आता लक्ष दिल्ली महापालिका निवडणुकीकडे

0
156

दिल्लीचे वार्तापत्र
मार्च महिना संपत आल्यामुळे राजधानी दिल्लीतील वातावरण तापू लागले आहे, त्यात आता भर पडली ती दिल्ली महापालिका निवडणुकांची. यामुळे दिल्लीतील राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे. दक्षिण दिल्ली, उत्तर दिल्ली आणि पूर्व दिल्ली अशा एकूण तीन महापालिका मिळून २७२ जागा असून २३ एप्रिलला मतदान होत आहे.
यासाठी २७ मार्चपासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. २०२० मध्ये होणार्‍या दिल्ली विधानसभा निवडणुकीची उपांत्य फेरी म्हणून या निवडणुकीकडे पाहिले जात आहे.
पंजाब वगळता गोवा, मणिपूर, उत्तराखंड आणि उत्तरप्रदेशमध्ये भाजपाने सरकार स्थापन केल्यानंतर तसेच महाराष्ट्रातील महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका जिंकल्यामुळे दिल्ली महापालिका निवडणुकांसाठी भाजपा गोटात मोठा उत्साह आहे. ‘सब जगह जिते है, अब दिल्ली की बारी है,’ असे फलक दिल्लीत ठिकठिकाणी लागले आहेत. दिल्लीतील तीनही महापालिकांत सध्या भाजपाची सत्ता असल्यामुळे या निवडणुका जिंकणे भाजपासाठी आवश्यक आहे. त्यामुळेच निवडणुका दिल्ली महापालिकेच्या असल्या तरी एखादी विधानसभा निवडणूक असल्यासारखी तयारी भाजपाने सुरू केली आहे. या निवडणुका जिंकण्यासाठी कोणतीही कसर न सोडण्याचा भाजपाचा निर्धार दिसून येतो आहे.
निवडणुकांच्या तोंडावर भाजपाने कोणत्याही विद्यमान नगरसेवकाला वा त्याच्या नातलगाला उमेदवारी न देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे. असा निर्णय घेऊन भाजपाने पहिल्याच झटक्यात सर्व राजकीय पक्षांना धोबीपछाड दिली आहे. विशेष म्हणजे असा निर्णय घेण्यामागे भाजपाचे दोन उद्देश असल्याचे मानले जातात. पहिला म्हणजे सत्तेत असतांना विद्यमान पदाधिकार्‍यांच्या कार्यपद्धतीमुळे दिल्ली महापालिकांवर जे काही आरोप झाले, त्यातून भाजपाची सुटका होईल. दुसरा म्हणजे भाजपाच्या अनेक नगरसेवकांवर निष्क्रियतेचे आणि अकार्यक्षमतेचे आरोप होते. त्यामुळे भाजपाने सर्वच विद्यमान नगरसेवकांना सरसकट उमेदवारी न देण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला.
या निर्णयामुळे विद्यमान नगरसेवकांमध्ये असंतोष निर्माण झाला असला, तरी या निर्णयाचे पक्षाच्या सर्वसामान्य कार्यकत्यार्र्नी मनापासून स्वागत केले. भाजपाच्या या निर्णयामुळे आपल्या वार्डात प्रामाणिकपणे काम करणार्‍या, जनतेचे प्रश्‍न सोडवण्यासाठी रात्रंदिवस झटणार्‍या चांगल्या नगरसेवकांवर अन्याय झाला ही वस्तुस्थिती असली, तरी यामुळे नवीन कार्यकर्त्यांना भाजपाची उमेदवारी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सरसकट उमेदवारी न देण्याच्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी या नगरसेवकांनी भाजपाच्या अनेक ज्येष्ठ नेत्यांच्या भेटी घेऊन केली आहे. पण त्याला यश मिळण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही.
दिल्ली महापालिका निवडणुका जिंकून भाजपाला २०१५ मध्ये दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीत झालेल्या आपल्या पराभवाचा बदला घ्यायचा आहे. त्यावेळी दिल्लीतील केजरीवाल लाटेत भाजपाचा दारुण पराभव झाला होता. भाजपाला ७० पैकी फक्त ३ जागा जिंकता आल्या होत्या. मधल्या सव्वादोन वर्षात यमुना नदीतून बरेच पाणी वाहून गेले. केजरीवाल सरकारकडून दिल्लीतील जनतेचा मोठा भ्रमनिरास झाला. केजरीवाल यांनी निवडणुकीच्या प्रचारात जेवढी आश्‍वासने दिली, त्यातील अनेक आश्‍वासनांची पूर्तता केली नाही, त्याचबरोबर दिल्लीतील जनतेने त्यांच्याकडून ज्या अपेक्षा केल्या, त्याची पूर्तता करण्यातही केजरीवाल पूर्णपणे अपयशी ठरले.
केजरीवाल मंत्रिमंडळातील मंत्र्यावर आणि आमदारांवर भ्रष्टाचारापासून वेगवेगळे आरोप झाले. त्यामुळे केजरीवाल यांची आधी जी प्रतिमा होती, ती आता राहिली नाही, ही वस्तुस्थिती आहे. दिल्लीत सत्ता असल्यामुळे केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीला महापालिका निवडणुका जिंकणे आवश्यक आहे. त्यामुळे केजरीवाल यांनीही आपली पूर्ण प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लावली आहे. नुकत्याच झालेल्या पंजाब आणि गोवा विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीला मोठ्या अपेक्षा होत्या. या निवडणुका जिंकल्या असत्या, तर दिल्ली महापालिका निवडणुकीत आपचा उत्साह वाढला असता, मात्र या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे केजरीवाल आणि आम आदमी पार्टी पराभूत मानसिकतेत गेली आहे. निवडणुका लढवण्याची औपचारिकता आता फक्त पूर्ण केली जात आहे. आपची सारी मदार सत्तेत आलो तर गृहकर(हाऊस टॅक्स) माफ करण्याच्या आपल्या निवडणूक जाहीरनाम्यातील घोषणेवर आहे. विधानसभा निवडणुकीत आपने दिल्लीत सत्तेवर आलो तर पाणी मोफत देण्याचे आणि वीजबिल निम्मे करण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र दिल्लीत गृहकर माफ करण्याचा अधिकार महापालिकांना नाही, तर संसदेला आहे, याकडे लक्ष वेधत भाजपा खा. मीनाक्षी लेखी यांनी या घोषणेतील हवा काढून घेतली आहे.
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर आपचे आमदार वेदप्रकाश सतीश यांनी आमदारकीचा राजीनामा देत भाजपात प्रवेश केल्यामुळे आपला जबर धक्का बसला आहे. आपचे २५ आमदार केजरीवाल यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचा दावाही वेदप्रकाश यांनी केला आहे. दरम्यान, संसदीय सचिवपदाच्या मुद्यावरून आपच्या २१ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे आप आणि केजरीवाल यांचे ग्रह सध्या चांगले नाही, ते कधीही फिरू शकतात, असे दिसते.
कॉँग्रेसही पूर्ण ताकदीने उतरली आहे. मात्र, पंजाब वगळता अन्य चार राज्यांत झालेल्या दारुण पराभवानंतर कॉंग्रेस अद्यापही सावरली असल्याचे दिसून येत नाही. प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष अजय माकन यांच्या नेतृत्वात कॉंग्रेस या निवडणुकीत उतरली आहे. मात्र, कॉंग्रेसला अद्याप आपले उमेदवारही निश्‍चित करता आले नाही. उमेदवारीसाठी दिल्ली प्रदेश महिला कॉंग्रेस आणि युवक कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना राहुल गांधी यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने करावी लागली. आपल्या कार्यकर्त्यांशी बोलायला, त्यांच्याशी चर्चा करायलाही राहुल गांधी आणि अन्य कॉंग्रेस नेत्यांना अद्याप वेळ नाही, यातच सारेकाही आले. कॉंग्रेसचे या निवडणुकीत काय भवितव्य राहाणार हे सांगायला कोणत्याच ज्योतिषाची गरज नाही.
दिल्ली महापालिका निवडणुकीवर भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह जातीने लक्ष ठेवून आहेत. भाजपाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे यांच्या नेतृत्वात एक समितीही गठित करण्यात आली आहे. अनेक केंद्रीय मंत्र्याकडे भाजपाने दिल्ली महापालिका निवडणुकीची जबाबदारी दिली आहे. कोणत्याही निवडणुकीची तयारी कशी करावी, निवडणुका कशा लढवाव्या, निवडणुकीचे सूक्ष्म व्यवस्थापन कसे करावे, याचे धडे सर्व राजकीय पक्षांनी अमित शाह यांच्याकडून घ्यायला पाहिजे. निवडणूक मग ती महापालिकेची असो, विधानसभेची असो की लोकसभेची ती पूर्ण तयारीने आणि पूर्ण ताकदीनेच लढवली पाहिजे, असे अमित शाह यांचे म्हणणे असते.
या निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपाने पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह, केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह, भूपृष्ठ परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्यासह उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान, हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांना भाजपाने आपले स्टार प्रचारक बनवले आहे. एकंदरीत दिल्ली महापालिका निवडणुका जिंकण्याच्या निर्धारात कोणतीही कसर न ठेवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. महापालिका निवडणुकीच्या आधी राजौरी गार्डन विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल लागणार आहे, त्यातून दिल्लीतील जनतेचा कल लक्षात येणार आहे.
– श्यामकांत जहागीरदार
९८८१७१७८१७