महाराष्ट्राला हेवा वाटेल, असे असेल बल्लारपूरचे बसस्थानक

भूमिपूजनप्रसंगी सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन

0
104

तभा वृत्तसेवा
चंद्रपूर, २८ मार्च
बल्लारपूरकर जनतेने माझ्यावर भरभरून प्रेम केले आहे. हे ऋण फेडणे मला शक्य नाही. मात्र, या ऋणातून उतराई होण्याचा अल्पसा प्रयत्न म्हणून बल्लारपूरच्या बसस्थानकाला अद्ययावत करण्याचा निर्णय घेतला. अवघ्या महाराष्ट्राला हेवा वाटेल, असे हे बसस्थानक असेल, असा विश्‍वास राज्याचे वित्त, नियोजन, वने तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
बल्लारपूर शहरात ११ कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक सोयींनी परिपूर्ण असे बसस्थानक उभारण्यात येत आहे. जनतेचे शासन या उपक्रमांतर्गत या अत्याधुनिक वास्तूचे भूमिपूजनदेखील मुनगंटीवार यांनी शहरातील पाच गणमान्य व्यक्तींंच्या हस्ते केले.
यावेळी व्यासपीठावर वनविकास महामंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल, आ. नाना श्यामकुळे, बल्लारपूरचे नगराध्यक्ष हरीश शर्मा, माजी आमदार जैनुद्दीन जव्हेरी, न. प. उपाध्यक्षा मीनाक्षी चौधरी, राज्य परिवहन महामंडळाचे उपव्यवस्थापक मुंडीवाले व विभागीय नियंत्रक कार्तिक सहारे यांच्यासह जिल्ह्यातील व शहरातील नागरिक उपस्थित होते.
यावेळी सुधीर मुनगंटीवार यांनी जनतेला गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देताना पुढच्या वर्षी याच दिवशी या बसस्थानकाचे लोकार्पण तुमच्या साक्षीने केले जाईल, अशी ग्वाही दिली.
ते पुढे म्हणाले, या बसस्थानकाचे भूमिपूजन झाल्यानंतर ४ एप्रिल रोजी मूल येथे नव्याने बांधण्यात येणार्‍या बसस्थानकाचे भूमिपूजन होणार आहे. त्यानंतर चंद्रपूर अशाप्रकारे संपूर्ण जिल्ह्यातील महत्त्वाच्या बसस्थानकांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार असून, संपूर्ण महाराष्ट्रात नवीन बसगाड्या खरेदी करण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. त्यामुळे बल्लारपूर येथील नवीन बसस्थानकामध्ये नवीन बसगाड्या परिवहन महामंडळाने पाठवाव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
तसेच बल्लारपूर येथे अत्याधुनिक स्टेडिीयम, पोलिस ठाणे, नाट्यगृह, आयटीआय, न्यायालय, बल्लारपूर नॅशनल हायवे, बायपास मार्ग, स्मशानभूमी, विशेष बाब म्हणून सर्वांना मुबलक पाणी मिळावे याचे नियोजन, गरीब मुलांसाठी ७ कोटी रुपये खर्च करून नगर परिषदेच्या शाळेचे अत्याधुुनिकरण, ५० कोटी रुपये खर्चून बल्लारपूर येथील भूमिगत विद्युतीकरण आदी विकासकामे मंजूर करण्यात आली आहेत. बल्लारपूर येथील रेल्वे स्थानकाचे अत्याधुनिकरण करण्यात येणार असून, हे रेल्वेस्थानक महाराष्ट्रातील एक ‘मॉडेल’ होईल, अशा प्रकारचे देखणे करण्यात येणार आहे. येत्या २ वर्षात ही सर्व कामे पूर्ण करण्याचा निर्धार सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी व्यक्त केला.
प्रास्ताविक राज्य परिवहन महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक मुंडीवाले यांनी, तर आभार विभागीय नियंत्रक कार्तिक सहारे यांनी मानले.