अयोध्येतच राम मंदिर का व्हावे?

0
123

प्रासंगिक
नुकताच अयोध्येच्या राममंदिर निर्मिती प्रकरणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दोन्ही पक्षांनी परस्परांशी सामंजस्याच्या भूमिकेतून तडजोड करावी आणि निर्णय घ्यावा, असा महत्त्वपूर्ण सल्ला दिला आहे. त्यानंतर लगेच घडलेल्या प्रवासात असताना जवळच बसलेल्या सहप्रवाशाने बहुचर्चित असलेल्या त्या सुप्रीम कोर्टाच्या सल्ल्याच्या अनुरोधाने माझ्याशी बोलायला सुरुवात केली. विचारांच्या दृष्टीने तो श्रीरामप्रभूंच्या शत्रुपक्षातील असावा असे मला त्याच्या बोलण्यावरून वाटले. भुवया उंचावत प्रश्‍नार्थक चेहर्‍यानं तो मला म्हणाला-
‘‘तुम्ही रामाला देव मानता का?’’
‘‘होऽऽ! मी केवळ तसं मानतच नाही. तर माझी त्याबाबत शंभर टक्के खात्री आहे.’’
‘‘पण मी नाही तसं मानत.’’ ‘‘नका मानू. तो तुमचा वैयक्तिक अधिकार आहे. ते तुमचे वैयक्तिक मत आहे. तसे सगळ्यांपेक्षा वेगळे मत तुम्ही बाळगू शकता. कारण तुम्ही हिंदू आहात. हिंदूंना तसं मुक्त मतस्वातंत्र्य आहे. मुस्लिमांबाबत मात्र तसं नसते. त्यांना त्यांचा देव मानावाच लागतो. निरीश्‍वरवादी मुस्लिम ही संकल्पना इस्लामला मान्य नाही.’’
‘‘कदाचित खरोखरीच ‘राम’ म्हणून कोणी झालाच असेल तर तो तुमच्या आमच्यासारखा माणूसच असणार. तो देव कसा काय असेल बुवा?’’ ‘‘म्हणजे तुम्ही रामाला निदान माणूस म्हणून तरी मानायला तयार आहात?’’ तो म्हणाला, ‘‘होऽऽ! ‘‘तुमच्या या दिलदारपणाबद्दल मी रामाच्या वतीने तुमचे आभार मानतो. पण हे लक्षात घ्या की, ज्या माणसाच्या प्रत्येक कृतीत देवत्वाची साक्ष प्रतिबिंबित होत असते. त्याला साधा माणूस म्हणून नाही म्हणता येणार. माणूसच म्हणायचं असेल तर त्याला देवमाणूसच म्हणायला हवं.’’
‘‘ते कसं काय बुवा?
‘‘सांगण्यासारखं पुष्कळ आहे, पण थोडक्यात सांगतो. विश्‍वामित्र ऋषीबरोबर राम, यज्ञसंरक्षणार्थ न कुरकुरता गेला. असुर म्हणजे राक्षसी वृत्तीची, प्रवृत्तीची माणसंच म्हणूया, अशी माणसं, विध्वंसाची कृत्यं करण्यात पराकोटीचा आनंद मानणारी असतात. आजच्या भाषेत अतिरेकी, आतंकवादी असंही म्हणता येईल. असे असुर, ऋषींनी यज्ञ आरंभला की यज्ञविध्वंसाचा विकृत आनंद मिळविण्याकरिता, यज्ञ विध्वंस करत होते. आपला प्राण धोक्यात घालून ऋषिमुनींचे रक्षण करण्याचा रामाचा हा सद्गुण देवदुर्लभच नाही का? राणी कैकयीच्या वचनात गुंतलेल्या राजा दशरथाने रामाला १४ वर्षे वनवासात जाण्याची आज्ञा दिली आणि पराकोटीची पितृभक्ती दाखवत रामाने निमूटपणे त्या आज्ञेचं पालन केलं; आणि पितृभक्तीचा परमोच्च आदर्श घालून दिला.
रावणाच्या कैदेत असलेली सीता निष्कलंक आहे, हे समाजाला पटावं म्हणून तिला अग्निपरीक्षेत तावून सुलाखून घेऊन मगचतिचा स्वीकार रामानं केला. रामानं प्रजाजनांना शिरोधार्य मानतच निर्णय घेतले. त्यादृष्टीनं विचार केला तर राम हा लोकशाही मानणारा आदर्श राजाच होता. म्हणूनच रामरक्षेत ‘लोकाभिरामम् श्रीरामं भूयो भूयो नमाम्यहंऽऽ|’ असं म्हटलं आहे. पराक्रमी, सत्यवचनी, प्रजाहितदक्ष, पितृभक्त, ज्येष्ठांविषयी आदरबुद्धी बाळगणार्‍या रामाला जर देव मानायचं नाही तर मानायचं तरी कोणाला? प्रजेचं पुत्रवत पालन करणारा राजा म्हणून रामानं नावलौकिक मिळवला. तेव्हापासून प्रजाहितदक्ष राजाच्या राज्याला रामराज्य म्हणून संबोधण्यात येऊ लागलं. कालोवा कारणं राजा व राजा कालकारणम्‌| इति ते संशद्योऽऽमाऽऽभुत राजा कालस्य कारणम् अशा कोटीचा श्रीराम हा आदर्श राजा होता. श्रीराम हा केवळ हिंदूंचाच आदर्श पुरुषोत्तम आहे, असं कृपया तुम्ही समजू नका. कबीरानं आणि अनेक मुस्लिम सुफी संतांनी रामाची महानता मान्य केली. आणि रामस्तुतिपर अनेक भावपूर्ण रचना लिहिल्या, त्या का उगाच? त्या सगळ्यांनी जर मुक्तंकठाने श्रीरामांची महत्ता मान्य केली, तर तुम्ही ती का मान्य करू नये? देश, धर्म, जात यांची बंधनं रामाला लावणं हा संकुचितपणा आहे. मनाचा कोतेपणा आहे. जर आपण विश्‍वसंकल्पना मानत असू तर या विश्‍वात कोणीतरी विश्‍ववंद्य असायलाच हवं आणि त्यादृष्टीनं ज्याच्या ठायी सगळ्या सद्गुणांचा समुच्चय झाला आहे, केंद्रित झाला आहे, याची साक्ष पदोपदी श्रीरामांविषयी पटते. तो श्रीराम विश्‍ववंद्य आहे, हे आपण मानायला नको का? अशा सगळ्या मानवजातीला ललामभूत असणार्‍या परमोच्च आदर्श श्रीरामप्रभूंचं भव्य दिव्य मंदिर उभारण्याकरिता केवळ हिंदूंनीच नव्हे, तर हिंदवेतरांनी देखील कटिबद्ध व्हायला हवं, अशी आज अयोध्येची संपूर्ण भारतीयांना अंत:करणपूर्वक साद आहे. आणि तेवढाच अत्युत्कट प्रतिसाद जात, धर्म, पंथ हे भेद बाजूला सारत देणं, हे प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तवव्य आहे.’’ तेवढ्यात आमचं मुक्कामाचं ठिकाण आलं. उतरता उतरता सहप्रवासी म्हणाला, ‘‘पटलं मला तुमचं म्हणणं. तुम्ही माझ्या डोळ्यात झणझणीत अंजन घातलं. बराय राम राम.’’
– भालचंद्र शं. देशपांडे
०७१२-२२४४८१९