शीर्षकगीताविष्कार

0
163

सध्या वयाची पन्नाशी पार केलेल्या तमाम मंडळींना चित्रपटांची ‘टायटल्स’ चांगलीच आठवत असतील. सिनेमा सुरू होण्यापूर्वी निर्माता, दिग्दर्शक, कलाकार, सर्व तंत्रज्ञ मंडळी व सहकारी यांची श्रेय्यनामावली (क्रेडिट्स लिस्ट) दाखवताना जे पार्श्‍वसंगीत वाजत असे त्याला टायटल म्युझिक असे म्हटले जायचे. हा २/३ मिनिटांचा कालावधी खास आपल्यासाठीच आहे, असं बाहेर उभ्या असलेल्या सगळ्या शौकिनांना (व्यसनी) वाटत असे. बहुतेक वेळेला हा प्रसंग ‘लेटकमर्स व सिट एसकॉर्टर्स’ यांचा व्यत्यय होत असल्याने अर्थातच दुर्लक्षित रहात होता. निर्मात्यांच्या निदर्शनात ही बाब येताच त्यांनी मग चित्रपटातील काही दृश्ये यात मिसळवून प्रेक्षकांना आकर्षित करण्यात व वेळेवर दाखल करण्यात यश मिळवले. चित्रपट व नाटक या दोन्ही कलाप्रकारात खेळ सुरू होण्यापूर्वी आजही तीनदा बेल/घंटा वाजवण्याची आहे. प्रेक्षकांनी निर्धारित वेळेपूर्वी थिएटरमध्ये हजर राहण्यासाठीची ही सूचना असते. जेणेकरून प्रेक्षकांनी खेळ सुरू होण्यापूर्वीच स्थानापन्न होऊन आपली कलानिर्मिती सुरुवातीपासून बघावी, त्याचा आंनद घ्यावा ही निर्मात्यांची इच्छा असते. सिनेमावाल्यांनी ‘टायटल म्युझिक’ बनवण्यासाठी कदाचित खूप मेहनत घेतलीही असेल, नाही असे नाही, परंतु अशी किती ‘टायटल म्युझिक’ आपल्या लक्षात राहिली आहेत? आमच्या लहानपणातील ‘कम सप्टेंबर’ व तारुण्यातील ‘शोले’ या पलीकडे काहीही आठवणीत नाही, असे सांगणारेच जास्त असतील!
टायटल सॉंग : पुढे हळूहळू मग काही चित्रपटात ‘टायटल म्युझिक’च्या जागी ‘टायटल सॉंग’ आले आणि लेटकमर्स गाणे चुकू नये म्हणून वेळेआधीच दाखल होण्यास सुरुवात झाली. ही क्लृप्ती जरी यशस्वी ठरली असली तरी प्रेक्षकांच्या दृष्टिकोनातून ती जराशी जबरदस्तीच होती. लेटकमर्सना शिस्त लावण्यासाठी मग काही निर्मात्यांनी सिनेमा सुरू झाल्यानंतरच्या एखाद्या प्रसंगानंतर ही ‘श्रेय्यनामावली’ दाखवण्याचा एक नवीन फंडा सुरू केला, असो!
टायटल म्युझिक ते सिग्नेचर ट्यून : दूरदर्शनचा जन्म झाल्यानंतर साहजिकच वरील पद्धतीची सहीनसही नक्कल करण्यात आली आणि गंमत बघा, बातम्यांच्या सुरुवातीला ‘टायटल म्युझिक’ वाजले रे वाजले की कालपर्यंत थिएटरमध्ये उशिरा येणारा हाच प्रेक्षक हातातले काम सोडून टीव्हीसमोर निमूटपणे खुर्चीत स्थिरावायला लागला. या सुखदानुभवने हुरळून न जाता, हाच धडा घेऊन मग मालिकावाल्यांनी ‘टायटल म्युझिक’ला ’सिग्नेचर ट्यून’चा दर्जा देऊन आपापल्या मालिकांची ती ओळख बनवली आणि विशिष्ट स्वर कानावर पडले की समस्त टीव्हीमल्लिका हातातले कामधाम सोडून धावत पळत (इडियट) टीव्ही बॉक्ससमोर हजर होऊ लागल्या.
सिग्नेचर ट्यून ते शीर्षकगीत : मग अर्थातच समस्त मालिकावाल्यांनी सिनेनिर्मात्यांप्रमाणेच ‘टायटल सॉंग’ हा फंडा यशस्वी अमलात आणण्यास सुरुवात केली. परंतु या वेळी मात्र नुसती नक्कल न करता ‘टायटल सॉंग’चे अनन्यसाधारण महत्त्व जाणून ‘जिंगल्स तज्ज्ञ संगीतकार’ अशोक पत्की यांना पाचारण केले. मग काय एकाहून एक शीर्षक गीतांची निर्मितीच व्हायला लागली आणि ‘टायटल सॉंग’च्या क्षेत्रात अभूतपूर्व अशी क्रांती झाली. कारण ही गाणी इतकी मधुर झाली की, एकवेळ मालिका लक्षात राहिल्या नसतील, परंतु त्यांची शीर्षकगीतं आजही प्रेक्षकांच्या आठवणीत असून ओठांवरही रुळलेली आहेत. ही किमया अर्थातच संगीतकार अशोक पत्की व गायिका देवकी पंडित यांचीच. वानगीदाखल ‘अधुरी एक कहाणी’, ‘आभाळमाया,’ ‘या सुखांनो या’ ही यादी पुरेशी ठरते. आज तर ‘मल्हार’च्या तालावर घरातील बच्चेमंडळी ठेका धरताना आढळतात इतपत ‘टायटल सॉंग’ला मानसन्मान प्राप्त झाला, ही क्रांतीच नव्हे तर काय? खरंतर ‘टायटल सॉंग’ म्हणजे मराठीत ‘शीर्षक गीत’ परंतु आज मालिकावाल्यांनी ज्या स्तरावर ‘शीर्षक गीताला’ नेऊन ठेवले आहे ते सिनेमावाल्यांना कधीही जमलेले नाही, ही वस्तुस्थिती होय! ‘टायटल सॉंग’ सुरू असताना जुन्या पद्धतीनुसार कथानकातील काही प्रसंग दाखवण्याचा आजही शिरस्ता सुरूच आहे, हे विशेष!
कौतुकास्पद : आता ‘शीर्षक गीत’ हाच यूएसपी झाल्याने अधिकाधिक आकर्षक निर्मिती करणे ही मालिकावाल्यांची जबाबदारीच झाली. त्यांनीही हे चॅलेंज स्वीकारले आणि न भूतो न भविष्यती असे घडलेही. ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेच्या शीर्षकगीताने एक वेगळीच क्रांती घडवली. कर्णमधुर संगीतबद्ध, श्रेया घोषालच्या मधुर आवाजात… ‘मी पहावे, तू दिसावे… पारणे या मनाचे फिटेना…’ हे गीत रोज घरोघरी ऐकू यायला लागलं… आणि कधीही मालिका न बघणारेसुद्धा आवर्जून टीव्हीसमोर उभे रहायला लागले. कारण हे गाणे जितके श्रवणीय तेवढेच प्रेक्षणीयही बनले होते. या गाण्याने अनेकांची मने जिंकली व लोकप्रिय ठरले. या मालिकेच्या निमित्ताने प्रथमच कथेशी निगडित ’सँड आर्ट’ दाखवण्यात आली आहे. अर्थात यापूर्वी ‘नक्षत्राचे देणे’ या कार्यक्रमादरम्यान संगीत आणि ‘सँड आर्ट’ याचं फ्युजन बघायला मिळालं होतं, नाही असं नाही. परंतु ‘खुलता कळी खुलेना’ या मालिकेचे निर्माते संतोष कणेकर व प्रोमोहेड अमोल श्रोत्री यांनी ‘सँड आर्ट’ कलाकार रूपेश नेवगी यांच्या मदतीने ‘शीर्षक गीत + सँड आर्ट’ ही एक नवीनच संकल्पना प्रत्यक्षात मांडली. हे गीत सुरू असताना या मालिकेच्या कथानकातील एकही प्रसंग दाखवत नाहीत. परंतु ‘सँड आर्ट’च्या माध्यमाने या मालिकेची कथासंहिता व या गीतातील शब्दांना अनुसरून लाईव्ह चित्रे रेखाटण्यात आली आहेत. त्यासाठी संहितेनुरूप ‘दोन ध्रुवावर दोघे आपण’ सारख्या दोन व्यक्ती, त्यांच्यातील अव्यक्त प्रेम, दुरावा असं सारं काही भावभावनांसाहित दाखवण्यासाठी फुलपाखरू, पाऊलवाट, गुलाब व डोळे या माध्यमांचा वापर केला गेला आहे. थोडक्यात काय तर ‘टायटल म्युझिक ते शीर्षकगीत’ या प्रवासात ‘खुलता कळी खुलेना’च्या निमित्ताने मालिकावाल्यांनी कालपर्यंत कर्णमधुर असणारं शीर्षकगीत आज नेत्रसुखदही बनवून ‘एक यशस्वी व मानाची मुद्रा’ उठवली, हे निश्‍चितच दखलपात्र, प्रशंसनीय व काबिले तारीफ ठरते!
– एनसी देशपांडे / ९४०३४९९६५४