चंगळवाद पुसून टाकतोय् इस्लामचा इतिहास

0
1971

विश्‍वसंचार

जगभरात सुमारे ५० देश हे अधिकृतपणे इस्लामी देश आहेत. शिवाय भारत, रशिया, चीन आणि बाल्कन राष्ट्रांमध्ये फार मोठी मुस्लिम जनसंख्या आहे. २०१५ साली प्रसिद्ध झालेल्या एका पाहणी अहवालानुसार जगभरात ख्रिश्‍चॅनिटीखालोखाल इस्लाम हा क्रमांक दोनचा सर्वाधिक लोकसंख्येचा उपासना संप्रदाय आहे. त्याची अंदाजे जनसंख्या आहे १० कोटी ७० लाख. यापैकी सुमारे ८० टक्के लोक हे सुन्नी पंथाचे आहेत; तर उरलेले २० टक्के हे शिया आहेत.
पण, या सर्वांनाच अत्यंत पूज्य असणारं स्थान आहे शहर मक्का. प्राचीन अरबस्तान किंवा आज सौदी अरेबिया या नावाने ओळखल्या जाणार्‍या, २१ लाख ५० हजार चौरस कि.मी. क्षेत्रफळाच्या अवाढव्य देशाचं जिद्दा किंवा आधुनिक जेद्दाह हे तांबड्या समुद्रावर वसलेलं एक बंदर आहे. या बंदरापासून ७० कि.मी. अंतरावर आहे शहर मक्का किंवा अधिकृत नाव ‘मक्काह-अल्-मुकर्रमाह’ म्हणजेच पवित्र शहर. तसे संपूर्ण शहर हे पवित्र आहेच, पण त्यातली अल् मस्जिद-अल् हराम’ या नावाने ओळखली जाणारी मशीद आणखीनच पवित्र आहे आणि या मशिदीच्या मधल्या भागात असलेली एखाद्या चौकोनी घनाकृतीसारखी भासणारी इमारत ही सर्वाधिक पवित्र आहे. हा घन म्हणजेच काबा. काबा या शब्दाचा अर्थच घन. म्हणजे अल् मस्जिद-अल् हराम या मशिदीला घुमट नाही; तर काबा या घनाकृती इमारतीला सर्व बाजूंनी भिंतींनी बंदिस्त केल्यामुळे जो एक विशाल प्रकार निर्माण होतो त्यालाच मशीद असं म्हटलं जातं. काबा ही साधारण ३६ फूट ४२ फूट ४३ फूट या मोजमापाची काळ्या पत्थराची इमारत आहे. इस्लामी श्रद्धेनुसार काबा हे अल्लाहचं म्हणजेच सर्वशक्तिमान परमेश्‍वराचं निवासस्थान आहे.
या मक्का शहरात मुहम्मद पैगंबरांच्या काळात म्हणजे इसवी सनाच्या ६ व्या शतकात अरबांच्या अनेक टोळ्या होत्या. त्यापैकी कुरैश या टोळीत बानू हाशीम नावाच्या कुळात मुहम्मदांचा जन्म इसवी सन ५७० मध्ये झाला. तत्कालीन अरबी प्रथेनुसाार त्यांचं पूर्ण नाव अबू अल् कासीम मुहम्मद इब्न अब्दल्ला इब्न अब्दल मुत्तलीज इब्न हाशीम. यातलं अबू अल् कासीम मुहम्मद हे त्यांचं स्वत:चं नाव. अब्दल्ला किंवा अब्दुल्ला हे त्यांच्या वडिलांचं नाव. अब्दल मुत्तलीब हे आजोबांचं नाव आणि हाशीम हे कुळाचं नाव. इब्न म्हणजे ‘अमुक चा मुलगा.’ अरबी लिपी उजवीकडून डावीकडे लिहिली जाते. त्यानुसार हे नाव, हाशीम कुळाचा पुत्र, अब्ल मुत्तलीबचा पुत्र, अब्दल्लाचा पुत्र, अबु अल् कासीम मुहम्मद असं लिहिलं जातं.
मुहम्मद आईच्या गर्भात असतानाच त्यांचे वडील अब्दुल्ला मरण पावलेे. त्यामुळे मुहम्मदांचा सांभाळ त्यांचे काका अबु तालीब यांनी केला. त्याही वेळी काबा हे प्रसिद्ध देवस्थान मक्का शहरात होतंच आणि तिथे दूरदूरच्या अंतरावरून यात्रेकरू येतच असत. पण, मग त्या देवस्थानात कोणत्या देवाची मूर्ती होती आणि मुहम्मदांच्या कुळासकट सगळे अरब कोणत्या संप्रदायाचे उपासक होते? ख्रिश्‍चॅनिटी आणि ज्युडाइझम् म्हणजे येशू आणि मोझेस यांचे अनुयायी तर नक्कीच होते. पण मूर्ती कुणाच्या होत्या?
मुहम्मद स्वत: मक्का शहराच्या परिसरातल्या जबल्-अल्-नूर नावाच्या डोंगरात हीर नावाच्या गुहेत जाऊन ध्यान करू लागले. तिथेच त्यांना जब्रियल (किंवा गॅब्रियल) नावाच्या देवदूताने दर्शन दिलं आणि अल्लाहचा आदेश दिला.
जब्रियल मुहम्मदांना एकदाच भेटला असं नसून अनेकदा भेटला आणि परमेश्‍वराचे आदेश त्यांच्यापर्यंत पोचवत राहिला. या आदेशांचं एकत्रित संकलन म्हणजेच इस्लामचा धर्मग्रंथ कुराण.
पुढे मुहम्मद मक्का शहरात सर्वांना या परमेश्‍वरी आदेशाबद्दल सांगू लागले. काहींनी त्यांचं म्हणणं मानलं. पण. विरोध करणारेच जास्त होते. तेव्हा मुहम्मद मक्केहून उत्तरेकडे मदीना या शहरी गेले. काही काळ तिथे राहून आपलं बळ पुरेसं वाढल्यावर त्यांनी मक्केवर चक्क ६२९ साली घडली. मक्का जिंकल्यावर आणि तिथल्या एकूण एक नागरिकाला इस्लामचा स्वीकार करायला लावल्यावर मुहम्मदांनी आवर्जून एक गोष्ट केली. त्यांनी काबामधल्या सर्व मूर्ती नष्ट केल्या. पुढे इ. स. ६३२ मध्ये मुहम्मद मरण पावले ते मात्र मदिना शहरात. तिथे त्यांची कब्र आजही आहे. तिला ‘अल् मस्जिद-अल् नबवी’ असं म्हटलं जातं.
पण, एकंदरीत मुहम्मदांच्या जन्मासह त्यांच्या आयुष्याचा बराच मोठा काळ हा मक्का शहरातच गेला. त्यांचे नातेवाईक; त्यांचे काका अबु तालीब, त्यांचा मुलगा अली; जो मुहम्मदांना फार प्रिय होता, मुहम्मदांची प्रथम पत्नी खदिजा; आयेशा, झैनाब, मैमूना इत्यादी इतर पत्न्या, फतिमा, रुकय्या, कुलथुम या त्यांया मुली, त्यांचे नवरे, त्यांची मुलं इत्यादी अनेकांशी संबंधित असलेल्या असंख्य वास्तू, ठिकाणं मक्का शहरात सर्वत्र विखुरलेली आहेत. इस्लाम धर्मियांच्या दृष्टीने ती सर्वच ठिकाणं पवित्र आहेत.
असं कुणाला वाटत असेल, तर वाटो बापडं! पण, सौदी अरेबियाचे कर्तुम् अकर्तुम् शासक असलेल्या अल् सौद या राजघराण्याला तसं वाटत नाही. हे घराणं अत्यंत कडव्या अशा वहाबी पंथाचं अनुयायी आहे. त्या पंथानुसार काबा आणि फक्त काबा हे एकमेव स्थळ पवित्र, अतिपवित्र आहे. तेव्हा ते सोडून अन्यत्र नमाज अदा करण्याची काहीही गरज नाही. शिवाय तुम्ही असं पाहा की, पूर्वी हाज यात्रेला जेमतेम ५० हजार लोक यायचे. गेल्या वर्षी किमान ७० लाख लोक आले होते. येत्या वर्षी ही संख्या दुप्पट व्हावी, असा सौदी सरकारचा प्रयत्न आहे. आता मक्का शहराची मूळ लोेकसंख्या २० लाख. २० लाखांची सोय असणार्‍या शहरात जर १ कोटी ४० लाख यात्रेकरू महिनाभरासाठी राहणार असतील, तर त्यांची सोय नको करायला? मग काय, आणा बुलडोझर आणि फिरवा सर्वत्र! त्या जुन्यापान्या वास्तू पाडा. आपल्याला मोठमोठे टॉवर्स, मॉल्स, अलिशान हॉटेल हव्येयत. यात्रेकरूंची निवास व्यवस्था तर हवीच, पण त्यांनी भरपूर खरेदी करून खिसाही हलका करायला हवा.
काबाच्या म्हणजे अल् हराम मशिदीच्या अगदी लगतच एक छोटी टेकडी होती आणि तिच्यावर एक प्राचीन गढी होती. खुद्द सौदी राजघराण्याच्या मालकीच्या एका कंपनीने गढीसकट अख्खी टेकडीच खणून काढली नि तिथे तब्बल सात गगनचुंबी टॉवर्सचा एक प्रकल्प उभा केला. ६० कोटी डॉलर्स मूल्याच्या या टॉवरमधली मध्यवर्ती इमारत ही मुंबईच्या राजाबाई टॉवरसारखी क्लॉक टॉवर म्हणजे भव्य घड्याळ असलेली १२० मजल्यांची इमारत आहे. तिच्यात २ हजार निवासी कक्ष, १ हजार ५०० संमेलन कक्ष आणि ९६ लिफ्टस् आहेत. जगभरातल्या प्रख्यात व्यापारी कंपन्यांची किमान ६०० अवाढव्य दुकानं आहेत. अबराज-अल्-बैत या नावाने हे पूर्णपणे व्यावसायिक धंदेवाईक संकुल २०१२ पासून सुरू झालं आहे.
पण, शहरभरात अशा १३० गगनचुंबी इमारती उठत आहेत नि त्यात जगभरच्या बँकांनी तब्बल ३०० कोटी डॉलर्स गुंतवले आहेत आणि या इमारतींसाठी ऐतिहासिक महत्त्वाच्या वास्तू बेधडक नष्ट केल्या जात आहेत.
आपल्याला आश्‍चर्य वाटेल की, वहाबी पंथ हा मुळातच कडव्या अशा सुन्नी पंथाचा, आणखीन कडवा असा उपपंथ असताना, सौदी राजघराणं मुहम्मदांशी संबंधित वास्तू नष्ट करण्याची हिंमत कसं करतं? त्याचं कारण राजकीय आहे. अरबांनी सगळ्या जगावर इस्लाम लादला आणि एक काळ आशिया, आफ्रिका नि युरोप खंडांना हादरवून सोडलं. पण, पुढे अरबांच्या तुर्क गुलामांनी वरचढ होऊन खुद्द अरबांनाच जिंकलं. इसवी सनाच्या चौदाव्या शतकापासून इ. स. १९१८ पर्यंत अरबस्तान तुर्कांच्या उस्मानी साम्राज्यातला मांडलिक देश होता. १९१८ साली पहिल्या महायुद्धात जर्मनी-तुर्कस्तान यांचा पराभव झाला नि अरबस्तान मुक्त झाला.
पण, अरबी टोळ्या पूर्वीप्रमाणेच आपापसात झगडत राहिल्या. मक्का शहर हे अरबस्तानच्या हेजाझ भागात येतं. मुहम्मदांच्या वेळेपासून हाशीम किंवा हाशेमाईट अरब तिथे राज्य करत होते. १९३२ साली अब्दुल अजीझ इब्न सौद याने मक्केसकट सगळाच अरबस्तान जिंकला. अब्दुल अजीझ हा अरबस्तानच्या नज्द भागातला होता. तो वहाबी पंथीय होता. आता गंमत पाहा; हेजामधले हाशेमाईट हे सुन्नीच आणि नज्दमधले हे नज्दी वहाबी पण सुन्नीच. पण, हेजाझी सुन्नी स्वत:ला सुधारलेले आणि नज्दींना रानटी समजतात. पण, नज्दींनी अख्खा अरबस्तानच जिंकला. अब्दुल अजीझनं देशाच्या ‘अरेबिया’ या नावामागे ‘सौदी’ म्हणजे आपल्या बापाचा-सौदचा देश असं नाव जोडलं. थोडक्यात आता हा देश ही माझ्या बापाची मालमत्ता आहे, असं त्याने अधिकृतपणे जाहीर केलं.
आता राजघराण्याचा जो वहाबी पंथ तो साहजिकच देशाचा मुख्य संप्रदाय झाला. वहाबी पंथ तो साहजिकच देशाचा मुख्य संप्रदाय झाला. वहाबी धर्मगुरूंच्या मते एक काबा सोडून अन्यत्र नमाज अदा करणं, किंबहुना अन्य ठिकाणांना पवित्र माननं, हेच मुळी चुकीचं आहे. ते कुफ्र आहे. अंधश्रद्धा आहे. तेव्हा अशी ठिकाणं नष्ट झाली म्हणून काहीही बिघडत नाही.
अशा रीतीने मक्का शहरात राजघराण्याशी संबंधित बिल्डर मोकाट सुटले आहेत. एकापाठोपाठ एक प्राचीन ऐतिहासिक स्थानं नष्ट होत आहेत. खलिफा अबु बक्र याच्या घराच्या ठिकाणी अलिशान हिल्टन हॉटेल उभं राहिलं आहे. ‘क्रांती आपल्याच पिलांना खाते’, असं साम्यवादी लोकांचं पूर्वी एक लाडकं वाक्य असायचं. तसं हाज यात्रेकरूंची सोय करण्याच्या नावाखाली वहाबी पंथीय लोक आपलीच वारसास्थानं नष्ट करत आहेत. चंगळवाद सैराट सुटला आहे.

मल्हार कृष्ण गोखले