‘पाणी सोडा, अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या’

विदर्भ-मराठवाड्यातील गावकर्‍यांचे पैनगंगा नदीपात्रात उपोषण

0
62

अविनाश जोशी
ढाणकी, ३० मार्च
विदर्भ-मराठवाड्याच्या सीमेवरून पैनगंगा नदी वाहते. याच नदीवर इसापूर धरण आहे. परंतु, याचा लाभ मात्र इतर तालुक्यांनाच मिळतो. नदीकाठावरील हक्काच्या गावकर्‍यांची ‘धरण उषाला, कोरड घशाला’ अशी गत झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे पावसाळ्यात पुराचे थैमान तर उन्हाळ्यात पाणीटंचाईने हैराण, अशी स्थिती होणार्‍या नदीकाठवरील गावकर्‍यांनी पैनगंगा नदीच्या कोरड्या पात्रात कवठा या गावाजवळ बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे.
जोपर्यंत शेवटच्या टोकाला, सहस्रकुंडपर्यंत पाणी पोहोचत नाही, तोपर्यंत हे उपोषण मागे न घेण्याचा इशारा देऊन ‘पाणी सोडा अन्यथा इच्छामरणाची परवानगी द्या’ अशी मागणी या उपोषणकर्त्यांनी केली आहे.
गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यातच पैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्यामुळे नदीपात्रात धरणाचे पाणी सोडण्यात यावे, अशी मुख्य मागणी लोकांनी लावून धरली होती. त्यानंतर काही दिवसांपूर्वी प्रशासनाकडून पैनगंगा नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. परंतु, हे पाणी नदीकाठावरील अनेक गावांपर्यंत पोहोचलेच नाही.
उषाशी नदी असतानाही भांडेभर पाण्यासाठी हेलपाट्यांची वेळ नदीकाठच्या या नागरिकांवर आली आहे. नदीपात्रात सोडण्यात आलेले धरणाचे पाणी अर्ध्यातच मुरल्यामुळे नदीकाठावरील सहस्रकुंडपर्यंच्या असंख्य गावांना पाणीटंचाईच्या तीव्र झळा चटके देत आहेत. माणसांसह मुक्या जनावरांवरही पाण्यावाचून तडफडण्याची वेळ आली आहे.
अजून सुमारे तीन महिने उन्हाळा बाकी असल्याने तीव्र पाणीटंचाई पाहता नदीचे पात्र कोरडे असल्याने त्रस्त्र झालेल्या नदीकाठावरील सिरपल्ली, कवठा, एकंबा, शेलोडा, धानोरा, बोरगडी, वारंगटाकळी, सावळेश्‍वर, बिदरगाव, भोजनगर तांडा, रतन नाईकनगर, पिंपळगाव, मुरली इत्यादी नदीकाठावरील विदर्भ व मराठवाड्यातील गावकर्‍यांनी नदीपात्रातच उपोषणाला सुरुवात केली आहे.