अठ्ठेचाळीस तासात उलगडले दोन खुनांचे रहस्य

0
127

जिल्हा पोलिसांची यशस्वी कारवाई
तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २७ मार्च
बिटरगाव आणि यवतमाळात घडलेल्या दोन खुनांमुळे समाजमन हादरून गेले होते. जिल्हा पोलिसांनी अवघ्या अठ्ठेचाळीस तासांत दोन्ही खुनांचे रहस्य उलगडून आरोपींना अटक केली, अशी माहिती जिल्हा पोलिस अधीक्षक मेघनादन राजकुमार यांनी पत्रपरिषदेत दिली.
बिटरगाव येथील भुसार व्यापारी व्यंकटेश वसंत वटमवार यांचा शनिवार, २५ मार्च रोजी संध्याकाळी ६.४५ वाजता कुर्‍हाडीचे घाव घालून खून करण्यात आला होता. बिटरगाव पोलिसांनी तपासाची चक्रे गतीने फिरवून आरोपी बळिराम उर्फ बळी गणपत तुपेकर याला परभणी जिल्ह्यातील मिरखेल येथून सोमवार, २७ मार्च रोजी ताब्यात घेण्यात आले.
आरोपी बळिरामच्या भावाने मृतक व्यापारी व्यंकटेश याला शेतमाल विकला होता. या मालाचे पैसे मागायला बळिराम गेला असता, पैसे तुझ्या भावाला देतो असे म्हटल्याने तू मला पैसे का देत नाही, असे म्हणत वाद घातला. वादाच्या भरात बळिरामने व्यंकटेशच्या छाती, मान आणि हातावर कुर्‍हाडीने वार केले. यात त्याचा जागीच मृत्यू झाला.
दुुसर्‍या घटनेत २५ मार्च रोजी लोहाराजवळ साने गुरुजीनगरातील सार्वजनिक विहिरीत अज्ञात इसमाचे अर्धवट जळालेले प्रेत आढळून आले. टोळीविरोधी पथकातील कर्मचारी या गुन्ह्यासंदर्भात माहिती घेत असताना विहिरीतील मृतदेह सतीश डोईजड याचा असून त्यास अमित यादव व गौरव उमाटे यांनी मारल्याची गोपनीय माहिती मिळाली. पोलिसांनी लोहारा टी पॉईंटवरून अमित यादव यास व गौरव उमाटे याला राऊत पेट्रोल पंपाजवळून आणि सूरज बोंद्रेे याला एकवीरा चौकातून ताब्यात घेतले.
आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांनी पैशांच्या वादातून खून केला असून दारव्हा मार्गावर प्रेत जाळून विहिरीत फेकल्याचे सांगितले. दोन्ही घटनांतील आरोपींना न्यायालयात हजर केले असून आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे.