एक चिनगारी…

0
102

कल्पवृक्ष

कोलंबसने अमेरिकेचा शोध लावला. त्याबद्दल इंग्लंडमध्ये त्याच्या सन्मानार्थ एक मेजवानी होती. तेथील सेनेचे काही अधिकारीही उपस्थित होते. त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, ‘‘कोलंबस, तू जहाजाने एका सरळ दिशेला पुढे पुढे गेला. एका भूभागाला ते जहाज लागले आणि अमेरिकेचा शोध लागला. यात तू विशेष काय केलेस. आमच्यापैकी कोणीही हे करू शकतो.’’ सर्वांनीच त्याच्या म्हणण्याला दुजोरा दिला. कोलंबस काहीच बोलला नाही. तेथे काही अंडी ठेवली होती. त्यापैकी एक अंडे त्याने उचलले आणि या टेबलवर ते उभे करून दाखवा, असे आव्हान दिले. सर्वांनी प्रयत्न केले, पण कुणालाही ते जमले नाही. कोलंबसने अंडे घेतले, त्याच्या एका बाजूला कौशल्याने टीचकी मारली, गुळगुळीत भागाला किंचित खोच पाडली व टेबलवर अंडे उभे केले. सर्वच म्हणाले, ‘‘असे तर कुणीही करू शकतो.’’ त्यावर कोलंबस म्हणाला, ‘‘खरे आहे, हे कुणीही करू शकतो, पण कुणी केले नाही. अमेरिका कुणीही शोधू शकला असता, पण कुणी शोधायला गेला नाही. मी गेलो, हेच माझे कर्तृत्व आहे.’’
खरे तर नवीन वर्षात अनेक संकल्प करण्यासारखे असतात. पण, कोलंबस म्हणतो त्याप्रमाणे प्रत्यक्ष कृतीवरच सर्व अवलंबून असते. लक्ष्य फार कठीण असते, अशातला भाग नसतो, पण एक पाऊल समोर टाकून चालणे महत्त्वाचे असते. रामदासांनी स्पष्टच म्हटले आहे, ‘केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे|’
अर्थात काय केले पाहिजे, याची दिशाही स्पष्ट असली पाहिजे. अनेकदा आपण शिडीवर चढत जातो. आपली प्रगती होत आहे, या आनंदात आपण असतो. पण, चढून गेल्यानंतर शेवटी आपल्याला कळते की, आपण चुकीच्या शिडीवर होतो. म्हणूनच नवीन वर्षाच्या प्रारंभीच गतकाळाचा आढावा व सिंहावलोकन करण्याची गरज असते. आपण आर्थिक बाबींचे दरवर्षी ऑडिट करतो. वैयक्तिक व सामाजिक जीवनातही दरवर्षी कठोरपणे ऑडिट केले पाहिजे. त्यातूनच नव्या वर्षाच्या कृतियोजना अधिक निर्दोष बनतात.
वैयक्तिक जीवनात प्रत्यक्ष कृती करण्याची प्रेरणा व योग्य दिशा मिळावी म्हणून एका प्रशिक्षण वर्गात फार प्रभावी प्रयोग करण्यात आला. आपण एका अंत्ययात्रेत आहोत, अशी कल्पना करायची. शेवटी नेहमीप्रमाणे शोकसभा सुरू आहे. लोक त्या व्यक्तीसंबंंधी बोलत आहेत. या दृश्यात आता आपणच आहोत आणि आपल्याविषयी लोक काय बोलतील, याचा विचार करायचा. अधिक तपशिलात जाण्याकरिता आपले नातेवाईक, कार्यालय, शेजारी, मित्र असे सर्व क्षेत्रातील वक्ते आहेत. ते आपल्याबद्दल काय बोलतील, याचे मुद्दे काढायचे. या प्रयोगानंतर सारेच गंभीर झाले. स्वतःकडे असेही पाहता येते, याचे नवे भान सर्वांना आले. कोणताही देश घटनेनुसार, संविधानानुसार चालत असतो. काळानुरूप त्यात बदल होत असतात, पण काही मूल्ये कधीच बदलत नाहीत. आपल्या जीवनाचीही अशी एखादी घटना असावी. त्यामुळे आपल्या जीवनाला एक निश्‍चित दिशा मिळते. एक शिस्त लागते. आपल्याही जीवनात काही न बदलणारी मूल्ये असावीत. त्यामुळेच जीवन मूल्यवान होत असते. स्टीफन कोवे यालाच ‘लाईफ मिशन स्टेटमेंट’ म्हणतो. नवीन वर्षाचा संकल्प, कृती, आढावा, नवी दिशा यांचा आधार हे मिशन स्टेटमेंट असले पाहिजे.
मानवी जीवनात आपोआप काहीही घडत नसते. त्याकरिता योजनाबद्ध प्रयत्न करावेच लागतात. जीवन आहे, तर ते आपण कसेतरी जगणारच आहोत. पण, जीवनाच्या प्रांगणात काय उगवावे हे आपल्यालाच ठरवावे लागते. आपल्या घराच्या प्रांगणात बगिचा आपोआप लागत नाही. आंगण आहे तर काहीतरी उगवणारच आहे. गाजरगवत, बाभळीची, बेशरमाची, धोतर्‍याची झाडे उगवतील. गुलाब, मोगरा असाच उगवत नाही. सुंदर बगिचा करण्याकरिता योजना करावी लागते. विविध फुलांच्या कलमा लावाव्या लागतात. त्यांची निगा राखावी लागते. खत द्यावे लागते. योग्य प्रमाणात कापणी करावी लागते. त्यानंतर सुंदर फुलांचा, विविध रंग आणि गंध असलेला बगिचा उभा होतो. तो पाहून कुणीही आनंदी होतो. आपल्या जीवनाच्या प्रांगणात काय उगवावे, हा शेवटी आपला निर्णय आहे आणि ते आपल्याच प्रयत्नावर अवलंबून आहे. ती क्षमताही आपल्यात आहे.
एक चिनगारी कहींसे ढूंढ लाओ दोस्तो
इस दियेमें तेल और भिगी हुई बाती तो हैं…
आजची वर्षप्रतिपदा एक चिनगारी घेऊन येईल आणि तेल व वात असलेला आत्मदीप प्रज्वलित होईल. असे झाले तर आसमंत उजळून निघायला कितीसा वेळ लागणार आहे?
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११