उंच माझी गुढी

0
251

कथा

राजाभाऊ उपाध्ये, म्हणजे आमच्या कॉलनीतलं एक आगळं-वेगळं व्यक्तिमत्त्व! वय असेल पासष्टच्या जवळपास. अल्पबचत अधिकारी म्हणून ते सेवानिवृत्त झाले होते. पण निवृत्त झाल्याचं एक लक्षण त्यांच्यामध्ये दिसत नव्हतं. त्यांची तडफ आणि कार्यक्षमता… तरुणांनाही मागे टाकणारी होती. काही न करता, रिकामे बसलेले राजाभाऊ आमच्या कोणाच्या पाहण्यात नव्हते. आमच्या कॉलनीत कोणताही धार्मिक, सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रम किंवा उत्सव हा राजाभाऊंच्या प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सहभागाशिवाय पार पडत नसे! निसर्गाने तर त्यांना चांगली प्रकृती बहाल केली होतीच, पण ती प्रकृती त्यांनी प्रयत्नपूर्वक चांगली ठेवली होेती. रोज सकाळी मॉर्निंग वॉक, घरी आल्यावर योगासन, प्राणायाम, झेपेल असा व्यायाम ते नियमितपणे करीत असत. त्यांचा बोलण्याचा आवाजही बुलंद म्हणता येईल, असाच होता.
रस्त्याने जाताना, रस्त्यावरूनच एखाद्या गृहस्थांना त्यांनी मोठ्याने हाक मारली; की लगेच ते गृहस्थ घरातून लगबगीने रस्त्यावर हजर व्हायचे. राजाभाऊंचे घर माझ्या घराच्या गल्लीच्या पुढच्या समांतर गल्लीत होते. एक दिवशी ते मला रस्त्यातच भेटले म्हणाले, ‘‘मी तुमच्या घरीच येणार होतो. पण आता तुम्ही भेटलेत तर इथेच बोलतो. त्याचं असं आहे, की आता परवाच्या दिवशी गुढीपाडवा आहे ना; तर त्या दिवशी तुमच्या कडची गुढी उभारणी करून माझ्याकडे अकराच्या सुमारास या.’’
मी विचारता झालो, ‘‘गुढीपाडव्याच्या दिवशी? सकाळी? का… काही विशेष?’’
‘‘तुम्ही या तर खरं. आणखी शेजारच्या काही मंडळींना बोलावलं आहे मी. तेव्हाच बोलविण्यामागचं प्रयोजन मी सांगीन.’’
गुढीपाडव्याच्या दिवशी, स्नान, पूजा, अर्चा आटोपून आणि गुढी उभारून मी राजाभाऊंच्या घरी पोहोचलो. इतर मंडळी पण आलेली होती. राजाभाऊ, त्यांचे कुटुंब आणि मुले, लगबगीने गुढी-उभारणीची तयारी करण्यात व्यस्त दिसली. अंगण; सडासंमार्जन आणि रांगोळ्यांनी नटलेले होते. गुढी उभारण्याच्या जागेवर एक छोटी, सुंदर रांगोळी काढलेली.
सर्वसाधारण गुढींच्या काठीपेक्षा राजाभाऊंकडच्या गुढीची काठी बरीच उंच होती. ती बाहेर आणल्यावर लगेच मुला-सुनांनी तिला सजवायला सुरुवात केली. चटकदार लाल रंगाचा बुट्टेदार शालू, त्यावर मॅचिंग ब्लाऊज, गजरा, मोठ्या पदकांची गाठी, कडुनिंब-आंब्याच्या डहाळी लावलेल्या आणि वर स्वच्छ, घासलेला चकचकीत तांब्याचा कलश विराजमान! असा राजाभाऊंच्या गुढीचा थाट होता! राजाभाऊ उभे राहून हे सर्व कौतुकाने पाहात होते. गुढी उभारण्यासाठी सज्ज झाल्यावर राजाभाऊ स्वतः पुढे आले आणि त्यांनी स्वतःच गुढी उभारण्याचे काम पूर्ण केले. मुलांनी त्यांना मदत केली. तिघांच्याही डोक्यावर टोप्या होत्या. दोघी सुनांनी आणि अन्य उपस्थित सुहासिनींनी गुढीची पूजा केली. तिला ओवाळले. नैवेद्य दाखविला.
नंतर राजाभाऊंनी आम्हा उपस्थितांना घरात बोलाविले. मोठ्या हॉलमध्ये आम्ही सर्व स्थानापन्न झालो. राजाभाऊ उठून उभे राहिले. सुहास्य वदनाने, आमच्यापैकी प्रत्येकाजवळ जाऊन आलिंगन दिले आणि प्रत्येकाला गुलाबाचे एक फूल दिले. गुढीपाडव्याच्या नववर्षाच्या शुभेच्छा दिल्यात. असं करताना सर्वांना कडुनिंबाची कोवळी पानं देण्याचे औचित्यही राजाभाऊंनी साधले! नंतर ते बोलण्यासाठी उभे राहिले. म्हणाले,
‘‘ही एक अपौचरिक छोटीशी सभा मी आयोजित केली आहे. आपण आलात, त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. या सभेला, आपण सभा न म्हणता एकत्रीकरण म्हणून या. सभा मोठी असते. तसेही, आपण सर्व एका कॉलनीत राहून, कधी एकत्र येतोच कुठे? त्यातून पुन्हा… ‘‘घरोघरी टीव्ही बघ कसा राज्य करी’’ ही आजची परिस्थिती! असो. तो आजचा विषय नाही. आजचा विषय अर्थातच… ‘गुढीपाडवा’ हाच आहे. आज गुढीपाडव्याच्या शुभदिनी आपण एकत्रित झालो आहे. आपल्या भारतीय कालगणनेनुसार गुढीपाडवा हा वर्षाचा पहिला दिवस आहे. चैत्र शुद्ध प्रतिपदा. नव्या वर्षाचं स्वागत आपण आपापल्या घरी गुढी उभारून केलं आहे. यानिमित्ताने मला आपल्या सर्वांशी हितगुज करायचं आहे.
आपणा सर्वांना माहीतच आहे की, मी चार वर्षांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयातून अल्पबचत अधिकारी म्हणून सेवानिवृत्त झालो. माझी बहुतेक सेवा महसूल खात्यांतर्गत अल्पबचत खात्यात गेल्यामुळे, सेवानिवृत्तीनंतर अल्पबचतीचं काम करायचं हे मी आधीच ठरविलं होतं आणि त्याप्रमाणे एजन्सी घेऊन ते काम मी यथाशक्ती करीत आलो आहे. सुरुवातीला हे काम आमच्या घरातून मी एकटाच एजंट म्हणून करीत होतो. माझ्याजवळ वेळ भरपूर होता. तसा तो बहुतेक सर्वच सेवानिवृत्तांजवळ असतो म्हणा. म्हणून त्याचा नीट आणि पुरेपूर उपयोग करून घ्यायचा हे मी पक्क ठरविलं व पोस्ट खात्याशी संबंध होताच. प्रकृतीची साथ होतीच. चार वर्षांपूर्वीच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर हे काम मी सुरू केलं. आजचा गुढीपाडवा हे माझ्या संकल्पाचे पाचवं वर्ष आहे हं!’’
‘‘म्हणजे राजाभाऊ; तुम्ही एक पंचवार्षिक योजना पूर्ण केली की!’’
कोपर्‍यात बसलेले एक गृहस्थ म्हणाले,
‘‘तसं म्हणा हवं तर.’’ राजाभाऊ हसले. पुढे ते म्हणाले,
‘‘सुरुवातीच्या काळात मी स्वतः घरोघरी फिरून प्रचार करीत होतो. बचतीचं महत्त्व आणि त्या अंतर्गत पोस्टाच्या, आर.डी., सी.टी.डी., किसान विकास पत्र, एन.एस.सी. अशा विविध योजना, त्याचबरोबर बँकांच्या वेगवेगळ्या बचत योजना, एफ.डी.आर. वगैरे योजना मी सर्वांना समजावून देत होतो. नियमित कलेक्शन, नियमित भरणा, नियमित नोंदी यावर माझा विशेष भर असायचा. दरम्यान, मी एलआयसीची पण एजन्सी घेतली. तेही काम जोमाने केले. मेहनत घेतली. लोकांचा विश्‍वास आणि प्रतिसाद वाढत गेला. काम वाढत गेलं.’’
मध्येच राजाभाऊंना थांबवत श्यामराव म्हणाले,
‘‘इतकं जीव ओतून काम केलं तुम्ही? कमाल आहे हं तुमची!’’
त्यावर राजाभाऊ म्हणाले, ‘‘खरी कमाल तर पुढे आहे. ती सांगतो. सुरुवातीला आपल्यासारख्या सुशिक्षित पांढरपेशांमध्ये ही कामे मी केली. फारसं कठीण गेलं नाही. पण हीच सर्व कामे मी झोपडपट्टीत जाऊनही केली. ते मात्र थोडं कठीण गेलं.
‘कसं काय?’’ कुणीतरी विचारलं.
राजाभाऊ सांगायला लागले. ‘‘मी ज्या ऑफिसमध्ये कार्यरत होतो, त्या ऑफिसपासून जवळच एक झोपडपट्टी होती. त्या झोपडपट्टीतल्या काही बाया-बापड्या मधून मधून आमच्या ऑफिसच्या नळावर पाणी भरायला यायच्या. त्यांची तरुण मुलं आमच्या कार्यालयात जरूरीनुसार रोजंदारीवर कामाला असायची. त्यांच्याशी संपर्क साधत झोपडपट्टीतील रहिवाशांना मी हळूहळू अल्पबचतीच्या योजना सांगत गेलो. वेळ लागला. पण कामं होऊ लागली. त्यांची डबघाईची स्थिती, गरिबी, व्यसनाधीनता, अज्ञान असूनही त्या मानाने बर्‍यापैकी कामे झाली. म्हणून पुढे त्यांनी त्यांच्या एका छोटेखानी समारंभात माझा सत्कारही केला. त्या सत्काराचं मूल्यमापन करता येत नाही. असो.
मध्ये फराळाच्या डिशेस् आल्या. फराळाचा आस्वाद घेता घेता आमच्या गप्पागोष्टी मस्त रंगल्या. राजाभाऊंनी सांगितले की, ते दिवाळीच्या फराळासाठी कोणाला बोलवत नाही. पण गुढीपाडवाच्या सणाला आवर्जून बोलावतात. तशी सुरुवात केली आहे.
‘‘मग आता आम्हालाही, तुम्हाला बोलवावं लागेल’’ कुणीतरी बोलले.
‘‘बंदा हाजीर है!’’ राजाभाऊ हसत म्हणाले, अन् हास्याची कारंजी उडाली. राजाभाऊंनी बोलण्याची सूत्रे पुन्हा स्वतःकडे घेतली.
‘‘हं. तर मी तुम्हाला सांगत होतो की, कामाचा व्याप वाढायला लागला. पुढे माझ्या दोन्ही मुलांनी हे काम स्वीकारलं. आधी नोकर्‍या मिळविण्यासाठी ते धडपडले. त्या मिळविणं कसं कठीण आहे, ते तुम्ही आम्ही अनुभवतोच आहे. म्हणून मी माझ्या मुलांना या अल्पबचतीच्या कामात घेतलं. तेसुद्धा आनंदाने आले. हळूहळू त्यांनीही त्यांचे संपर्क वाढविले. सुनाही महिला अभिकर्ता म्हणून काम करू लागल्यात. त्याही त्यांच्या कामात मागे नाहीत. घरच्या त्यांच्या जबाबदार्‍या सांभाळून करतात.’’ मी त्यांना विचारले, ‘‘तुमची मुलं, सुना आता एवढी कामं सांभाळतात, तर तुम्ही या कामातून निवृत्त होणार काय?’’
‘‘नाही. पण माझं फिरणं, आय मीन, माझं फिल्ड वर्क मात्र मी कमी केलं आहे. ते सर्व मुलं, सुना करतात. मी हल्ली घरी बसल्या बसल्या, त्यांनी केलेल्या कामाचं लेखी काम जसं नोंदी घेणं, त्या चेक करणं, पोस्टाला, बँकेला सबमिट करण्याचे तक्ते तयार करणं, ही कामे करतो. सर्व कामं-धामं आटोपल्यावर, आम्ही सर्व मोठ्या डायनिंग टेबलावर बसून कामे करतो.’’
‘‘राजाभाऊ, तुमच्या घराला आता ‘अल्पबचत सदन’ हे नाव द्यावं लागेल,’’ बाबूराव म्हणाले.
‘‘द्या. माझी हरकत नाही.’’ राजाभाऊ म्हणाले, ‘‘पण पेंटिंगचा खर्च तुमच्याकडे!’’ पुन्हा सगळे हसले.
मी म्हणालो, ‘‘राजाभाऊ मला दुसरीच कल्पना सुचली आहे. तुमच्या कुटुंबाच्या बाबतीत… ‘‘कुटुंब रंगलंय काव्यात’’ असं न म्हणता, ‘‘कुटुंब रंगलंय अल्पबचतीत’’ असं म्हणावं लागेल!’’
माझ्या या कल्पनेत मात्र सगळे रंगले!
आतापर्यंत काहीही न बोललेले, कंजुष समजल्या जाणार्‍या प्रकाशभाईंनी प्रश्‍न विचारला,
‘‘तुमच्या या कामातून… प्राप्ती… वगैरे… बर्‍यापैकी असेल नं?’’
‘‘आमच्या सर्वांच्या मेहनतीचं फळ बर्‍यापैकी मिळते. व्यवसाय म्हटल्यावर थोडा फार चढउतार तर असणारच. एका वाक्यात सांगायचं म्हणजे स्वार्थ आणि परमार्थ सांभाळल्या जातो. आम्हाला कमिशन मिळतं. गुंतवणूकदारांना मॅच्युरिटी क्लेम्स मिळतात. शिवाय या गुंतविलेल्या रकमेचा उपयोग, देश-विकासाच्या योजना राबवितानाही होतो. बरं ते असू द्या, पण फराळाचं घेतलं का सर्वांनी? अरे मंगेश फराळाचं दिलं का सगळ्यांना?’’
मुलांनी होकारार्थी मान हलविल्यावर, राजाभाऊंनी चहाचं फर्मान सोडलं. आम्ही उपस्थितांनी राजाभाऊंच्या उद्यमशीलतेची तारीफ केली. राजाभाऊ म्हणाले, ‘‘माझ्या या उपक्रमाचा प्रचार करण्यासाठी मी नाही बोलाविलं हं, तुम्हाला. तुम्ही माझ्या अल्पबचत कार्यक्रमात गुंतवणूक करावी, यासाठी तर मुळीच नाही! मी तुम्हाला यासाठी आमंत्रित केलं आहे की, तुम्हीसुद्धा असा कोणतातरी चांगला उपक्रम हाती घ्यावा. त्या उपक्रमाला वाहून घ्या. जेणेकरून तुमचा वेळ सत्कारणी लागेल. काही समाजोपयोगी, विधायक कामे करण्याचं समाधान तुम्हाला मिळेल!’’
नुकतेच सेवानिवृत्त झालेले देवपुजारी म्हणाले,
‘‘राजाभाऊ, तुमचं काम पाहून आम्हालाही वाटतं की आपणही काहीतरी करावं. पण नेमकं काय करावं, कसं करावं ते लक्षात येत नाही. तुम्हीच आम्हाला सुचवा नं काय करावं ते!’’
‘‘एक्झॅक्टली! मला याच मुद्यावर यायचं होतं.’’ राजाभाऊ म्हणाले, ‘‘माझ्याजवळ वेगवेगळ्या उपक्रमांची जंत्री आहे. त्यापैकी काही मी सुचवितो,’’ ते पुढे म्हणाले.
‘‘हे पाहा, नक्की काय करावं हा प्रश्‍न बहुतेकांना पडतो. मनाचा गोंधळ होतो. तरी थोडक्यात सांगतो. या सर्व उपक्रमांची मी तीन भागात विभागणी केली आहे. पहिला विभाग म्हणजे अर्थार्जनासाठी करण्यायोग्य उपक्रम. ज्यांची आर्थिक स्थिती बेताची आहे, ज्यांना पैशाची गरज आहे, अशांनी छोटी-मोठी नोकरी जरूर करावी. अठ्ठावन्न- साठीनंतरही आजकाल बहुतेकांची प्रकृती चांगलीच असते. हेल्थ कॉन्शसही बर्‍यापैकी वाढला आहे. ज्यांच्याकडे शेती, पशुधन आहे, त्यांनी शेती, दुग्ध व्यवसाय, गो-सेवा, गो-संरक्षण अंतर्गत येणारे विविध उपक्रम हाती घ्यावेत. वेगवेगळ्या चांगल्या कंपन्यांची एजन्सी घेणे किंवा त्यांच्या उत्पादनांची विक्री करणे, स्वतःचा एखादा व्यवसाय करणे, स्वतःचे किराणा स्टेशनरी दुकान थाटणे… चालविणे असे कितीतरी व्यवसाय करण्यासारखे आहेत.
अर्थार्जन करणे आवश्यक नसेल, आणि समाजकार्याची आवड असेल तर अनेक सामाजिक कामे करता येण्यासारखी आहेत. साक्षरता अभियान, प्रौढ शिक्षण, ज्येष्ठ नागरिक संघ, व्यसनमुक्ती आंदोलन, झोपडपट्टी विकास, झोपडपट्टी स्वच्छता अभियान, निरनिराळ्या संघटनेत कामं करणे, राजकीय संघटनेत कामे करणे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ किंवा त्या संलग्त संघटनेत सहभागी होणे, धार्मिक उपक्रम जसे भजन, कीर्तन, प्रवचन, समाजप्रबोधन… अशी शेकडो कामे… तुमचं स्वागत करण्यास उत्सुक आहेत. यातील तुमच्या आवडीचा उपक्रम स्वीकारा.
तिसरे क्षेत्र, छंद जोपासण्यासंबंधीचे आहे. प्रत्येकाच्या काही आवडी-निवडी आणि छंद असतात. तरुणपणी नोकरी-व्यवसाय करताना ते बहुतेकांकडून जोपासले जात नाहीत. त्याची फक्त खंतच जोपासली जाते. पण सेवा किंवा व्यवसाय निवृत्तीनंतरच्या काळात आपले छंद चांगल्या तर्‍हेने जोपासले जाऊ शकतात. वाचन, लेखन, भाषण, साहित्य, नाटक, चित्रकला, संगीत, गायन, सुगमसंगीत, वाद्य-वादन, विविध खेळ, व्यायाम, शरीर-संवर्धन, योग, प्राणायाम, त्यांचा प्रचार-प्रसार असे कितीतरी छंद, उपक्रम आहेत. जसे आठवले तसे सांगितले. ही झलक समजा. आवडीनुसार, विचारपूर्वक एखाद्या उपक्रमाची निवड करावी, एवढीच माझी अपेक्षा आहे. तसाही वेळ अनेक मार्गांनी व्यर्थ जातोच आहे ना! असं म्हणतात की, शुभ कार्याला मुहूर्त पाहावा लागत नाही. तो केव्हाही सुरू करता येतो. तर मग मित्रांनो, आजच्या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर असा एखादा हृद्य संकल्प करायला काय हरकत आहे? यासाठीच, आजच्या या कार्यक्रमाचं प्रयोजन!’
राजाभाऊंचा निरोप घेऊन आम्ही आपापल्या घरी जाण्यासाठी समोरच्या अंगणात आलो. राजाभाऊ उपाध्येंची उंच गुढी, निळ्या आकाशाच्या पार्श्‍वभूमीवर छान दिसत होती. वरचा तांब्याचा कलश सूर्यकिरणात चमकत होता. डौलात उभ्या असलेल्या गुढीला आम्ही नमस्कार केला.
राजाभाऊंनी सुचविलेल्या अनेक संकल्पांनी आमच्या अंतर्मनात केव्हा प्रवेश केला… ते आम्हाला कळलेच नाही.
डॉ. अशोक कासखेडीकर/९८८१९४७९६०