साप्ताहिक राशिभविष्य

0
1076

रविवार, २६ ते १ एप्रिल २०१७
सप्ताह विशेष
• सोमवार, २७ मार्च- दर्श सोमवती अमावास्या (प्रारंभ- सकाळी १०.४२); मंगळवार, २८ मार्च- अमावास्या समाप्त- सकाळी ८.२४, दुर्मुख नाम संवत्सर समाप्ती, (प्रतिपदा क्षयतिथी- ८.२४ ते २९.४२), नूतन हेमलंबी नाम संवत्सरारंभ, गुढीपाडवा, अभ्यंगस्नान, ध्वजारोहण, गुढी उभारणे, चैत्री व श्रीराम नवरात्रोत्सवारंभ (सकाळी ८.२४ नंतर), श्री बाबाजी महाराज पुण्यतिथी- लोधीखेडा, आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार जन्मदिन; बुधवार, २९ मार्च- अक्कलकोट श्री स्वामी समर्थ महाराज जन्मदिन; गुरुवार, ३० मार्च- गौरीतृतीया, मत्स्यजयंती, हरिहर महाराज त्याडी पुण्यतिथी- अमरावती, रज्जब (मुस्लिम-७) मासारंभ; शुक्रवार, ३१ मार्च- विनायक चतुर्थी, गोमाजी महाराज यात्रा- नागझरी (अकोला); शनिवार, १ एप्रिल- श्री जगदंबा देवी यात्रा- आष्टा (नांदेड), श्री पुंडलिक बाबा जन्मदिन- मूर्तिजापूर, श्री पहाडसिंग महाराज यात्रा, पारखेड (खामगाव)

मेष : कार्यक्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल
आपला राशिस्वामी मंगळ अजूनही राशिस्थानातच आहे. त्यामुळे सध्या आपणांस एकप्रकारची सुलभता सर्वत्र अनुभवास येत आहे. षष्ठातील गुरू आपला अर्थत्रिकोण मजबूत करीत असल्याने या आपली आर्थिक स्थिती उत्तम असणार आहे. त्यावर चंद्राचे लाभस्थानातून धनस्थानापर्यंत होणारे भ्रमण एकप्रकारे पुष्टीच देत आहे. कार्यक्षेत्रात आपले वजन निर्माण होईल. प्रतिष्ठा वाढेल. अधिकारी वर्गाची मर्जी संपादन करता येईल. व्ययस्थानातील रवि-बुध-शुक्र कुटुंबात आठवड्याच्या मध्यात काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण करू शकतात. काहींना प्रकृतीची काळजी घ्यावी लागू शकते. रोगस्थानावरील शनीची दृष्टी म्हणूनच तापदायक आहे. पंचमात असलेला राहू संततीविषयक काही चिंता निर्माण करू शकतो. शुभ दिनांक- २६, ३०, ३१.
वृषभ : कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती
आपला राशिस्वामी शुक्र लाभ स्थानात रवि, बुध व हर्शलसोबत आहे. तो आपल्या कार्यक्षेत्रात उत्तम स्थिती निर्माण करणारा आहे. उच्च शुक्र काहींना उत्तम कौटुंबिक जीवन या आठवड्यात उपलब्ध करून देईल. काही युवा मंडळींना विवाहासंबंधाने चांगले योग येऊ शकतात. व्ययात असलेला मंगळ आकस्मिक खर्च उभा करून परीक्षा पाहू शकतो. अष्टमातला शनी दुखापत, जुन्या आजारांना बळकटी देऊ शकतो. महत्त्वाच्या कामांमध्ये विलंब करण्याची जबाबदारीदेखील तो पार पाडू शकतो. वादविवाद, भांडणे यापासून दूरच रहावयास हवे. दरम्यान, या सार्‍यांवर मात्र हळुवार फुंकर घालून दिलासा देण्याची, आपली उमेद कायम ठेवण्याची कामगिरी पंचमातील शुभसूचक गुरू पार पाडणार आहे. शुभ दिनांक- २७, २८, २९.
मिथून : प्रतिमा उजळून निघावी
आपला राशिस्वामी बुध लवकरच रवि व शुक्राची साथ सोडून दशमातून लाभस्थानी येणार असल्याने आपणांस कार्यक्षेत्रात बरीच अनुकूलता लाभणार आहे. याशिवाय गुरू सुखस्थानातून दशमातील रवि-शुक्राला बळ देऊन आपल्या कार्यशैलीचा ठसा निर्माण करू शकतील. हाती घेतलेल्या कामांमध्ये उत्तम यश मिळू शकेल. लाभातील मंगळ व सप्तमात असलेला शनी आपणांस त्यासाठी पुरेशी मेहनत घेण्याचे बळ देतील. प्रयत्नातील सातत्य टिकवून ठेवले तर आपली प्रतिमा उजळून निघावी असेच हे योग आहेत. पराक्रमातील राहू काहींना प्रवासाचे, तीर्थाटनाचे योग देऊ शकतो. विदेशी जाऊ इच्छिणार्‍यांना त्या दिशेने प्रयत्न करावयास सध्याचा काळ बराच अनुकूल आहे. शुभ दिनांक- २६, ३०, १.
कर्क : प्रकृतीची काळजी घ्या
आपला राशिस्वामी चंद्र अष्टम स्थानातून भ्रमण सुरू करीत असल्याने या आठवड्यात आपणांस सर्वच कार्यात विशेष दक्षता बाळगण्याची गरज आहे. धनातील राहू, षष्ठातील शनी आणि दशमातील मंगळ काही लोकांना प्रकृतीविषयक काळजी घेण्याची सूचना देत आहेत. विशेषतः उष्णतेच्या अपायांपासून दूर रहावयास हवे. काहींना कौटुंबिक सुखातही कमतरता अनुभवास येऊ शकते. पराक्रमातील गुरू आणि भाग्यातील रवि, बुध व शुक्र परिस्थिती सावरण्याचा प्रयत्न करू शकतात. ते या दिशेने आपल्या प्रयत्नांना बळ देऊ शकतात. अष्टमात असलेला केतू आपणांस सर्वतोपरी जिभेवर ताबा ठेवण्यास सुचवत आहे. कठोर बोलून कोणास दुखवू नका. भांडणांपासून दूर रहावे. खाण्या-पिण्यावरही नियंत्रण हवे. शुभ दिनांक- २८, २९, ३०.
सिंह : कार्यक्षेत्रात अडचणी संभव
आपला राशिस्वामी रवि सध्या अष्टम स्थानात बुध व शुक्रासोबतआहे. राशीत राहू आहे. या योगामुळे आपणांस कार्यक्षेत्रात काहीशा अडचणी, आर्थिक कुचंबणा, प्रकृतीची कुरबूर असले त्रास सहन करावे लागू शकतात. आपली कामे प्रलंबित राहू शकतात. यामुळे आपणास मानसिक ताण-तणाव सहन करावा लागू शकतो. धनेश बुध अष्टमातून बाहेर पडल्यानंतर आर्थिक बाबतीत आपणांस काहीसा मोकळा श्‍वास घेता येऊ शकेल. धनातील गुरू त्यास बळकटी देईल. पंचमात असलेला शनी कौटुंबिक सुखात बाधा निर्माण करू शकतो. भाग्यातील मंगळ आठवड्याच्या अखेरीस अचानक चांगली संधी पुढ्यात आणून देईल. या संधीचा लाभ घेतला पाहिजे. संघर्षाच्या या काळात काहीसा दिलासा निश्‍चित मिळेल. शुभ दिनांक- २६, ३०, ३१.
कन्या : कार्यक्षेत्रात तणाव, असमाधान
आपला राशिस्वामी बुध सुरुवातीला सप्तमस्थानी रवि, शुक्र व हर्शलसोबत असला तरी तो लवकरच अष्टमात जाणार आहे. त्यामुळे गेल्या काही काळापासून आपल्या राशीत असलेल्या गुरूच्या बुधावरील शुभ दृष्टीचा जो शुभ परिणाम आपण अनुभवीत होता, त्यात आता कमतरता येणार आहे. सुखस्थानातील शनी आपल्या कार्यक्षेत्रात काही तणाव, असमाधान निर्माण करू शकतो. अधिकार्‍यांसोबत वादविवाद होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अष्टमात असलेला मंगळ आणि व्ययातील राहू प्रकृतीला हानिकारक ठरत आहेत. छोट्या-मोठ्या पडझडीच्या घटना घडू शकतात. त्यातून मोठे काही उद्भवू नये याची खबरदारी घेतली पाहिजे. चंद्राचे भ्रमण आपल्यासाठी संमिश्र स्वरूपाचे राहील.
शुभ दिनांक- २७, २८, २९.
तूळ : मनोवांछित घटनांमुळे आनंद
राशिस्वामी शुक्र अजूनही षष्ठात रवि आणि बुधासोबत आहे. तो उच्च आहे आणि गुरूच्या दृष्टीने पुलकित असल्याने हा शुक्र युवावर्गाला नोकरी, व्यवसाय व काहींना विवाहासाठी उपयुक्त योग आणू शकतो. सप्तमातला मंगळ त्या योगांना अवचित, झटपट, अकल्पितपणे घडण्याची किमया प्रदान करू शकतो. योगकारक शनी पराक्रमात बसून भाग्याची साथ मिळवून देत आहे. त्यामुळे या मनोवांछित घटनांमुळे आनंद व उत्साहाचे वातावरण राहील. कुटुंबात मंगलकार्यामुळे पाहुणे व कार्यक्रमांची रेलचेल राहू शकेल. शिक्षण-नोकरीसाठी विदेशात जाण्याची योजना आखणार्‍यांसाठी हा काळ उत्तम आहे. प्रयत्न, हालचालींना वेग द्यावा. चंद्राचे पंचमातून सुरू होणारे भ्रमण या योगांना बळकटी देईल.
शुभ दिनांक- २६, २८, ३०.
वृश्‍चिक : फायदेशीर आर्थिक व्यवहार
साडेसातीच्या प्रभावातून आपण अद्याप मुक्त झालेले नाही. राशिस्वामी मंगळ षष्ठातच ठाण मांडून बसला असल्यामुळे आपल्या विरोधकांना डोके वर काढता यायचे नाही. त्यामुळे निदान आपल्या नोकरी किंवा व्यवसायाच्या ठिकाणी सध्या शांततेचे वातावरण असावे. धनेश गुरू लाभस्थानातून आपला आर्थिक डोलारा सांभाळण्यास समर्थ आहे. आपले सर्व आर्थिक व्यवहार सुयोग्य फायदा मिळवून देऊ शकतात. पंचमातील रवि, बुध आणि शुक्र व्यावसायिक व विशेषतः शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांसाठी मदतगार ठरावेत. कला, क्रीडा व साहित्य क्षेत्रातील व्यक्तींनाही प्रगतीचे नवे दालन उघडे करून देण्यास समर्थ आहेत. चंद्र सुखस्थानातून सप्तमापर्यंत साखरपेरणी करीत जाणार आहे.
शुभ दिनांक- २८, ३१, १.
धनू : प्रतीक्षा करावी लागणार
राशिस्वामी गुरू दशमातून सुखदायक योग देण्याच्या प्रयत्नात असतानाच साडेसातीकारक शनी राशिस्थानातून विलंब व कष्टसाध्यतेचे योग निर्माण करीत आहे. यामुळे आपली कामे सध्या तरी झटक्यात यशस्वी व्हायची नाहीत. मेहनत व प्रतीक्षा करावी लागणार. व्ययेश मंगळ पंचमातून संततीविषयक काहीसे चिंतेचे वातावरण निर्माण करीत आहे. तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करणार्‍यांनी या आठवड्यात जरा सावधपणेच निर्णय घ्यावेत. सुखस्थानातील रवि, बुध व शुक्र कुटुंबात आनंद व विरंगुळा देणारे काही प्रसंग निर्माण करू शकतात. भाग्यातील राहू अध्यात्म व धार्मिकतेकडे ओढा वाढवू शकतो. तीर्थयात्रा, प्रवास, काहींना विदेशाची एखादी वारी या काळात घडू शकते.
शुभ दिनांक- २६, २९, ३०.
मकर : प्रगती-रथ पुढे जाणार
राशिस्वामी शनी व्ययस्थानातून आपणासमोर खर्चाचे अनेकानेक प्रसंग उभे करणार आहे. साडेसातीत असा धनक्षय होत असला तरी भाग्यस्थानातून येणारी गुरूची दृष्टी त्या खर्चातही सचोटी आणि समाधान निर्माण करणारी राहील. त्यामुळे खर्च अनावश्यक न वाटता तो सत्कारणी लागल्याचे समाधान मिळेल. उत्सव व सणांच्या निमित्ताने एखादी मोठी खरेदी घडू शकते. पराक्रमातील रवि, बुध व शुक्र आणि चतुर्थातील मंगळ वाहन, घर, जमीन यांच्या खरेदीच्या शक्यतेकडे अंगुलीनिर्देश करीत आहेत. धनस्थानातून प्रवास सुरू करणारा चंद्र या योगांना बळ देणार. व्यवसाय विस्ताराच्या योजना आकारास येतील. नोकरीत आपल्या कामांना, कौशल्यांना दाद मिळेल. प्रगती-रथ पुढे जाणार.
शुभ दिनांक- २६, २८, २९.
कुंभ : अविरत झटण्याची क्षमता
राशिस्वामी शनी लाभस्थानातून आपल्यासाठी अतिशय अनुकूल स्थिती निर्माण करीत असतानाच सप्तमातील राहू व अष्टमातील गुरूने असहकार पुकारलेला आहे. यामुळे आपणास स्वकर्तृत्वाच्या बळावरच यश गाठावे लागणार आहे. धनस्थानातील रवि, बुध व शुक्र काही उत्तम योग निर्माण करून देणार असून, पराक्रमातील मंगळ अविरत झटण्याची क्षमता देईल. आपल्याच राशीतून या आठवड्याचा प्रवास सुरू करणारा चंद्र वेळोवेळी मनोबल वाढवीत राहील. तो आपणांस नाउमेद होऊ देणार नाही. दरम्यान, जुनी दुखणी असणार्‍या व्यक्तींचा त्रास आठवड्याच्या मध्यात काहीसा वाढू शकतो. त्यांनी वेळीच औषधोपचार व डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. एखादी खरेदी वा जमिनीचे व्यवहार संभवतात. शुभ दिनांक- २६, २७, २८.
मीन : आर्थिक व्यवहारात सावध
राशिस्वामी गुरू सप्तम स्थानातून आपल्या राशीला उत्तम बळ देत असला तरी राशिस्थानात जमलेल्या शुक्र, रवि, बुध यांनी जरा विचित्र स्थिती निर्माण केली आहे. षष्ठातील राहू विरोधकांचा उपद्रव वाढवीत असतानाच दशमातील शनी नोकरी-व्यवसायात काहीसे असमाधानाचे वातावरण निर्माण करू शकतो. महत्त्वाच्या वस्तू गहाळ होणे, चोरी होणे वा वस्तू हरवण्याच्या घटना संभवतात. आर्थिक व्यवहारात सावध राहिले पाहिजे. दरम्यान, कुटुंबात असमाधान व कलहाचे वातावरण राहू शकते. विशेषतः ज्येष्ठ महिलावर्गाच्या आरोग्याबाबतही चिंता निर्माण होऊ शकते. या आठवड्यात काहींना आरोग्यासंबंधात छोटा-मोठा खर्च करावा लागू शकतो. या सार्‍यात चंद्राचे अनुकूल भ्रमण मनाला उभारी देत राहील. शुभ दिनांक- २८, २९, ३०.
• मिलिंद माधव ठेंगडी (ज्योतिषशास्त्री)/ ८६००१०५७४६