राज्यातील १५४ गावे झाली तंटामुक्त!

अकरा गावांना विशेष शांतता पुरस्कार

0
108

मुक्तेश्‍वर म्हशाखेत्री
गडचिरोली, २८ मार्च
गावात तंटे होऊ नयेत, गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटावेत, गावात निर्माण होणारे तंटे लोकसहभागातून मिटविण्याची व्यवस्था निर्माण व्हावी, सामाजिक शांतता प्रस्थापित होऊन राज्याची समृद्धीकडे वाटचाल व्हावी, या उद्देशाने १५ ऑगस्ट २००७ पासून महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहीम राज्यात सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेला गावागावातून मिळत असलेला उत्स्फूर्त प्रतिसाद लक्षात घेऊन या मोहिमेला मुदतवाढ देत मागीलवर्षी नवव्या वर्षाची मोहीमसुद्धा सुरू करण्यात आली.
या मोहिमेंतर्गत सन २०१५-१६ या वर्षात राज्यातील २५४ गावे तंटामुक्त म्हणून शासनाच्यावतीने घोषित करण्यात आलीत. तसेच तंटामुक्त मोहिमेंतर्गत विशेष उल्लेखनीय कामगिरी बजाविणार्‍या राज्यातील ११ गावांची विशेष शांतता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या महात्मा गांधी तंटामुक्त मोहिमेत सहभागी होऊन राज्यातील अनेक गावांमध्ये तंटामुक्त समित्या स्थापन करण्यात आल्या. या गाव समित्यांमार्फत गावातील तंटे गावातच सामोपचाराने मिटवून शांतता प्रस्थापित करणे, गावात तंटे निर्माण होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचा प्रयत्न करण्यात आला.
या मोहिमेत सहभागी होऊन विशेष कामगिरी बजाविणार्‍या तंटामुक्त गाव समित्यांना प्रोत्साहन मिळावे व त्या गावांच्या विकासाला चालना मिळावी याकरिता शासनाच्यावतीने तंटामुक्त पुरस्कार आणि उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या तंटामुक्त गाव समित्यांना विशेष शांतता पुरस्कार देण्याची घोषणा करण्यात आली. त्यानुसार सन २००७-०८ ते २०१४-१५ पर्यंत राज्यातील १८,९९३ गावांना तंटामुक्त पुरस्कार तर १,२९८ गावांना विशेष शांतता पुरस्कार देऊन या मोहिमेच्या पुढील अंमलबजावणीसाठी प्रोत्साहित करण्यात आले.
तंटामुक्त गांधी तंटामुक्त मोहिमेची सन २०१५-१६ मध्ये नवव्या वर्षात सुद्धा अंमलबजावणी करण्यात आली असून गावपातळीवरून या मोहिमेला उत्तम प्रतिसाद लाभल्याचे दिसून आले. सदर वर्षातील मोहिमेत सहभागी होत गावात शांततामय वातावरण निर्माण करणार्‍या राज्यातील १५४ गावे तंटामुक्त म्हणून घोषित करण्यात आली. तसेच उल्लेखनीय कामगिरी करणार्‍या राज्यातील ११ गावांची विशेष शांतता पुरस्कारासाठी निवड करण्यात आली असून त्यामध्ये विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील वालतूर तांबडे व डोंगरगाव या गावांचा समावेश आहे.
तंटामुक्त म्हणून घोषित झालेल्या व पुरस्कारासाठी निवड झालेल्या गावांमध्ये विदर्भातील अमरावती ग्रामीण ३, अकोला ९, वाशीम १५, यवतमाळ ३४, नागपूर ग्रामीण ५ तर चंद्रपूर जिल्ह्यातील ६ या गावांची निवड करण्यात आली आहे. तसेच राज्यातील लातूर, भंडारा, गोंदिया हे जिल्हे १०० टक्के तंटामुक्त झाले असल्याची माहिती आहे.
तंटामुक्त मोहिमेला गावागावातून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे यावर्षीसुद्धा राज्यात या मोहिमेची प्रभावीपणे अंमलबजावणी सुरू आहे. या मोहिमेमुळे अनेक गावातील तंटे मिटून शांततेचे वातावरण निर्माण होण्यास मोलाचे सहकार्य लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे.