कत्तलीसाठी जाणार्‍या गोवंशासह चार आरोपी ताब्यात

0
87

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २९ मार्च
शिरपूरजवळील चारगाव चौकी येथे ट्रकमधून कत्तलीसाठी जाणारी २६ जनावरे ताब्यात घेण्यात आलीत. या २६ जनावरांपैकी १ बैल मृतावस्थेत आढळून आला. ही कारवाई शिरपूर पोलिस आणि उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्या पथकाने मंगळवार, २८ मार्च रोजी मध्यरात्रीनंतर केली.
उपविभागीय पोलिस अधिकारी राहुल मदने यांना घुग्गुसवरून चारगाव फाटा शिरपूरमार्गे काही ट्रक आदिलाबाद येथे अवैधरित्या कत्तलीसाठी गोवंश नेत असल्याची माहिती मिळाली होती. त्यांनी शिरपूर पोलिस ठाण्यांतर्गत येत असलेल्या चारगाव चौकी येथे सापळा रचला. संशयित ट्रकांना थांबविण्याचा इशारा केला असता तो भरधाव निघून गेला. त्यापैकी ट्रक क्रमांक एमएच ४० वाय ४७३४ चा पाठलाग करून वेळावे फाटा येथे त्याला अडवण्यात आले.
या ट्रकमध्ये २६ जनावरे दोरीने निर्दयतेने बांधून असल्याचे दिसून आले. या संदर्भात ट्रकचालकास विचारपूस केली असता त्याने ही जनावरे आदिलाबाद येथे कत्तलीसाठी नेत असल्याचे सांगितले. या प्रकरणी पोलिसांनी फिरोज रमजानखान, अख्तर कुरेशी, रतिराम बकाराम राखडे, जुबेर सुभान शेख सर्व राहणार टेकानाका, नागपूर यांना ताब्यात घेण्यात आले.
आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली. ताब्यात घेतलेले गोवंश रासा येथील श्री गुरू गणेश गोशाळेच्या ताब्यात देण्यात आले आहेत.