उजळुनी विवेकदीप

0
109

परवा आम्ही उभयता एका समारंभाला गेलो असता, यांच्या समवेत काही विद्यार्थी दाटी करून उभे होते. बहुधा त्या विद्यार्थ्यांनी १० वी, १२ वीची परीक्षा नुकतीच दिली असावी. मीही कुतूहलपूर्वक त्यांचे निरीक्षण करीत होते. पण, काहीसा त्यांचा सूर नैराश्यात्मक वाटला. नंतर काही वेळाने पालकही तेथे आले. पालकांच्या चर्येवरून आढळत होते की, परीक्षाच फक्त पाल्यांनी दिली, अभ्यास मात्र पालकांनीच केला! विद्यार्थी आणि पालकांना, एकही गुण कमी पडता कामा नये असे वाटत होते. परवाचा हा प्रसंग माझ्या स्मृतिकलशाच्या मन:पटलावर सारखा हिंदकळत होता.
मित्रांनो, वस्तुत: अभ्यास म्हणजे आपल्याला आवडणार्‍या विषयाच्या मूलतत्त्वांचे चिंतन, मनन, पठण आणि लेखन. त्याचप्रमाणे आपल्याला न जमणारी, पण मनातून आवडणारी एखादी गोष्ट सातत्याने करून पाहणे हे होय.
‘कर्मण्ये वाधिकारस्ते मां फलेषुु कदाचन’ हा गीतोपदेश आपल्या नयनचक्षूसमोर ठेवून कर्मप्रवण व्हा. यश तुमचेच आहे. यशस्वी लोकांना सर्वच गोष्टी उत्तम मिळतात असे नाही, तर ज्या गोष्टी त्यांना मिळतात त्यांना उत्तम बनविण्याची कला त्या महान व्यक्तिमत्त्वामध्ये असते. म्हणून ते यशस्वी होतात. त्याचप्रमाणे आजच्या युगात एकदा यश मिळविणे पुरेसे नाही. ते यश सातत्याने टिकवून ठेवणे, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.
मित्रांनो, आकलन, बदल आणि उपयोजन या तिन्ही पातळ्यांवर जेव्हा आपण एखादी नवी गोष्ट आत्मसात करतो ते खरे ज्ञानार्जन. पुष्कळदा आपल्या वर्गातील पाठ किंवा उदारण वर्गात समजते, परंतु घरी आल्यानंतर ते परत विसरल्यासारखे होते. त्यामुळे आकलन म्हणजे ज्ञानार्जनाची फक्त पहिली पायरी आहे. त्याचा दुसरा टप्पा म्हणजे त्यात बदल घडवून आणण्याची क्षमता प्राप्त करणे आणि तिसरा टप्पा म्हणजे उपयोजन होय. मिळालेले ज्ञान योग्य वेळी वापरता आले पाहिजे. थोडक्यात आकलन, बदल आणि उपयोजन या तिन्ही गोष्टी जो आत्मसात करतो ते खरे ज्ञानार्जन. शिवाय, या तिन्ही गोष्टींसोबत भावनिक विकास वृद्धिंगत होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण भावनिक विकासावर तुमचा मानसिक, बौद्धिक, शारीरिक विकास अवलंबून आहे.
तुम्ही जर उत्तम ग्रंथांशी नाते जोडले, तर जगण्याला सुंदर सूर प्राप्त होतो. ग्रंथच ‘जगा आणि जगू द्या’ ही विचारसरणी मनात रुजवतात. आपल्याला प्रकाशाच्या दिशेने वाटचाल करायला प्रवृत्त करतात. अंधाराला कवटाळून प्रकाशाची वाट कधी गवसणार नाही. जीवनात प्रसन्नतेची पहाट फुलण्यासाठी प्रकाशावर प्रेम करणारी भावना अंतर्यामी जपली पाहिजे.
एका शिल्पकाराने सुबक, रेखीव अशा काही देव-देवतांच्या मूर्ती घडविल्या. कलावंत तो. एकाने त्याला प्रश्‍न विचारला, ‘‘एवढे सुंदर शिल्प घडवलेस तरी कसे?’’ शिल्पकार म्हणाला, ‘‘मी काय केले? ‘‘अरे, दगडातून देव घडविलास, पाषाणातून परमेश्‍वर घडविलास नि मी काय केले? असे कसे म्हणतोस?’’ शिल्पकाराने नम्रपणे उत्तर दिले, ‘‘मी एकच गोष्ट केली. दगडातला नको असलेला भाग माझ्याकडच्या छन्नीने काढून टाकला. मूर्ती तर त्या दगडातच होती.’’ माणसाचं घडणं यापेक्षा काय वेगळं असतं. नको असलेला विकाराचा, वाईट गोष्टींचा भाग काढून टाकला की, आपल्यातूनही सुबक, रेखीव मूर्ती घडू शकते.
पण, आपण मात्र परिस्थिती विचित्र आहे म्हणून निष्क्रिय राहतो. त्या परिस्थितीला अर्धवट सोडून देणे रास्त नाही. कारण तिच्यात तादात्म्य घडवून आणण्याचे सामर्थ्य आपल्या मन, मनगट व मेंदूत आहे. माणूस हा परिवर्तनशील प्राणी आहे. पण माणसाचे घर, भाषा, संस्कृती काळानुसार बदलत गेली. परिवर्तन हा मानवी गुणधर्म आहे. दुरितांचे तिमिर दूर करून प्रकाशाचे पर्व उभे करणे, हेही परिवर्तनच आहे. जगावे तर असे जगावे की, इतिहासाचे एक तरी पान आपल्या नावे व्हावे.
पालकांनीदेखील आपल्या अपेक्षांचे ओझे अपत्यांवर लादणे गैर आहे. त्याची अहर्निश इतरांशी तुलना करीत राहणे सर्वथा अयोग्य आहे. आपल्या मुलांमध्ये न्यूनगंड, द्वेषांध स्पर्धा, गलिच्छ भाषा आणि विकृत विचार निर्माण होणार नाही, याची सर्वांनीच काळजी घ्यायला हवी.
तसेच आपले ज्ञान चतुरस्र असले पाहिजे. ज्ञानाला बुद्धी आणि विवेकाची जोड हवी. अन्यथा पंचतंत्रातील विद्वान पंडितासारखी आपली गती होईल. या पंडिताला मृत प्राण्यांना पुन्हा जिवंत करण्याची सिद्धी अर्थात ज्ञान अवगत असते. परंतु, निचेष्ट पडलेल्या सिंहाला आपण आपल्या सिद्धीने उठविल्यास तो आपल्यावर हल्ला करेल, याचे तारतम्य त्याच्याजवळ नसते. म्हणूनच नॉलेज आणि विसडम या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत. एखाद्या विषयासंबंधी परिपूर्ण माहिती आपल्याजवळ असणे म्हणजे ज्ञान, तर त्याचा वापर सुयोग्य पद्धतीने समाजहितासाठी करणे हा बुद्धिविवेक.
कोणतेही कार्य करताना अडचणी येणारच. हे गृहीत धरून पुढे जाण्याची तयारी ठेवावी. निर्मनुष्य रस्त्यावर वाहन चालविण्यात काय कौशल्य? रहदारीतून गाडी पुढे नेता आली पहिजे. तरच तुम्हाला उत्तम व्यक्तिमत्त्वाच्या उच्चासनावर विराजमान होता येईल.
उत्तम व्यक्तिमत्त्व याचा अर्थ केवळ सुंदर दिसणे, चांगला पोशाख, दागिने इतकेच मर्यादित स्वरूप होत नाही. दुसर्‍या बाजूला नुसते शब्दपांडित्य, मोठमोठ्या पदव्या यांच्यामुळेही व्यक्तिमत्त्व परिपूर्ण होत नाही. तुमचा सुदृढ असा शारीरिक विकासही चांगल्या व्यक्तिमत्त्वासाठी आवश्यक आहेच. याशिवाय तुमचे वागणे, बोलणे समाजमान्य असायला हवे. स्वावलंबन, परोपकार, सचोटी, संयम, परिश्रम इत्यादी मानवी मूल्यांना तुम्ही मनापासून आत्मसात करणेही आवश्यक आहे. संकटावर मात करून अंतिम ध्येय गाठण्याची एक अचाट शक्ती आपल्या मनात वास करीत असावी. एखाद्या घटनेमुळे आपले मन मरगळून जाऊ शकते. मनावर राखेचे मळभ साठू शकते. पण, त्या राखेतही एखादा अग्निकण असतो व त्याच्या लहरीने राख उडून जाते. आतला अग्निकण फुलतो. आपण सतेज होऊन जातो. आपल्याला कर्तृत्वाचे पंख फुटतात. अवघे आकाश आपले कार्यक्षेत्र होते. सूर्य आपला आदर्श होतो. आपण उत्तुंग भरारी घेतो. सूर्याचा प्रकाश नि फुलांचा गंध घेऊन आपण सृष्टीमध्ये मुक्त संचार करतो आणि मग आपल्याला कोलंबसाचे गीत ऐकू यायला लागते-
‘अनंत अमुची ध्येयशक्ती
अनंत अन् आशा
किनारा तुला पामराला…!’
– जयश्री हेमंत कविमंडन/७७९८७८९८८८