सुरू झालेले होते. अशा प्रकारचे ओव्हरऑल झाल्यानंतर त्यांचे आयुष्य १० ते १५ वर्षांनी वाढू शकते. आधुनिकीकरण केलेल्या विमानामध्ये अनेक नवीन उपकरणे बसवली जातात. यामध्ये विमानाचा बाहेरचा ढाचा मजबूत करणे, जीपीएस, वातावरणावर लक्ष ठेवण्यासाठी रडार आणि इतर अनेक आधुनिक उपकरणांचा समावेश होतो.
हवाई दलाचे कुठेलही विमान उड्डाण करण्यापूर्वी ते सुरक्षित आहे असे प्रमाणपत्र मिळाल्यानंतरच उड्डाण केले जाते. म्हणून सुरक्षिततेबाबत कोणतीही शंका असेल तर त्या विमानाला उड्डाणासाठी परवानगी मिळत नाही. कोणताही अपघात हा दुर्दैवी असतो आणि त्यामुळे अपघाताचे समर्थन करता येणार नाही. पण तरीही अपघातांचा हा दर सामान्य समजला जातो. विमानाचा अपघात नेमका कशामुळे झाला हे समजण्यासाठी त्याची कोर्ट ऑफ चौकशी होईल आणि त्यातून नेमके कारण समोर येईल.
अपघात तीन कारणांमुळे
मागील अनुभवांचा विचार करता सामान्यतः विमानाचे अपघात तीन कारणांमुळे होतात. एक म्हणजे, तांत्रिक बिघाड, दुसरे म्हणजे वैमानिकाची चूक आणि तिसरे म्हणजे वातावरणातील बिघाड. वातावरणीय बिघाडांवर मनुष्याचे नियंत्रण नसते. काही वेळा अचानकपणाने सोसाट्याचा वारा येतो, वादळ येते, प्रचंड प्रमाणात पाऊस पडतो अशा वेळी विमान चालवणे धोकादायक होऊ शकते. ताज्या दुर्घटनेबाबत तसे काहीच समोर आलेले नाही. म्हणून वातावरणीय बदलामुळे विमानाचा अपघात झाला असण्याची शक्यता कमी आहे. तसेच पायलटकडून काही चूक झाल्याचेही दिसत नाही. त्यामुळे काही तांत्रिक बिघाडामुळे या विमानाचा अपघात झाला असण्याची शक्यता जास्त आहे. उड्डाणांच्या सुरक्षिततेवर या अपघाताने प्रश्‍नचिन्ह निर्माण केले आहे. या विमानांच्या सर्व तांत्रिक बाबी नव्याने तपासल्या जाव्यात. या पुनर्तपासणीनंतर विमानामध्ये कोणताही तांत्रिक दोष नाही असे समोर आले तरच या विमानांना पुन्हा उड्डाणाची परवानगी मिळू शकेल.
ही विमाने आपल्या देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे या अपघाताची तातडीने चौकशी करून, त्याच्या कारणांचा चांगल्या पद्धतीने शोध घेऊन त्यानुसार इतर विमानांची तपासणी झाली पाहिजे. तरच आपली शस्त्रसिद्धता आणि संरक्षणसिद्धता पुन्हा एकदा सुरक्षित पातळीवर पोहोचेल.
तंत्रज्ञान हे दिवसागणिक बदलत चालले आहे. त्यामुळे त्यानुसार सातत्याने सुधारणा करणे आवश्यक आहे. गेल्या काही वर्षांत हवाईदलाने काही चांगल्या सुधारणा केल्या आहेत; परंतु त्याला अधिकाधिक गती देण्याची गरज आहे. सध्याची केंद्राची धोरणे त्यादिशेने सकारात्मक वाटत आहेत. थेट परकीय परदेशी गुंतवणुकीच्या जोडीलाच खासगी कंपन्या व त्याच्या जोडीला लघु व मध्यम उद्योगांच्या सहभागातून क्षमता विकसित करण्याच्या प्रयत्नांना गती देता येईल. त्यामुळे चांगली उत्पादने मिळतील व सेवा चांगली मिळेल, अशी आशा आहे. हवाईदलाची क्षमताही संख्येने व सशस्त्रतेने वृद्धिंगत करत नेणे, ही काळाची गरज आहे
युद्धसज्जता आणि क्षमता
त्यातही मिग विमानांच्या काही स्क्वाड्रन जमेस धरलेल्या असल्याने त्या खास भरवशाच्या म्हणता येणार नाहीत. चीनने आपल्या एकूण लष्करी सामर्थ्यात, अमेरिकेसारख्या महाशक्तीलाही चिंतित करण्याएवढी वाढ केली आहे. चीनचे मनसुबे पाहिले, तर भारताचा वचक निर्माण करण्यासाठी क्षमता वाढवावीच लागेल. १२६ वैमानिकांना बहुआयामी लढाऊ विमाने देणे हा हवाईदलाचा सर्वात मोठा विकास कार्यक्रम आहे. या विमानांचे आगमन २०१७-२० मध्येच शक्य आहे.
वैमानिकांची, विमानांची आणि हवाई दलाची युद्धसज्जता, हे तिन्ही घटक एकमेकांशी संलग्न आहेत. भारतीय हवाई दलाच्या ताफ्यातल्या महत्त्वाच्या लढाऊ विमानाच्या अपघाताचं विश्‍लेषण करत असतानाच हवाई दलात सेवा करणार्‍या सर्वच लढाऊ विमानांच्या अत्याधुनिकीकरणाचाही तितक्याच गांभीर्यानं विचार केला पाहिजे.