पासवानांना मंत्रिपदावरून हटविण्याची मागणी

0
79

तभा वृत्तसेवा
पुसद, २६ मार्च
लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष तथा केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी देशातील दिव्यांगांवर अभद्र टीका करून दिव्यांगांचा अवमान केल्याच्या निषेधार्थ दिव्यांग जनक्रांती संघटनेने राष्ट्रपती व पंतप्रधानांना निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे. दिव्यांगांची अवहेलना केल्याप्रकरणी पुसद पोलिसात तक्रार देऊन आपला निषेधही नोंदवला आहे.
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांनी संसद भवन परिसरात १७ मार्च रोजी इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर ‘सौ लंगडे मिलकर एक पहेलवान नही बन सकते’ अशी दिव्यांगांवर टीका करून त्यांची अवहेलना केली आहे. पासवान हे केंद्रात मंत्री असून त्यांच्या या वक्तव्यामुळे दिव्यांगांचा अपमान झाला असून त्यांच्या भावना दुखावल्या आहेत.
एकीकडे सरकार दिव्यांगांच्या कल्याणासाठी, त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी अधिकार व कायदे बनविते. पण त्याच संसद भवनासमोर दिव्यांगांचे खच्चीकरण करणार्‍या मंत्र्यांच्या वक्तव्यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचे दिसते आहे.
पासवान यांनी दिव्यांगांची भावना दुखावल्याप्रकरणी त्यांना मंत्री पदावरून काढण्यात यावे तसेच अपंग व्यक्ती अधिकार कायदा २०१६ नुसार फौजदारी कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे निवेदन शनिवार, २४ मार्च २०१७ रोजी दिव्यांग जनक्रांती संघटनेने राष्ट्रपती व पंतप्रधान यांना पुसद उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत पाठवले आहे.
पुसद शहर पोलिस ठाण्यात रामविलास पासवान यांच्या विरोधात तक्रार देण्यास गेले असता त्यांची तक्रार घेण्यास नकार दिल्याने संघटनेने उपविभागीय पोलिस अधिकारी पुसद यांच्याकडे तक्रार दिली आहे. या निवेदनावर दिव्यांग जनशक्ती संघटनेचे अध्यक्ष प्रशांत जाधव, सैयद मुन्शीर, रहेमान चव्हाण, माणिक भिसे, बबन गुळवे, सुनीता नारनवरे, मारोती सुरोशे, अमजतखान, राजेंद्र पांडे, शेख सोहेल, गजानन तुपसुंदरे, मतीनखान, मुमताज शेख, सनम आसिफ, असीमखान, शेख नबी, साहील बानो यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.