तिथे आणि इथे

0
505

इंजिनीअरिंगची पदवी घेतल्यावर तेजसला अमेरिकेतल्या बफेलो विद्यापीठात, उच्च शिक्षण घेण्यासाठी ऍडमिशन मिळाली, तेव्हा सारं घरदार ंआनंदलं होतं. साहजिकच होतं म्हणा. भारतातल्या प्रत्येक तरुणाचं स्वप्नं असतं, ‘परदेशात जाऊन उच्च शिक्षण घ्यायचं आणि तिथेच जॉब घेऊन सेटल व्हायचं. यथावकाश लग्नं, मुलंबाळं, पॉश अलिशान बंगला, लक्झुरिअस कार…’ बस्! त्यासाठी भरपूर आटापिटा करून, वेगवेगळे कोर्से करायचे, खास शिक्षण घ्यायचं, परीक्षा घ्यायच्या जेणे करू तिथल्या विद्यापीठात ऍडमिशन मिळेल.
परेशातलं खर्चिक शिक्षण :
खरं तर परदेशातलं खर्चिक शिक्षण… विद्यापीठातलं शिक्षण, अतिशय महागडं! भल्याभल्यांच्या नाकी नऊ आणणारं, पदवीसाठी लाखो रुपये तर उच्च पदवीसाठी करोडो रुपये मोजावे लागतात तिथे, त्यामुळेच सामान्य माणसाच्या खिशाला परवडणं अतिशय कठीण. कितीही झालं तरी, इतकी बचत करणं कोणालाच शक्य नसतं. मग बँकांकडून कर्ज घेणं भाग पडतं. बँकेच्या कर्जातून, फी भरली जाते… पण बँकेच्या कर्जाचे, व्याजाचे हप्ते फेडण्यासाठी परत पैसे कुठून आणायचे हाही एक यक्षप्रश्‍न.
अर्न ऍण्ड लर्न :
या सगळ्यातून मार्ग काढण्याचा एकच मार्ग, तिथल्या विद्यार्थ्यांनी अवलंबला, ‘अर्न ऍण्ड लर्न’ अर्थात ‘कमवा आणि शिका’ त्यासाठी हॉटेलमध्ये जाऊन, डिशेस धुण्याचं काम असो किंवा साफ सफाईच काम असो, कुठलंही काम करून पैसे मिळवणं आणि बँकेचे हप्ते देणं महत्त्वाचं वाटतं.
वास्तव :
खरं तर, परदेशात कुठलंही काम कमी दर्जाचे समजत नाहीत. एखाद्या कंपनीतल्या इंजिनीअरला, आयटी वाल्याला जेवढा पगार मिळतो, तेवढाच पगार बस ड्रायव्हरला किंवा कचर्‍याची गाडी फिरवणार्‍या कर्मचार्‍याला मिळतो. परदेशात ‘लेबर’ अतिशय महाग असल्याने, प्लंबर, इलेक्ट्रिशियन, कारपेन्टर, माळी, बर्फ काढणारा बर्फ, सफाई करणारा कर्मचारी, पाळणाघर चालवणारी महिला, घरी येऊन मुलांना सांभाळण्याचं काम करणारी ‘बेबी सीटर’, घरी येऊन संपूर्ण घराची, वॉशरूमम्सची सफाई, धुणं मशीनमध्ये टाकून मग ड्रायरमध्ये टाकून इस्त्री करणारी स्त्री लेबर, घराच्या सभोवतीच्या लॉनचा मेन्टेनन्स करणारे कर्मचारी, या सगळ्यांना, त्यांच्या कामाचा मुबलक मोबदला मिळतो. सर्वांच्या पगाराचं मोजमाप कामांच्या तासाप्रमाणे होतं. आठवड्याच्या शेवटी, कामाच्या तासांप्राणे पैसे मिळतात. प्रत्येक लेबरकडे, स्वत:चं वाहन अर्थात कार असतेच. त्यांचंही राहणीमान उच्च दर्जाचं असतं. समाजात त्यांना सन्मान, प्रतिष्ठा असते. कुठल्याही कामात स्त्री/पुुरुष असा भेदभाव केला जात नाही, प्रौढांना सुद्धा यथाशक्ती, यथामती काम मिळू शकतं. त्यामुळेच परदेशात जाऊन कोणीही बिनकामाचा, बिनपगाराचा राहू शकत नाही. अर्थात कामाची इच्छा आणि वेळ पाळण्याची शिस्त हवी.
तिथे आणि इथे :
ज्याप्रमाणे परदेशात गेलेले आपले विद्यार्थी शिक्षणासाठी, ‘अर्न ऍण्ड लर्न’चं सूत्र पाळतात, त्याप्रमाणे आपल्याकडेही विद्यार्थ्यांनी धोरण ठेवलं तर त्यांच्या पालकांच्या डोक्यावरचा आर्थिक भार कमी होईल, आणि विद्यार्थीदशेपासूनच अर्थार्जन करण्याची सवय त्यांना लागेल. पैशाचं, श्रमाचं, शिस्तीचं महत्त्व त्यांना कळेल. बेराजगारी काही प्रमाणात कमी होईल.
आपल्याकडे आय. टी. चे विद्यार्थी, विद्यार्थिनी कंपनीत कामाला लागतात, अर्थात शिक्षण पूर्ण झाल्यावर तेव्हा, त्यांच्यावर बँकेचं कर्ज, व्याज, हप्ते फेडण्याची जबाबदारी नसल्याने ते सर्व (काही अपवाद वगळता) वीक एण्ड्‌ना रेव्ह पार्टी, पब्जमध्ये जाऊन नशापान, मद्यपान करून बेधुंद वर्तन करतात. स्वत:चा पगार, वाटेल तसा उधळतात. यावर आळा बसणं भाग आहे. म्हणूनच विद्यार्थी दशेपासून मुलांवर शिस्तीचा बडगा ठेवणं, अर्थार्जन करण्याची सवय लावणं अत्यावश्यक आहे. कारण आजची तरुण पिढी, उद्याचे सुजाण नागरिक होणार आहे. राष्ट्राची प्रगती, विकास सार्‍या गोष्टी त्यांच्यावर अवलंबून आहे, हे विसरून चालणार नाही. ‘शेवटी चॅरिटी बिगेन ऍट होम’ खरं नं?
– प्रीती वडनेरकर/९८२३९९४७९२