कंठेरी आर्लीचे यवतमाळात दर्शन

0
90

तभा वृत्तसेवा
यवतमाळ, २९ मार्च
कंठेरी आर्ली (कॉलर्ड प्रॅटिनकोल) हा पक्षी मुख्यत: युरोप, दक्षिण-पश्‍चिम आशिया आणि आफ्रिका या देशांमध्ये आढळतो. वर्गीकरणाच्या असाधारण सूचित येणार्‍या या पक्ष्याचा समावेश आफ्रिकन-युरेशियन स्थलांतरित पाणवठ्यांवरील पक्ष्यंसाठी कार्य करणार्‍या संस्थेच्या संवर्धन यादीतसुद्धा करण्यात आला आहे. दैनंदिन पक्षी निरीक्षण करीत असताना बोरगाव धरणावर सकाळच्या सुमारास प्रा. डॉ. प्रवीण जोशी व डॉ. दीपक दाभेरे यांनी या पक्ष्याची नोंद घेतली व छायाचित्र काढले.
त्यांच्या निरीक्षणादरम्यान या पक्ष्याचे एकच जोडपे आढळले. कंठेरी आर्ली हा पाणवठ्याच्या आसपास आढळणारा २४ ते २८ सेंटीमीटर लांब व ६० ते ७० सेंटीमिटर पंखाचा फैलाव असणारा पक्षी मुख्यत: हा हवेतच आपले भक्ष्य, ज्यामध्ये कीटकांचा समावेश आहे, पकडतो. क्वचितच तो जमिनीवर आपले भक्ष्य पकडतो.
प्रा. डॉ. जोशी म्हणाले, जिल्ह्यात याची नोंद बर्‍याच वर्षांपूर्वी पांढरकवडा नजीकच्या पाणवठ्यावर झाली होती. परंतु, यवतमाळच्या सभोवताली असणार्‍या पाणवठ्यावर ही नवीनच नोंद आहे. त्यामुळे यवतमाळच्या सभोवतालची जलाशये स्थलांतरित पक्ष्यांच्या काहीकाळ का होईना, विसावण्याचे ठिकाण आहे हे महत्वाचे आहे.
डॉ. दाभेरे यांनी, परतीच्या स्थलांतरादरम्यान अशा प्रकारच्या नोंदी होणे महत्त्वाचे असते. त्यामुळे पक्षीनिरीक्षण व अभ्यास यात त्याची मदत होते, असे सांगितले.