राष्ट्रपतिपदाची निवडणूक कशी होते?

0
114

प्रासंगिक

राष्ट्रपतींची निवडणूक अप्रत्यक्ष पद्धतीने होते. यासाठी एक इलेक्टोरल कॉलेज तयार केले आहे. या कॉलेजमध्ये सर्व खासदार व सर्व आमदार सदस्य (दिल्ली व पॉंडेचरीच्या विधानसभांचे सदस्यसुद्धा) या नात्याने मतदार असतात. म्हणून राष्ट्रपतिपदासाठी लोकसभा व राज्यसभेचे सदस्य, राज्यांच्या विधानसभांचे (विधान परिषद मात्र नाही) सदस्य मतदान करीत असतात.
इलेक्टोरल कॉलेज : लोकसभेचे सदस्य ५४३ + राज्यसभेचे सदस्य २३३ = ७७६ अशी सर्व खासदारांची एकूण संख्या आहे. भारतातल्या सर्व राज्यातील आमदारांची एकूण संख्या ४१२० आहे. यात खासदारांची संख्या मिळविली की एकूण मतदार = ४८९६ इतके होतील. इतक्या सदस्यांचे हे इलेक्टोरल कॉलेज असते. या सदस्यांच्या मतांचे मूल्य (व्हॅल्यू ऑफ व्होट) वेगवेगळे असते. ते कसे ठरवावे ते राज्य घटनेच्या ५५(२) कलमानुसार ठरले आहे.
आमदाराच्या मताचे मूल्य कसे ठरते? : प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य राज्यनिहाय वेगवेगळे असते. एक आमदार म्हणून एक मत असले तरी त्याचे मतमूल्य वेगळे असते. ते नेहमीच एकापेक्षा जास्त असते. मात्र, प्रत्येक राज्यापुरते प्रत्येक आमदाराच्या मताचे मूल्य सारखेच असते. जसे महाराष्ट्र राज्याच्या लोकसंख्येला महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेच्या (विधान परिषद नाही) सदस्यांच्या संख्येने भागले असता जी संख्या येईल, तेवढे त्या विधानसभेच्या प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य असते. हिशोबासाठी राज्यांची १९७१ ची लोकसंख्या (सध्याची नव्हे) विचारात घेतली जाते. ४२ व्या व ८४ व्या घटनादुरुस्तीला अनुसरून हा निर्णय आहे. ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रणाचा कार्यक्रम प्रभावीपणे अंमलात आणला आहे व लोकसंख्या नियंत्रित केली आहे, त्यांचे नुकसान होऊ नये म्हणून, ही भूमिका या निर्णयामागे घेतलेली आहे. महाराष्ट्राची १९७१ ची लोकसंख्या ५०,४१,२२३५ इतकी होती. महाराष्ट्राच्या विधानसभेत २८८ सदस्य आहेत. महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येला २८८००० ने (२८ गुणिले एक हजार) भागल्यास पूर्णांकातील भागाकार १७५ येतो. दशांश चिन्हापुढचे अंक विचारात घेतले जात नाहीत. म्हणून महाराष्ट्राच्या प्रत्येक विधानसभा सदस्याच्या मताचे मूल्य १७५ इतके येते व महाराष्ट्र राज्याच्या मतांचे एकूण मूल्य ५०४०० (१७५ गुणिले २२८) इतके होते. असाच हिशोब केल्यास सिक्कीमच्या प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य ७, तर उत्तरप्रदेशच्या प्रत्येक सदस्याच्या मताचे मूल्य सर्वात जास्त म्हणजे २०८ इतके येते. अशा प्रकारे सिक्कीमच्या एका सदस्याचे मत मिळाले म्हणजे ७ मतमूल्य मिळाले, महाराष्ट्राच्या एका सदस्याचे मत मिळाले म्हणजे १७५ मतमूल्य मिळाले व उत्तरप्रदेशाच्या एका सदस्याचे मत मिळाले म्हणजे २०८ मतमूल्य मिळाले, असा हिशोब करून मतमूल्याची गणना होत असते. उत्तरप्रदेश विधानसभेच्या सर्व सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य ठरविण्यासाठी ४०३ ला २०८ ने गुणले असता ही संख्या ८३,८२४ येते. हे उत्तरप्रदेश राज्याचे एकूण मतमूल्य ठरले. जे राज्य मोठे म्हणजेच ज्या राज्यातील मतदार संख्या जास्त, त्या राज्याच्या विधानसभेतील सदस्याच्या मताचे मूल्य त्या प्रमाणात जास्त असते. अशा प्रकारे सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य पाच लक्ष एकोणपन्नास हजार चारशे चौर्‍याहत्तर आहे.
संसद सदस्यांच्या मताचे मूल्य कसे ठरते? : संसद सदस्याच्या एका मताचे मूल्य ठरविण्यासाठी सर्व विधानसभा सदस्यांच्या एकूण मूल्याला खासदारांच्या एकूण संख्येने भागतात. सर्व राज्यांच्या विधानसभा सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य = ५,४९,४७४ (पाच लक्ष एकोणपन्नास हजार चारशे चौर्‍याहत्तर) आहे. या संख्येला सर्व खासदारांच्या संख्येने म्हणजे ७७६ने (५४३+२३३) भागतात. हा भागाकार ७०८ इतका येतो म्हणून प्रत्येक खासदाराच्या मताचे मूल्य ७०८ इतके ठरते. म्हणून एका खासदाराचे मत मिळाले म्हणजे ७०८ मतमूल्य मिळाले, असा हिशोब करतात.
लोकसभेचे सदस्य ५४३ म्हणून लोकसभेतील सदस्यांचे एकूण मतमूल्य ५४३ गुणिले ७७६ = ३,८४,४४४ व राज्यसभेच्या सर्व सदस्यांच्या मतांचे एकूण मूल्य (२३३ गुणिले ७७६ ) = १,६४,९६४ इतके म्हणजेच सर्व सदस्यांचे मतमूल्य ५,४९,४०८ इतके असते. अशा प्रकारे सर्व खासदार व सर्व आमदारांच्या मतांचे मूल्य ५,४९,४०८+५,४९,४७४ = १०,९८,८८२ इतके होते. पन्नास टक्क्यांपेक्षा एक जास्त मत ज्याला मिळेल तो उमेदवार राष्ट्रपतिपदी निवडून येतो.
राष्ट्रपतीची निवड : शिक्षक व पदवीधर मतदारसंघातील पसंतिक्रमानुसार उमेदवार निवडण्याची पद्धती या निवडणुकीत वापरतात. हिला एकल संक्रामक मत (सिंगल ट्रान्सफरेबल व्होट) असे नाव आहे. जेवढे उमेदवार तेवढे पसंतिक्रम (प्रिफरन्स) मतदार मतपत्रिकेवर नोंदवतो. प्रथम पहिल्या पसंतिक्रमानुसार मते वेगळी केली जातात. ज्या उमेदवाराला पन्नास टक्क्यांपेक्षा निदान एकतरी मत जास्त असेल तो निवडून आला असे ठरते. जर कोणत्याच उमेदवाराला अशी पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त मते नसतील, तर सर्वात कमी मते असणार्‍या उमेदवाराला बाद करून त्याच्या प्रत्येक मतपत्रिकेवर दुसरा क्रमांक कुणाला दिलेला आहे, ते पाहून ती मते त्या उमेदवाराला संक्रमित करतात. तरीही पन्नास टक्क्यांपेक्षा एकतरी मत मिळविण्याचा कोटा पूर्ण होत नसेल तर सर्वात कमी मते असणार्‍या उमेदवारांना क्रमाक्रमाने बाद करतात व कोटा पूर्ण होताच तो उमेदवार निवडून आल्याचे जाहीर करतात.
राष्ट्रपतिपदासाठीच्या उमेदवाराची पात्रता : राज्य घटनेच्या अठ्ठावन्नाव्या कलमात ही पात्रता दिली आहे. ३५ वर्षे पूर्ण वयाचा, भारताचा नागरिक असलेला, लोकसभेचा सदस्य होण्यास पात्र असलेला व केन्द्र शासन, राज्य शासन वा स्थानिक अधिकरणातील कोणत्याही फायद्याच्या पदाचा (ऑफिस ऑफ प्रॉफिट) लाभ मिळत नसलेला कोणताही मतदार राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवू शकतो. उपराष्ट्रपती, राज्याचा राज्यपाल, केंद्राचा वा राज्याचा मंत्री राष्ट्रपतिपदाची निवडणूक लढवू शकतो. चहा विकणारा एक नागरिक जसा भारताचा पंतप्रधान होऊ शकतो तसाच दुसरा चहा विकणारा भारताचा राष्ट्रपतिपदाचा उमेदवार असू शकेल. मात्र, त्याच्या अर्जाचे सूचन व अनुमोदन निदान प्रत्येकी पन्नास मतदारांनी केलेले असले पाहिजे. याचा अर्थ सूचक व अनुमोदक हे विधानसभा व/वा संसदेचे सदस्य असले पाहिजेत. राष्ट्रपतिपदाची निवडणूक गंभीरतेने घेतली जावी, या उद्देशाने ही अट बर्‍याच उशिराने घालण्यात आली आहे.
कोण होणार नवीन राष्ट्रपती? : भाजपाच्या उत्तरप्रदेशातील ऐतिहासिक विजयानंतर जुलै २०१७ मध्ये होऊ घातलेल्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची स्थिती एकदम बदलली आहे. या पाच राज्यांमध्ये राष्ट्रपती निवडणुकीच्या १ लाख ३ हजार ७५६ हजार मतांची वाटणी होणार होती. त्यातील, सुमारे ७४ हजार मते आताच भाजपाच्या खिशात आली असून, राष्ट्रपती निवडणुकीतील एकूण १० लाख ९८ हजार ८८२ मतांपैकी भाजपा-रालोआपाशी आता सव्वापाच लाख मते आहेत. म्हणजे निवडणूक जिंकण्यासाठी २५ हजार मतांचीच आवश्यकता आहे.
पण, शिवसेनेचे लोकसभेत १८ सदस्य, राज्यसभेत ३ सदस्य, असे एकूण २१ सदस्य आहेत. २१ गुणिले ७०८= १४८६८ (संसद सदस्यांचे मतमूल्य). विधानसभेत ६३ सदस्य आहेत. ६३ गुणिले १७५= ११०२५ मते आहेत. म्हणून शिवसेनेच्या सर्व सदस्यांचे मतमूल्य ११०२५ +१४८६८= २५८९३ आहे. हे मतमूल्य व अन्य २५००० असे मिळून एकूण ५०८९३ मतमूल्य मिळवून भाजपाला राष्ट्रपतीची निवडणूक जिंकायची आहे.
वसंत काणे,९४२२८०४४३०