‘बॅड पॅच’ येतोही कधीकधी

0
801

एका मराठी गाण्याच्या या ओळी प्रश्‍न उपस्थित करतात की, आयुष्यात अगदी सारं सुरळीत, सुखाचे दिवस सुरू असताना, दु:ख आपला पाठलाग करीत आपल्याला का गाठते? सुखदु:खाच्या या चढ-उतारांचा आपण किती आणि कसा सामना करावा? पण, खरं पाहिलं तर आयुष्य नावच आहे चढ-उताराच्या या खेळाचं! हे चढ-उतार मनाला लावून घ्यायचे नसतात. ‘जीवनगाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे… ’ अशा धुंदीत आपण आपली एक एक पायरी गाठायला हवी. या चढ-उतारात कधीकधी चढ एवढा घातक असतो की आपण संपणार की काय, असं वाटू लागतं. पण, हिंमत ठेवली तर या वाईट दिवसांचा आपण सामना करून नव्या जोमाने सुरुवात करू शकतो. अनेकांच्या आयुष्यात ही वेळ येते, त्याला आपण ‘बॅड पॅच’ म्हणतो. ही वेळ येत राहते, निघून जाते. आपण हरायला नको फक्त!
आयुष्याच्या स्वप्नाकडे आपली वाटचाल अगदी योग्यपणे सुरू असते. सारंकाही आपल्या बाजूनं, आपल्याला पाहिजे तसे निकालही लागतात. पण, अचानक काय होतं कुणास ठाऊक? सारंकाही सुरळीत असताना करकचून सार्‍या गोष्टींना ‘ब्रेक’ लागतात आणि पाहता पाहता परिस्थिती इतकी वाईट होऊन जाते की, सारंकाही संपल्यात जमा होण्याची आपल्याला जाणीव होते.
‘बॅड पॅच’ म्हणतात ते यालाच! ही कठीण वेळ आता किती दिवस राहील, याचा आपल्याला अंदाज नसतो आणि जीव कासावीस होतो.
हे सार्‍यांच्याच बाबतीत केव्हातरी होतेच. विद्यार्थी असो, नोकरीतील, संसारातील, व्यावसायिक, कला, क्रीडा क्षेत्रातील कुणीही… त्याला कधी ना कधी या वाईट परिस्थितीला तोंड द्यावेच लागते. कधीकधी हा ‘बॅड पॅच’ इतका घातक असतो की, त्यात बरेच जण संपून जातात. पुन्हा आपल्या मूळ जागेवर येण्याकरिता त्यांचं धाडसच होत नाही. या बाबतीत आपण अनेक उदाहरणं पाहिली आहेत. एखादा चांगला खेळाडू ‘फॉर्म’मध्ये असताना काही सामने त्याला पाहिजे तसे खेळता येत नाहीत. त्यातून त्याला एवढं नैराश्य येतं की, त्यातून तो सावरू शकत नाही. परिणामी, त्याला टीममधून बाहेर पडावं लागतं. कला क्षेत्रातीलही बरीच उदाहरणं आपण पाहतो. एखादा कलाकार, सिनेनिर्माता नावारूपाला आला असता, काहीतरी कारण घडतं आणि तो मग पाहिजे तसे ‘रिझल्ट’ देऊ शकत नाही. कधीकधी चांगले अभ्यासू विद्यार्थी एकाएकी मागे पडतात आणि काहीतर आत्महत्येसारखा मार्गही पत्करतात. पण, हे योग्य नाही.
आयुष्याची वाट ही चढ-उताराची असते. ती एकसारखी कधीच नसते. ही बाब जर आपण लक्षात घेतली, तर या चढ-उताराचे आपल्यावर वाईट परिणाम होणार नाहीत. पण, ही बाब आपण कधीच लक्षात घेत नाही. आपली एक वेळ होती आणि ती आता निघून गेली आहे, असं मग आपल्याला वाटू लागतं. गेले ते दिवस, राहिल्या फक्त आठवणी… असे आपण म्हणतो. पण, हे कितपत योग्य आहे? आपली वेळ ही कधीही गेलेली नसते. प्रत्येक वेळी आपण नव्या जोमानं सुरुवात करू शकतो. त्यासाठी नेहमी मनाची ताकद आपल्या जवळ असायला हवी. चढ-उतारांचा सामना करण्यासाठी आपण सदैव तयार असायला हवे. कधीतरी आपण या निसर्गाकडे निरखून पाहिलं तर आपल्या लक्षात येईल ही गोष्ट. आपण रोजचा दिवस पाहतो आणि तो नेहमी सारखा राहत नाही. कधी वातावरण छान राहतं, आल्हाददायक राहतं, तर कधी ढगाळलेलं, कधी बोचरी थंडी, तर कधी अंगाला चटके देणारं ऊन. जेव्हा निसर्गातच हे बदल होत राहतात, तर आपलं जीवन त्यातून कसं काय सुटेल, याचा आपण कधी विचार करीत नाही.
नेहमी सारं काही सुरळीतच सुरू राहायला हवं, असंही नाही. चढ-उताराचे दिवस आपल्या जीवनात यायला हवेतच. त्यामुळे आपल्याला आयुष्यातील कटु अनुभव येतील, जे आपल्याला आयुष्याचं वास्तव सांगतील. आयुष्यात ‘बॅड पॅच’ आल्यानंतर आपले सगेसोयरे, आपले मित्र कसे आपल्यापासून पळून जातात, आपल्याला कशी चाट देतात, याचे आपल्याला अनुभव येतील; तसेच इतक्या चेहर्‍यांच्या गर्दीत आपले खरे जिवलग कोण आहेत, त्यांचं आपल्यावर किती प्रेम आहे, हे आपल्याला दिसून पडेल. खरे कोण आणि खोटे कोण, याची आपल्याला जाणीव होईल. ‘तेरा साथ हैं तो, मुझे क्या कमी हैं… ’ कधीतरी मित्रासाठी, मैत्रिणीसाठी आपण हे गीत गायलं होतं ना, आता आपल्यावर कठीण परिस्थिती आल्यावर मागच्या दारातून त्यांनी पळ काढला की आपल्या सोबत आहेत, हा अनुभव आपल्याला हा ‘बॅड पॅच’ देईल. म्हणून ‘बॅड पॅच’ला घाबरून जाऊ नये. आयुष्याची लढाई आपली आपल्यालाच लढायची आहे आणि तीही स्वत:च्या भरवशावर, हे मनाशी पक्कं ठरवून घेतलं, कुणाच्या मदतीची अपेक्षा जर आपण ठेवली नाही, तर ‘बॅड पॅच’चं आपण नक्कीच स्वागत करीत राहू- नेहमीच…
‘मुंह की बात सुने हर कोई, दिल के दर्द को जाने कौन?
आवाजो कें बाजारो में खामोशी पहचाने कौन…?’ आपल्या अवतीभवतीचे जवळपास सारेच चेहरे असे आहेत की फक्त त्यांचंचं पुराण ऐकवतात आणि त्यांची हीच इच्छा असते की, आपण त्यांचंच ऐकत राहायला हवं. आपण आपल्या भावना, दु:ख मनाशी ठेवतो, त्या ऐकायला कुणाजवळ वेळ नाही. हरकत नाही. आपण आपली कहाणी आपल्यालाच ऐकवावी. मनाशी ठाम निर्णय घ्यावा. चढ-उतारांचं स्वागत करून, फिनिक्स पक्ष्याप्रमाणे आकाशाला गवसणी घालण्याचं स्वप्न, हताश न होता सदा उराशी बाळगावं. शर्थीचे प्रयत्न करावे, यश आपलंच आहे! जेव्हा केव्हाही आपण यशस्वी होतो, लोकांच्या स्तुतिसुमनांत हरवून जाऊ नये. कधीतरी आपण अपयशी झालो, तर हेच चेहरे मग आपल्याला डिचवल्याशिवाय राहत नाही. म्हणून अपयशानं खचून जाऊ नये, त्याचं स्वागत करावं, त्याच्यापासून काहीतरी शिकायला मिळतं. यशानं हरवून जाऊ नये. मग हा ‘बॅड पॅच’- वाईट परिस्थिती आपली सगीसोयरी होईल. आपण अजिंक्य आहोत…
कधीतरी कुणाचा हात हातात येणं, हातातून सुटणं… कधीतरी कुणी भेटणं आणि त्याचं निघून जाणं.. यश येणं आणि नंतर अपयश, हे सारं याचसाठी की, हातातून हात सुटतो तो पुन्हा हाती येण्याकरिता, कुणाचं निघून जाणं ते पुन्हा भेटण्यासाठी… अपयश आलं ते पुन्हा यश येण्याकरिता, हे समजून घेतले पाहिजे.
– दीपक वानखेडे /९७६६४८६५४२