शिकणे शिकावे

0
223

कल्पवृक्ष

एका गुरूंच्या आश्रमात अनेक शिष्य शिक्षणाकरिता येत असत. त्यांची शिक्षण पद्धती अगदी वेगळ्या प्रकारची होती. प्रत्येकाला ते वेगवेगळ्या पद्धतीने शिकवत असत. त्यांची ख्याती ऐकून एक शिष्य त्यांच्याकडे शिक्षणाकरिता आला. बरेच महिने होऊन गेले, पण गुरूंनी काहीच शिकवले नाही, अशी त्याने एकदा तक्रार केली. त्या दिवशीपासून गुरूंनी त्याला गुरुकुलासाठी अन्न आणण्याचे काम दिले. ज्या ठिकाणी तो अन्न आणायला जात असे तेथे एक पोपट होता. तो रोज त्या पोपटासोबत बोलत असे. एक दिवस तो पोपट त्याला म्हणाला, ‘‘तुझे गुरू खूप महान असल्याचे मी ऐकतो. गेली अनेक वर्षे मी या पिंजर्‍यात बंद आहे. माझ्या सुटकेचा मार्ग त्यांना विचार.’’ तो शिष्य म्हणाला, ‘‘माझेही तुझ्यासारखेच मत होते. मी तेथे असून त्यांनी मला अद्याप काही शिकवले नाही. तुला तेथून काय सांगणार.’’ पोपट खूपच मागे लागल्यामुळे शिष्याने गुरूंना पोपटाचा प्रश्‍न विचारला. दुसरे दिवशी तो पोपटाला म्हणाला, ‘‘तुझा प्रश्‍न मी गुरूंना विचारला. पण, ते डोके खाली टाकून मेल्यासारखे झोपून गेले. मी म्हणालो होतो ना, ते काही सांगणार नाहीत.’’ दुसरे दिवशी तो नेहमीप्रमाणे अन्न आणायला गेला तेव्हा त्याला पोपटाचा पिंजरा रिकामा दिसला. त्याने त्याबद्दल मालकाला विचारले. तो म्हणाला, ‘‘काल दुपारपासून पोपटाने खाणेपिणे सोडले. तो मान खाली टाकून मेल्यासारखा पडला होता. बहुधा मेला असावा म्हणून त्याला पिंजर्‍यातून बाहेर काढले. आणि काय आश्‍चर्य? अचानक तो उडून गेला.’’ हे ऐकल्याबरोबर शिष्याच्या डोक्यात प्रकाश पडला. आश्रमात गेल्याबरोबर गुरूंच्या पायावर त्याने डोके ठेवले आणि म्हणाला, ‘‘गुरुदेव, आज पोपट पिंजर्‍यातून मुक्त झाला.’’ गुरू म्हणाले, ‘‘याच क्षणाची मी वाट पाहात होतो. तू प्रथम शिकणे शिकावे, हा माझा प्रयत्न होता. आता मी फक्त निमित्तमात्र!’’ आजच्या भाषेत प्रथम ‘लर्निंग टु लर्न’ शिकवणारे त्यांचे गुरुकुल होते. एकदा यात माणूस पारंगत झाला तर आयुष्यभर शिक्षण कधी संपत नाही. ते संपू नये. कारण खर्‍या परीक्षा नंतरच होणार असतात. शिक्षणातून शिकण्याची वृत्ती निर्माण व्हावी. ती निर्माण झाली तरच विद्या माणसाला मुक्त करते, असे म्हणता येईल.
एका तलावाचे फायबर ग्लासने दोन भाग करण्यात आले. ही काच अत्यंत पारदर्शक होती. एका बाजूला काही शार्क मासे ठेवण्यात आले व दुसर्‍या बाजूला छोटे मासे ठेवण्यात आले. ते मासे खाण्याकरिता शार्क अत्यंत वेगाने तुटून पडत, पण पार्टीशन असल्यामुळे त्यावरच आदळत. एका बाजूला छोट्या माशांची संख्या हळूहळू वाढवली गेली. दर वेळी शार्क खाण्याकरिता प्रयत्न करायचे, पण त्यांना यश येत नसे. शेवटी त्यांनी प्रयत्न सोडून दिले. एक दिवस काचेचे ते पार्टीशन काढून टाकण्यात आले. पण, दोन्ही बाजूचे मासे एका विशिष्ट जागेतच पोहत. शार्क माशांना अशा प्रकारे शिकवले गेले.
माणसांच्या मेंदूंनाही अशा प्रकारे शिकवले जाते. त्यालाच अनेकदा शिक्षण, संस्कार म्हटले जाते. अशा शिक्षणातून समाजात समस्या निर्माण होतात. माणसं संकुचित बनतात. डोळ्यांना झापड बांधतात. शिकण्याची वृत्ती नसल्यामुळे एखादा गुरू, विशिष्ट विचारधारा, एखादा पंथ, संप्रदाय सांगतील तेच ज्ञान, असे मानतात. त्यांचे प्रमुख म्हणतील तेच खरे, ते म्हणतील ते अनुशासन, अशी संकुचित वृत्ती निर्माण होते. अनेकदा महान विचारांचेही असे सांप्रदायिकीकरण होते. त्यांची एक कडवी शिस्त तयार होते. ती सांभाळताना मूळ प्रयोजनाकडे दुर्लक्ष होते. त्या चौकटीतच जगातल्या सर्व समस्यांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न होतो. असा धोका होऊ शकतो म्हणूनच आपल्या ऋषिमुनींनी ‘सा विद्या या विमुक्तये’ असे आग्रहपूर्वक सांगितले.
आपल्याकडे गुरूविषयी एक फार सुंदर ओवी आहे-
जो जो जयाचा देखिला गुण
तो तो मी गुरू केला जाण
गुरूसी आले अगाधपण
जगी सर्वत्र गुरू दिसे…
खरेच, शिकण्याची ही मूलभूत भूमिका आहे. जगाकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन शिक्षणातून निर्माण झाला तर जीवन समृद्ध होते. विनोबा याला गुणचुंबक वृत्ती म्हणत. शेवटी गुरू म्हणजे ज्ञान, तत्त्व. त्याला अगाधपण आलेच पाहिजे. जगी सर्वत्र गुरू दिसे, या वृत्तीत जगाविषयी आदरभाव आहे, श्रद्धा आहे, त्यांच्याकडून शिकण्याची तळमळ आहे. या पातळीवर गुरूचे व्यक्तिरूप समष्टीत विलीन होते. व्यक्तिनिरपेक्षतेचा समग्रभाव या वृत्तीतच सामावलेला आहे.
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११