ग्रामगीतेचा आधार घेऊन ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार

0
105

पुस्तिकेवर बंदी घालण्याची आ. बोंडेंची मागणी
तभा वृत्तसेवा
अमरावती, २७ मार्च
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ग्रामगीतेतील व ग्रामगीताचार्य तुकारामदादा यांनी लिहिलेल्या पुस्तकातील दाखल्यांचा आधार घेऊन ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार ‘प्रार्थना’ नावाच्या पुस्तिकेतून नागपूर येथील काही मंडळींकडून सुरू असल्याचा आरोप सोमवार, २७ मार्चला आ. अनिल बोंडे यांनी केला.
सदर पुस्तिकेवर तातडीने बंदी घालण्याची व प्रचार करणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.
उपरोक्त मागणीचे सविस्तर निवेदन आ. डॉ. बोंडे यांनी जिल्हाधिकारी किरण गित्ते यांना दिले आहे. जिल्ह्यातल्या वरुड तालुक्यातील आदिवासीबहुल व ग्रामीण भागात नागपूर येथील नितीन सरदार व ख्रिस्त भक्त मंडळी, गुरुदेव सेवा मंडळ, सत्यशोधक समाज यांनी संयुक्तरित्या प्रकाशित केलेल्या ‘प्रार्थना’ नावाच्या पुस्तिकेतून हा प्रचार सुरू आहे. पुस्तिकेच्या मुखपृष्ठावर राष्ट्रसंत आणि ग्रामगीताचार्यांचे छायाचित्र असून राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या सामुदायिक प्रार्थनेच्या पुस्तिकेचे स्वरूप त्या पुस्तिकेला देण्यात आले आहे.
या पुस्तिकेत ग्रामगीतेचे काही अभंग नमूद करण्यात आले आहे. तसेच सामुदायिक प्रार्थनेचे महत्त्व सांगतांना राष्ट्रसंतांनी दिलेले येशू ख्रिस्ताचे उदाहरणसुद्धा त्यामध्ये नमूद केले आहे. राष्ट्रसंतांच्या शिकवणुकीबरोबरच येशू ख्रिस्त जगाचा उद्धारकर्ता परमेश्‍वर आहे, असे नमूद करून प्रभूची प्रार्थना, बायबलमधील स्तोत्र महिमा इत्यादी राष्ट्रसंतांच्या प्रार्थनेसोबत जोडण्यात आलेले आहे. सर्वसामान्यांमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांबद्दलच्या भक्तीचा वापर करून ख्रिश्‍चन धर्माचा प्रचार करण्यात येत आहे.
अमरावती राष्ट्रसंतांची जन्म व कर्मभूमी असल्याने गुरुदेव सेवा मंडळाच्या शाखा येथे मोठ्या प्रमाणात आहे. अनेक गावात सामुदायिक प्रार्थना केली जाते. राष्ट्रसंतांची शिकवण मानणारा समाज जिल्ह्यात मोठ्या संख्येने आहे, त्याचाच गैरफायदा घेण्याकरिता नितीन सरदार व त्यांची मंडळी पुढे सरसावली आहे.
सदर पुस्तिकेत येशू ख्रिस्ताचा एकही फोटो नसला तरी वारंवार येशू ख्रिस्ताचा आणि ख्रिस्ती धर्माच्या शिकवणुकीचा उल्लेख आहे. राष्ट्रसंत व तुकारामदादांच्या शिकवणुकीनुसार ख्रिस्ती धर्मच आचरणीय असल्याचे खोडसळ व कटबाजीपूर्ण लिखाण या पुस्तिकेत करण्यात आले आहे.
सदर पुस्तिका तयार करणार्‍या उपरोक्त मंडळींवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी आणि कथित प्रार्थना पुस्तिकेचे प्रकाशन बंद करून तिचे वितरणही थांबवावे, अशी मागणी आ. बोंडे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.