आदर्श भारत

0
473

जगाच्या तुलनेत आपण भाग्यवान आहोत. कारण तरुणांचा, संस्कारांचा देश भारत अशी ओळख आपली आहे. ती जपण्याची खरी कसरत आहे. कारण सुरुवातीला तरुण म्हणजे नेमकं कोण हे आधी कळलं पाहिजे. केवळ शरीराने हट्टाकट्टा म्हणजे तरुण होत नाही. केवळ वयानेदेखील तरुण म्हणता येणार नाही. तर तरुण म्हणजे सदसद्विवेक बुद्धीने वागणारा होय. तारतम्याने वागणारा, उतावीळपणा नसणारा, सामंजस्यपणे वागणारा होय. जग उलथवून टाकण्याची भाषा करण्याची ताकद ही तरुणात आहे. परंतु ही शक्ती सत्कार्यात खर्ची घातली गेली पाहिजे. म्हणजे राष्ट्रनिर्माण कार्यात स्वतःला वाहून घेता आले पाहिजे.
आज स्वैराचार वृत्ती बळावली आहे. सर्वत्र स्वतःचाच विचार जो तो करतो आहे. आजचा तरुण स्वप्नरंजनात गुंतत चालला आहे. स्वप्न आणि वास्तव यात जमीन- आसमानचे अंतर आहे. वास्तव आणि कल्पना यातला फरक करणे यात तो चुकत आहे. प्रत्येकाला सुखासीन जगण्याची चटक लागली आहे. परंतु त्यासाठी कष्ट करण्याची तयारी करण्यात मात्र तो कमी पडतो आहे. शिक्षण घेतलेला तरुण हा नोकरी कशी मिळेल, याच गुंताळ्यात गुरफटत जात आहे. शिक्षणाचा उद्देश म्हणजे नोकरी मिळवणे एवढा संकुचित करून ठेवला आहे. आज शहरात शिकणारे तरुण सात-आठ हजारांची नोकरी कशी मिळेल, यासाठी खाजगी कंपनीत येरझारा मारताना दिसतात. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंगच्या नावाखाली चांगले दिसण्यावर भर देताना दिसतात. शेवटी चार पुरुषार्थ पूर्ण करण्याकरिता आपल्याला काम करावेच लागेल. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष पार पाडण्यास चार पायर्‍या पूर्ण चढाव्याच लागतात. पहिल्यांदा शिक्षण घेणे अपरिहार्य आहे. कारण समाजात क्रियाशील सभासद बनविण्याची ही पहिली पायरी होय. दुसरी पायरी घेतलेल्या ज्ञानाच्या बळावर अर्थार्जन करणे. ज्या बळावर संसाराचा गाडा हाकता आला पाहिजे. तिसरी पायरी काम म्हणजे समाज सदस्य वाढविण्याची प्रक्रिया होय. आपल्या मुलाबाळांचे संगोपन करणे व त्यांना त्यांच्या पायावर उभे राहण्यास मदत करणे आणि चवथी पायरी मोक्ष होय; म्हणजे आपल्या आयुष्याचा उत्तरार्ध सुखाने घालवावा. ही आपली संस्कृती खूप काही शिकवून जाते.
आज आपण पाहतो घराघरांत तणावाचे वातावरण आहे. कारणांचा शोध घेतल्यास एक कारण सारखेच ते म्हणजे पोरगा शिकला, पण कामधंदा काहीच करत नाही. याचे कारण आम्ही वास्तव जगापासून खूप दूर जात आहो. आमचा तरुण जगाची लाज बाळगून जगतो आहे. लोक काय म्हणतील? मी एवढा शिकलो मला हे काम करणे शोभेल काय? या विचारात तो आईवडिलांच्या भरवशावर परावलंबित्व पत्करताना दिसत आहे. जोपर्यंत मनातून दूषित भावना नष्ट होणार नाही तोपर्यंत अच्छे दिन येणार कसे? मी स्वतः परिस्थितीनुसार काम करून शिकलो. उच्च शिक्षण घेतलं व काम करत गेलो. कधी पानटपरी चालवून, कधी रंगरंगोटीचे काम करून, तर कधी दलालाच्या हाताखाली दीडशे रुपये हप्त्याने मापारी म्हणून काम केले आणि योगायोगाने घेतलेल्या शिक्षणाच्या बळावर शिक्षक म्हणून नोकरी लागली. सांगायचे तात्पर्य एवढेच की, काम करण्याची लाज बाळगणारा उपाशी राहिल्याशिवाय राहणार नाही. आपले ध्येय निश्‍चित करून आपण आपले नियोजन करावे. अन्यथा बेकार तरुणाची फौज निर्माण होईल. तरुणांनो, विचार करा. आपण आपले जीवन जर सुखी करू इच्छिता तर पहिले आपण घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग असा करा की, नाही नोकरी मिळाली तरी आपण आपले भविष्य घडवू शकलो पाहिजे.
आजच्या महागाईच्या काळात पैशाची चणचण प्रत्येकालाच आहे. कारण आपल्या अनावश्यक गरजा भरपूर वाढल्या आहेत. त्या गरजा पूर्ण करण्यातच आयुष्याची कसरत आणि ओढाताण सुरू आहे. त्यामुळे घराघरांत वादळ पोसले जात आहे. भविष्यात गरजा वाढत जाणारच आहे. आपल्या गरजा जोपर्यंत सीमित होणार नाही तोपर्यंत आपण सुखी होणार नाही. आणि हे सर्व तरुणांनी समजून घेण्याची गरज आहे. अंथरूण पाहून हातपाय पसरावे, अशी एक म्हण आपल्याकडे प्रचलित आहे. त्याचा मथितार्थ हाच की, आपली शक्ती, आपली कुवत आपण ओळखून नियोजन केले पाहिजे. एक सत्य हे आहे की, प्रत्येकाला नोकरी मिळणे शक्य नाही. तेव्हा विनाकारण वेळ आणि वय वाया न घालता व्यावसायिक दृष्टिकोन बाळगून आपले जीवन आपल्या मनाप्रमाणे निश्‍चितच फुलवू शकू. त्याची पायाभरणी अगोदरच केलेली बरी. नोकरदार न बनता इतरांना नोकरी, काम देणारे बना. आपल्या शिक्षणाचा त्यात कसा फायदा होईल हे बघा. ही मानसिकता तुम्हाला उद्योजक बनवणारी असेल.
ग्रामीण भागातला तरुण याबाबतीत पुढे आहे. तो शिकत असतानाच आपल्या कुटुंबाचे पालनपोषण करतो. तो कधी वडिलोपार्जित कामधंदा करतो. नाही तर दुसरीकडे काम करतो. शाळेला सुटी असली की, तो दोनशे रुपये सहज रोज कमावतो. म्हणजे तो आत्मनिर्भर बनतो आणि भविष्यात तो यशस्वी जीवन जगतो. याबाबतीत शहरी तरुण मागे पडलेला दिसत आहे. सरकारने व्यवसायावर भर दिला आहे. स्वावलंबी बनण्यावर भर दिला आहे. ती देशाची आजची गरज आहे. ही एक प्रकारे देशसेवाच म्हणता येईल. प्रत्येकाला आपले जीवन आपल्या मनासारखे उपभोगण्याचा अधिकार आहे. त्याकरिता जमीन तयार करणे गरजेचे आहे. आपल्या कल्पनेचा, आपल्या विचारांचा, आपल्या कार्याचा देशाला फायदा करून द्या. ही राष्ट्रभावना जागृत झाल्यास आपल्या देशातील गरिबी निश्‍चितच कमी होईल. दुसर्‍या महायुद्धात नेस्तनाबूत झालेला चिमुकला जपान प्रखर राष्ट्रभक्तीच्या बळावर विकसित राष्ट्र म्हणून वावरतो आहे आणि आपला महाकाय देश अजूनही संघर्ष करतो आहे. याला देशातील तरुण शक्ती जबाबदार आहे. तरुणांनी आपली ताकद ओळखली पाहिजे. आपल्या देशाची ताकद ओळखली पाहिजे. आपण आपल्या देशाला सक्षम कसे बनवू शकतो याचा विचार करावा.
या देशाचा इतिहास हा तरुणांनी घडवला हे विसरू नका. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, भगतसिंग, वि.दा. सावरकर, महाराणा रणजितसिंग यांनी राष्ट्र निर्माण केले आणि स्वातंत्र्यलढ्यात भारतीय तरुणांनी पुढाकार घेऊन देश स्वतंत्र केला. हे सर्व आजच्या पिढीसाठी प्रेरणास्रोत आहे.
बलसागर भारत होवो
विश्‍वात शोभूनी राहो!
असे वाटत असेल तर प्रत्येक क्षेत्रात काम करणार्‍या तरुणाने आपण करीत असलेलं काम हे राष्ट्राचे काम आहे या भावनेने केल्यास निश्‍चितच आपण यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. आपल्या कलागुणांचा, ज्ञानाचा उपयोग करून स्वहित आणि राष्ट्रहित जोपासल्यास आपण खरा आदर्श भारत घडवू शकतो.
– ओमप्रकाश ढोरे/९४२३४२७३९०