प्रतिमा

0
549

भद्रावतीतून देऊरवाड्याकडे जाणार्‍या मार्गावर अनेक टेकड्या. यापैकी एक भवानी टेकडी. वर भवानी मंदिर. मंदिरापर्यंत रस्ता. पण टेकडीला वळसा घालून जाणार्‍या या रस्त्याआधी टेकडीला लागून असलेला तलाव दिसतो. तलाव आणि टेकडीच्या मधून जाणारी पायवाट. टेकडीवरचं मंदिर दूरवरून दिसतं. मंदिर, टेकडी आणि तलावाचं नातं अनेक शतकं ओलांडून इथवर आलेलं. तलावाच्या काठानं त्या पायवाटेनं गेल्यावर वरती मंदिर ज्या जागी आहे, त्या जागेजवळ खाली पायथ्याशी उभं राहिलं की जाणवतं या जागी पायर्‍या असाव्यात शेकडो वर्षांपूर्वी मंदिरापर्यंत जाणार्‍या. आज पायर्‍या नाहीत. टेकडी आणि मंदिर आहे. संपूर्ण टेकडीभर पसरून असलेलं झुडुपी जंगल. त्या जंगलात एक दगड मोठा विलक्षण आणि भाग्यवंत. तो दगड निवडलाय् काळानं स्वतःचं हस्ताक्षर मागे ठेवण्यासाठी.
ती अक्षरं काळाचीच. ती प्रतिमांच्या स्वरुपात असतील किंवा खुणांखुणांच्या स्वरुपात किंवा कदाचित मनातलं सांगण्यासाठी ज्या खुणा वापरल्या जातात एखाद्या लिपीतल्या तशी प्रत्यक्ष अक्षरंही असतील, पण अशा अक्षरातून सांगितला जाईल तो नेमका तपशील. शब्दांच्या पलीकडचं असं काहीतरी घेऊन सजलाय् तिथला एक दगड आणि त्या दगडावर काळानं प्रत्यक्ष आपली मोहर उमटवली आहे. त्या दगडावर कोरल्या आहेत पाच प्रतिमा.
हा दगड भेटतो मंदिर चढणीच्या वाटेवर जवळच. पण तो लक्षात यायला मात्र तिथल्या प्रत्येकच दगडाविषयी आदर वाटला पाहिजे. कारण हे सगळेच दगड, त्या प्रतिमा निर्माण होत असतानाच्या प्रसंगाचे साक्षीदार आहेत. त्या प्रतिमा निर्माण करणार्‍या कलावंतानं हे सारे दगड तपासले असतीलच त्या एका दगडाची निवड करताना. झुडुपांनी झाकलेला हा प्रस्तर आणि त्यावरचं कौतुक नुसतं जवळ गेलं तरी दिसतं. प्रस्तराची-दगडाची मूळ ठेवणच आडवी. तेवढ्या आकारात अतिशय सुंदर आणि लयदार प्रतिमा कोरलेल्या. दगडाची एकूण उंची अडीच ते तीन फूट. तेवढी उंची प्रतिमा कोरायला पुरेशी.
एकूण पाच प्रतिमा. पहिली ब्रह्मा, दुसरी विष्णू, तिसर्‍या प्रतिमेचे तपशील स्पष्ट नाहीत पण महेशाची असावी. चौथी नृसिंहाची आणि पाचवी पुन्हा संभ्रम निर्माण करणारी. नृसिंहाच्या अशा प्रतिमेला केवल नृसिंह असं संबोधन आहे. अशा प्रतिमेत नेहमीप्रमाणे हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह अंकित केलेला नसतो, फक्त नृसिंह असतो. डाव्या पायाची मांडी घालून, उजवा पाय टोंघळ्यातून वाकवून उभा ठेवलेला आणि उजवा हात त्यावर असा बसलेला नृसिंह. फक्त नृसिंह, एकटा नृसिंह म्हणून केवलनृसिंह. अशा प्रतिमा विदर्भात अनेक ठिकाणी दिसतात.
या दगडावरच्या या पाचही प्रतिमा फक्त प्रतिमा आहेत हे सांगायलाच समर्थ आहेत. पण नृसिंह प्रतिमेशिवाय इतर प्रतिमा मात्र ओळख विसरलेल्या. विष्णू प्रतिमा तपशीलावरून निश्‍चित करता येते. इतर प्रतिमा सुद्धा कलावंतानं कोरताना आत्मीयतेनं कोरल्या आहेत, एकही घाव चुकीचा नाही. पण या योग्य आणि बरोबर असणार्‍या घावांसोबतच दुसरेही घाव नंतर या प्रतिमांवर पडलेत ते म्हणजे शेकडो वर्षांच्या ऊन-वारा-पावसाचे. या घावांनी मात्र प्रतिमा पूर्णतः झिजवून टाकल्या अगदी ओळख विसरेपर्यंत.
एक दगड निवडायचा आणि त्यावर काही प्रतिमा कोरायच्या एवढंच हे प्रयोजन नाही, हे मात्र लगेच लक्षात येतं. या परिसरात या प्रतिमांची काहीतरी संगती असावी, हे मात्र नक्की. या प्रतिमा या परिसरात जे दडलं आहे त्याचाच एक अंश आहेत. हा अंश जर एवढा सुंदर देखणा तर पूर्ण जे ते किती विलक्षण असेल, ही भावना त्या सर्व दगडांकडे वेगळेपणानं पहायला शिकवते.
कायम जिंकल्याच्या आविर्भावात पुढेपुढेच जात असलेला वर्तमान भूतकाळाला पराभूत केल्याच्या गर्वात असतो सतत. असा एखादा प्रस्तर आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देतो, तेव्हा मात्र वर्तमानाला आपली गती खोटी आहे, हे लक्षात येतं. असा प्रस्तर वर्तमानावर जी मात करतो, त्यापुढे वर्तमान शरण येतो. त्याचा गर्व थोडा का होईना पण उतरला असतो. पण वर्तमानाला जायचं असतं तिकडे सिमेंटच्या जंगलात. नेटवर्क, कवरेज, मीडीया असं सगळं वाट पहात असतं वर्तमानाची. या आणि अशा अगणित प्रस्तरांपर्यंत मात्र कोणतंच नेटवर्क पोचत नाही.
नृसिंह आणि अंदाज करता येणार्‍या इतर प्रतिमाना सोबत एकमेकांचीच. आजुबाजूला जंगल असो, माथ्यावर मोकळं आकाश असो त्या प्रतिमांना पर्वा नाही कशाची. कारण त्या तशाच कोरल्या गेल्यात. त्या काळानं ज्या संकेतासाठी त्या प्रतिमा कोरल्या असतील तो संकेत त्या प्रतिमा जिवापाड जपत आहेत.
त्यांना छत द्यावं एवढी ताकद वर्तमानात नाही. गरजच नाही वर्तमानाची त्या प्रतिमांना. त्या प्रतिमा कायम आहेत, तो प्रस्तर कायम आहे. वर्तमानाला हरवून त्या प्रतिमा जिवंत आहेत, जगत आहेत.
संजीव देशपांडे
९०१११६५०७९