मी ‘नशीब’वान

0
202

‘आज दुनिया की कोई ताकत मुझे मजबूर नही कर सकती, नही रोक सकती…’’ वगैरे वगैरे डायलॉग्ज १९९० च्या जवळपास सर्व सिनेमांमध्ये असायचेच. पण, त्याचा खरा उद्देश नशीब किंवा डेस्टिनीबाबत सांगण्याचा असायचा.
एक छान वाक्य वाचण्यात आले होते- ‘वी डोण्ट मीट पीपल बाय ऍक्सिडेंट, दे आर मेंट टु क्रॉस अवर पाथ्स फॉर रिझन.’’ आणि हे खरंही आहे. कुठलीच गोष्ट विनाकारण होत नसते.
माणूस लहानपणापासून प्रयत्नवादी असतो आणि त्याचे प्रयत्न हे कुठल्यातरी कारणाला धरूनच असतात. त्याचे प्रयत्न, त्यातील गती त्या प्रयत्नांच्या यशाची प्रगती ठरवीत असतात. आपले योग्य वेळेस घेतलेले अचूक निर्णय आपले नशीब घडवू शकतात किंवा वेळ चुकली तर नशीब बिघडवूपण शकतात. मित्रांनो, हे विसरून कसं चालेल की, आपले नशीब आपली अवस्था नाही तर निर्णय ठरवीत असतात. आपण जर आपल्या नशिबााला आकार द्यायला सुरुवात केली नाही, तर कोणी अजून द्यायला लागतो आणि आपण आपल्याला हवे तसे नाही तर आकार देणार्‍याला हवे तसे घडायला लागतो.
बॉस, जेव्हा जेव्हा मी कॉलेजेसमध्ये फिनिशिंग स्कूलमध्ये लेक्चर द्यायला जातो, तेव्हा प्रत्येक वेळेस एक गोष्ट आवर्जून सांगतो की, तुम्ही (समोर बसलेले विद्यार्थी) स्वत: ठरवले आहे की, कसे घडायचे आणि म्हणूनच तुम्ही इथे आहात. मी किंवा माझ्यासारखे इथे फक्त फिनिशिंग टच देण्यासाठी आले आहोत.
आपण जेव्हा नशिबाच्या गोष्टी करतो, तेव्हा आपण प्रत्येक वेळेस एकतर भूतकाळात डोकावतो किंवा भविष्याचा वेध घेत असतो. उदा. काही कारणांमुळे हातातून सुटलेल्या नोकरीच्या संधीबद्दल जेव्हा कोणी ‘नशिबातच नव्हती’ असे म्हणतो, तेव्हा त्या नोकरीबद्दल आणि त्यातून पुढच्या भविष्याचे काही आराखडे आधीच बांधून झालेले असतात. जेव्हा आपण स्वत:वर प्रेम करतो, स्वत:ची काळजी घेतो आणि स्वत:ला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करतो म्हणून काही आपण स्वार्थी होत नाही, तर ती आपली प्राथमिकता असते आयुष्याची. मित्रांनो, आयुष्यात चांगले बदल आणावयाचे असतील आणि आहे त्यापेक्षा जास्त चांगले दिवस बघायचे असतील (हो! मी जाणीवपूर्वक आहे त्यापेक्षा म्हणतोय. कारण वर्तमानाला वाईट म्हणणारा चांगल्या भविष्याकरिता योग्य वाटचाल व्यवस्थित करू शकत नाही), तर प्रयत्न आणि प्रेम आहे हे बोलून दाखवायचे नसते, तर ते करून दाखवायचे असते. दोन्ही ठिकाणी ‘ऍक्शन स्पीक्स लाऊडर दॅन व्हॉईस’ हे तत्त्व लागू असते. रिझल्टस् बोलतात मित्रांनो अल्टिमेटली.
काही गोष्टी लक्षात घ्यायलाच हव्या जेव्हा आपण आपले नशीब बदलण्याचा प्रयत्न करत असतो, माझे एक फंडू तत्त्व आहे, माझ्याजवळच्या सर्वांनाच माहीत झालेच आहे आणि तुम्हीपण माझ्या जवळचेच ना, म्हणून तुम्हालापण सांगतो. यशस्वी होण्याकरिता आणि आनंदी राहण्याकरिता काही व्यक्ती, काही ठिकाणे, काही जागा, काही विचार, काही शब्द, काही गोष्टी यांना दूर ठेवावे लागते, यांना दूर करावे लागते किंवा यांच्यापासून दूर जावे लागते. तसेच यशस्वी होण्याकरिता आणि आनंदी राहण्याकरिता यांच्या जवळ जावे लागते, यांना जवळ करावे लागते किंवा यांचे व्हावे लागते.
बॉस, सिद्ध करून दाखवायचे आहे तर ते इतर कोणालाही नाही तर स्वत:ला. डोण्ट प्रूव्ह एनिथिंग टु एनीवन. कारण समोरच्याला आपल्या आनंदाशी, आपल्या यशाशी ते देणेघेणे नसते जे आपल्या स्वत:ला असते. मुले चांगली (म्हणजे नक्की काय?) कर्तबगार निघाली तर आईवडिलांना नशीबवान म्हटले जाते. पण, फार थोडे एवढे सुजाण असतात की, त्यांची प्रतिक्रिया- ‘‘फार छान घडवले हो तुम्ही आपल्या मुलांना,’’ असे म्हणतात. बिना प्रयत्नांचे नशीब बदलूच शकत नाही. दोन-तीन वेळा सलगपणे अपयश मिळाले तर ‘साले नशीबच खराब’ असे म्हणण्यापेक्षा, माझे प्रयत्न नक्की कुठे चुकत आहेत किंवा कुठे कमी पडत आहेत, याचा विचार करावा. परावलंबी राहून नशीब बदलवता येत नाही.
नशीब आणि लग्न हे एकमेकांसाठी नेहमीच वापरले जाणारे शब्द. नवरा आणि बायको हे असे नाते आहे की, जिथे ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ असे म्हणतात किंवा ‘लग्न झाले आणि नशीबच पालटले’ वगैरे वगैरे. मित्रांनो, ते लग्न असो किंवा कामाचे ठिकाण, नशिबाला दोष दिला जातो तो काही ठरावीक कारणांकरिता- काम खूप छान आहे, ऑफिसचे वातावरणपण छान आहे, फक्त बॉस खूपच खडूस आहे किंवा बॉस खूप चांगला आहे, पण कंपनीतले वातावरण बेक्कार आहे. लग्नाचेपण तसेच. नवरा/बायको तर एकमेकांना खूप छान वाटतात, त्या नात्यांमध्ये ते खूप खुश असतात. हे किंवा हा/ही फार चांगली असते. ते नाते मिळतेपण. अनेकांना सासुरवाडीचापण खूप आधार आणि आनंदी नाते मिळते, तर काहींना ते नाहीच. यात नशिबाला दोष देण्यापेक्षा सामंंजस्याचा अभाव आहे किंवा स्वत:बद्दलच्या कल्पना किंवा एकमेकांबद्दलच्या संकल्पनांमुळे असे आहे हे समजायचे. काहींना सासुरवाडी खूप छान मिळते, तर लाईफ पार्टनरबद्दल प्रॉब्लेम्स असतात. मित्रांनो, प्रत्येक वेळेस नशिबाला दोष देण्यापेक्षा ‘हर किसिको मुकम्मल जहॉं नही मिलता, कभी जमीं तो कभी आसमां नही मिलता’ हा शेर आठवून घ्यायचा.
मित्रांनो, संधी मिळाली की त्या संधीचा योग्य वापर करून पुढे जाणे, हे आपल्या हातात आहे. आयुष्यात हवे ते मिळण्यासाठी संधी मिळण्याची वाट ही एकतर बघावी लागते किंवा इतके सामर्थ्य मिळवायचे की, आपल्याकरिता ती संधी उपलब्ध होईल. पण दोन्ही विनासायास, सहजपणे होणे शक्यच नाही.
नशीब पालटवण्याकरिता कठोर श्रम तर करावेच लागणार, पण त्यासोबतच अलर्ट आणि स्मार्ट राहणेपण आवश्यक ठरते. चांगल्या आयुष्याकरिता काही वेळेस कठोर निर्णय घ्यायची वेळ येेते, पण ते घेतल्याने जर का इतरांचे काही नुकसान न होता स्वत:चे चांगले होत असेल, तर ते घ्यावेच.
प्रत्यक्षात बघितले तर अनेकांच्या आयुष्यात खडतरताच दिसते. का? याचे उत्तर खरंच मिळतच नाही हो. पण, मग अशा वेळेस आहे त्यात समाधान मानतात आणि असलेले आयुष्य आहे तसे स्वीकारतात. त्यांच्या तोंडून नशिबाला दोष कधीच ऐकायला मिळत नाही. बॉस, कधीकधी वाटते की ‘दी सीक्रेट’ या प्रसिद्ध पुस्तकात ज्या आकर्षणाचा कायदा (लॉ ऑफ अट्रॅक्शन) सांगितला आहे तो खरा असावा. नेहमी चांगल्याचीच आस आणि कास धरा. मी प्रामाणिकपणे आणि योग्य प्रयत्न करतो आहे, तर माझे चांगलेच होईल, हा आत्मविश्‍वास बाळगला तर चांगलेच होईल. अपयश आले तर जो कमजोर असतो तोच नशिबाला दोष देऊन मोकळा होतो, हिंमतवान व्यक्ती ‘वन्स अगेन- लेट अस ट्राय’ म्हणत समोर जाते.
मित्रांनो, नशीब पालटवायचे असेल, तर शिक्षणाला महत्त्व दिलेच पाहिजे. शिक्षण पुस्तकांमधून डिग्रीच्या स्वरूपातले असो किंवा रोजच्या आयुष्यातल्या अनुभवांमुळे, पण माणसाने शिकत राहायलाच हवे. ज्ञान आणि संयम- दोन्ही गोष्टी माणसाला चांगलेच देतात. मित्रांनो, चुकीच्या ज्ञानापेक्षा अज्ञान केव्हाही चांगले. चुकीचे आणि अर्धवट ज्ञान हे माणसाला नेहमीच त्रासदायक ठरते. मित्रांनो, आयुष्यात चांगल्या गोष्टी येण्याकरिता आपणपण चांगले असावे लागते. प्रवादांपासून दूर राहणे हे चांगल्या गोष्टींकडे नेण्याची वाट सुकर आणि सहज करतात. संचित, मग ते संंबंधांचे असो किंवा धनाचे, नशीब बदलवण्यास मदतच करतात किंवा नशीब फिरवण्यातसुद्धा. आयुष्यात घडणार्‍या गोष्टींमध्ये बहुतांश गोष्टी या योग्यतेवर अवलंबून असतात. माणसाला तेच मिळते जी त्याची योग्यता आणि पात्रता असते. चुकीचे स्वमूल्यांकन करून मिळाले नाही म्हणत रडण्यात काहीच अर्थ नसतो.
माणूस जेव्हा आपल्या श्रमांमध्ये मग्न असतो तेव्हा त्याने त्यांच्या श्रमांचे मूल्यांकन आणि आकलन वेळोवेळी करणे आवश्यक ठरते (असेसमेंट ऍण्ड ग्रासपिंग करणे). मूल्यांकनामुळे प्रयत्न योग्य दिशेने चालले आहेत की नाही, याचे भान राहते. ज्यांना आपण नशीबवान म्हणतो अशांशी बोलून बघा कधी, त्यांच्या बोलण्यातून कृतज्ञ वृत्ती दिसून येते. कृतज्ञता बाळगण्याची कृती इतरांच्या मनात आपल्याबद्दल एक चांगली प्रतिमा तयार करते आणि चांगली प्रतिमा/छबी आपल्याला हवी ती संधी मिळण्यात साहाय्यभूत ठरते. ईष्यार्र् आणि आकस ठेवल्याने यश- पर्यायाने चांगले नशीब दुरावते.
अनंत पाटलांच्या गाण्याची आठवण होते, नशीब या शब्दाबद्दल विचार केला तर-
जगी जीवनाचे सार
जाणूनी घे तू सत्वर
जैसे ज्याचे कर्म तैसे
फळ देतो रे ईश्‍वर…
– ऍड. सचिन नारळे/९४२३१०४००३