सिमेंटने भरलेला ट्रक दुकानात घुसला

0
81

अपघातात ३ जखमी, २ गंभीर
तभा वृत्तसेवा
पाटणबोरी, ३० मार्च
गुरुवार, ३० मार्च रोजी दुपारी ३.३० च्या सुमारास देवापूर, जि. आसिफाबाद (तेलंगणा) येथून आलेला सिमेंटने भरलेला एक ट्रक माल उतरवण्यासाठी मुख्य चौकात उतारावरून जात होता. याचवेळी त्या ट्रकचे ब्रेक निकामी झाल्यामुळे तो तेथील ऑटो व चार दुचाकींना चिरडतच थेट तीन दुकानांमध्ये घुसला.
या अपघातात भिसेवार भाजीपाला दुकान, बालाजी कृषी केंद्र व डॉ. नरेश चवरडोल यांचा दवाखाना अशा तीन दुकानांचा या ट्रकने पार चुराडाच करून टाकला. यावेळी कृषी केंद्रात बसलेल्या गौरू काताडे सुर्दापूर यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली, तर कलावती लचमय्या चुक्कलवार, कमळवेल्ली यांच्या चेहर्‍यावर गंभीर इजा झाली. या दोघीही अत्यवस्थ असून त्यांना पाटणबोरी प्राथमिक आरोग्य केंद्रातील प्राथमिक उपचारानंतर पांढरकवडा येथे हलविण्यात आले आहे.
ब्रेक निकामी झाल्याचे समजताच आईमंदिराजवळ चालकाने ट्रकमधून उडी मारून तेथून पोबारा केला.
या अपघातात लाखोंचे नुकसान झाले असून घटनास्थळी पांढरकवड्याचे ठाणेदार गुलाब वाघ यांनी भेट दिली. त्यांनी घटनेचा पंचनामा करून अधिक चौकशी सुरू केली.
या अपघातामुळे जड वाहतुकीस गावात बंदी घालण्याच्या मागणीने जोर पकडला आहे.