‘टू हॅव ऑर टू बी’

0
114

कल्पवृक्ष
सध्या आपण श्रीराम नवरात्रोत्सव साजरा करीत आहोत. समाज जीवनाच्या जडण घडणीत अशा उत्सवांचा महत्त्वाचा वाटा असतो. राम हनुमानाशिवाय अपूर्ण आहे. हनुमानाशिवाय रामाचे मंदिर असूच शकत नाही. रामाशिवाय हनुमानाचे स्वतंत्र मंदिर असते. हनुमान समजल्याशिवाय रामापर्यंत जाता येत नाही. हनुमानाला आपण तेल, शेंदूर व माळ घालण्यापुरते मर्यादित केले.
वाल्मीकि व तुलसीदासांनी वर्णन केलेले चरित्र पाहिले तर एक ‘परिपूर्ण सामाजिक मानव’ म्हणूनच हनुमानाचे व्यक्तिमत्त्व आपल्या डोळ्यासमोर उभे राहाते. हनुमान पर्यावरणस्नेही व नैसर्गिक जीवनशैलीचा प्रतिनिधी आहे. माणूस म्हणजे शरीर, मन, बुद्धी व आत्मा. या चारही अंगांच्या परिपूर्ण विकासाचे हनुमान आदर्श उदाहरण आहे. माणूस म्हणून मिळालेल्या सर्व निसर्गदत्त क्षमतांचा सर्वोच्च विकास हनुमानाच्या चरित्रात पहावयास मिळतो. अतुलितबलधामम्, ज्ञानिनाम् अग्रगण्यम्, सकलगुणनिधानम् असे त्याचे वर्णन केले आहे. रामायणात ठिकठिकाणी त्याचे प्रत्यंतर येते. ऋष्यमूक पर्वतावर झालेल्या पहिल्याच भेटीत राम प्रभावित झाला. राम लक्ष्मणासोबत बोलताना हनुमानाची वाणी, उच्चार, स्वर, भाषा, व्याकरण, अध्ययन याचा गौरवाने उल्लेख करतात. ते म्हणतात, इतके सुंदर वक्तृत्व नग्न खड्ग हातात घेतलेल्या शत्रूच्याही हृदयाचे पाणी करील. वाईट दिवसातही सुग्रीवाची साथ न सोडणारा तो मित्र आहे. सीतेला शोधण्यात कालहरण होत आहे, म्हणून त्याने सुग्रीवाची कानउघाडणीही केली आहे. वालीला मारल्यानंतर तारेचे सांत्वन करण्याची नाजूक जबाबदारीही त्याच्यावर सोपवली होती. वालीपुत्र अंगदाने स्वतंत्र राज्य स्थापू नये म्हणून हनुमानानेच त्याला समजावून राज्याचे विभाजन टाळले. लंकेला जाताना मैनाक पर्वताचे प्रलोभन, सुरसेच्या संकटावर मात, सिंहिकेला ठार करून लंकेत प्रवेश, रूप बदलून लंकेत फिरणे, तुळशी वृंदावन असलेले घर लक्षात आल्यावर तेथे प्रवेश व बिभीषणासोबत संवाद, सीतेचा शोध, लंका दहन करून तेथील नागरिकांच्या मनोधैर्याचे खच्चीकरण, प्रत्यक्ष युद्ध, विजयानंतर भरताकडे जाण्याची कामगिरी, अशा अनेक घटनांचा अभ्यास केला तर हनुमानाच्या विभिन्न क्षमता, भूमिका थक्क करणार्‍या आहेत. रामायणातला तो पुरुषोत्तम आहे. विशेष म्हणजे द्वेष, मत्सर, लोभ या सारख्या सर्व नकारात्मक भावनांवर त्याने विजय मिळवला आहे. तरीही बालसुलभ निरागसता जपली आहे. रामकार्याशी स्वतःला जोडून आपले जीवन व गुणसंपदा अर्थपूर्ण केली आहे.
या पार्श्‍वभूमीवर आज आपण जेव्हा विकास संकल्पनेचा विचार करतो, त्या वेळी ‘माणूस’ म्हणून त्याचा काय विचार होतो, हाच प्रश्‍न पडतो. एरिक फ्रॉम हा सुप्रसिद्ध विचारवंत म्हणतो, आज ‘टू हॅव ऑर टू बी’ हाच खरा प्रश्‍न आहे. आजचा आपला विकास ‘टू हॅव’ ला महत्त्व देणारा आहे. माझ्याजवळ काय आहे, माझ्या मालकीच्या किती वस्तू आहेत, त्यांच्या उपभोगावरच माझे सुख अवलंबून आहे. त्यामुळे असंख्य वस्तू रोज नवे रूप घेऊन आपल्यावर आदळत असतात. माणूस कायम असंतुष्ट व असमाधानी कसा राहील, याचाच विचार मार्केटिंग व जाहिरात कंपन्या करत असतात. वस्तूंचा हव्यास निर्माण झाला तरच, खप वाढेल, उत्पादन वाढेल, आर्थिक विकास व वाढ होऊ शकेल. त्या करता प्रचंड ऊर्जा आणि संसाधनांचा बेसुमार वापर होतो. या व्यवस्थेमुळे माणसाच्या सुखाच्या कल्पनाच बदलत चालल्या, असे एरिक फ्रॉम म्हणतो. माणूस वेगवेगळ्या क्रयवस्तू गोळा करण्यातच आयुष्याची परिपूर्णता मानायला लागला. समाजही त्याच्या जवळ काय आहे, यावरून त्याची किंमत ठरवायला लागला. त्यामुळे कोणत्याही मार्गाने संपत्ती मिळविण्यात त्याला काहीच गैर वाटत नाही. यातून माणसावरही मालकी हक्क गाजवण्याची सवय लागली. सत्ता आणि संपत्ती यांना सर्वाधिक महत्त्व आले. शिक्षण आणि आरोग्य यांचाही हेतू आर्थिक विकास झाल्यामुळे अधिकच अनर्थ झाला. विसंगत व्यवस्था जन्माला आली.
‘टू बी’ म्हणजे, मी माणूस म्हणून काय आहे? माणूस म्हणून विकसित होण्यातला आनंद वस्तूंपासून मिळणार्‍या आनंदापेक्षा जास्त असतो. माझ्या जवळ काय आहे, या ऐवजी मी कसा आहे, असा प्रश्‍न विचारला तर सारे संदर्भच बदलून जातात. माणूस प्रेमळ, दयाळू, ज्ञानी, सहिष्णू, कुशल, त्यागी, संवेदनशील अशा अनेक गुणांनी युक्त असू शकतो. या दृष्टिकोनामुळे माणसाचे माणसाशी, निसर्गाशी नाते निर्माण होते. या नात्यांमधल्या आत्मिक आनंदाचा तो धनी होतो. हनुमान या ‘टू बी’ व्यवस्थेची प्रेरणा देतो. अशी व्यवस्था उभी करणे हेच खरे रामकार्य आहे.
– रवींद्र देशपांडे
८८८८८०३४११