तुका आकाशाएवढा

0
297

कल्पवृक्ष

संत तुकाराम महाराजांची कीर्ती शिवाजी महाराजांच्या कानी गेली. एक दिवस त्यांनी दोन कारकुनांना तुकोबांकडे पाठविले. राजांना आपल्या दर्शनाची व कीर्तन ऐकण्याची इच्छा असल्याचा निरोप दिला. तुकोबांनीही आस्थेने चौकशी केली. त्यानंतर कारकुनांनी शिवाजी राजांनी पाठविलेला नजराणा भेट दिला. उत्तम वस्त्रे, होन, अलंकार, दोन दिवट्या, एक देखणा घोडा, अशा भेटवस्तू होत्या. तुकोबांची आर्थिक स्थिती चांगली नव्हती. कीर्तनाकरिता ते पायी फिरत. त्यामुळे हा नजराणा त्यांच्याकरिता गरजेचा होता. तुकोबांनी तो नजराणा परत पाठवला. सार्‍या त्रिभुवनाचे वैभव आमचेच आहे. ‘मुंगी आणि राव | आम्हा सारखाच जीव |’ असे ते राजांना कळवतात. त्याही पुढे जाऊन आम्हाविषयी काही करणे असेल तर, हरिचे दास व्हावे, न्यायनीतीने वागावे, असे झाले तर आम्ही सुखी होऊ, असे म्हणतात.
सत्तेकडे विचारवंतांनी कसे पाहावे, याचे उदाहरण तुकोबांनी घालून दिले आहे. म्हणूनच ते म्हणू शकतात, ‘सत्य असत्याशी मन केले ग्वाही | मानियले नाही बहुमता |’ पद, प्रतिष्ठा आणि पैसा यांच्या पलीकडे जाऊन तत्त्वांवर प्रेम करणारी काही वेडी माणसे समाजात असली पाहिजेत. तरच ते सत्तेला तुकोबांसारखे काय करायचे, हे सांगू शकतात. तुकारामांवर भाषण देणारा एखादा सरकारी समितीवर जाण्यासाठी लाचारी करतो, तेव्हा खंत वाटते. चाणक्याचा वारसा सांगणारे मागच्या दारातून राजकीय नेत्याकडून पैसा घेताना दिसतात, अशा वेळी पुन्हा एकदा तुकोबांचीच आठवण होते. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले.’ शेवटी अशी वंदनीय पावलेच समाजाचे भले करतात.
सर्व धर्म परिषदेनंतर विवेकानंदांची अमेरिकेत भाषणे सुरू होती. त्या विचारधनाचे महत्त्व श्रोत्यांच्या लक्षात आले. त्याचे जतन झाले पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. न्यूयॉर्कला जे जे गुडविन नावाचा एक पत्रकार व लघुलेखक होता. लघुलेखनात तो खूप निष्णात होता. एका मिनिटाला २०० शब्द, असा त्याचा वेग होता. काही श्रोत्यांनी त्याला विवेकानंदांची भाषणे लिहिण्यासाठी नियुक्त केले. त्याने मोबदलाही भरपूर मागितला. त्याने जेमतेम एक आठवडा पैसे घेतले. नंतर तो विवेकानंदांचा भक्त झाला. अविवाहित राहिला व नोकरी सोडून विवेकानंदांची सावलीसारखी सोबत केली. त्यांचा प्रत्येक शब्द न शब्द त्याने टिपून ठेवला. रेकॉर्डिंग नसलेल्या काळातील विवेकानंदांची भाषणे आज जशी दिली, तशी उपलब्ध आहेत, याचे संपूर्ण श्रेय गुडविनला आहे. स्वामीजींसोबत तो भारतात आला. पण येथील हवामान त्याला मानवले नाही. येथेच त्याचे अकाली निधन झाले. त्याने लिखाणही केले आहे. भारतीय संस्कृतीची महान तत्त्वे आणि प्रत्यक्ष समाजाचे आचरण याविषयी त्याने खंत व्यक्त केली आहे. गुडविनच्या मृत्यूने विवेकानंद खूप भावनाविवश झाले होते. अमेरिकेत असलेल्या त्याच्या आईला पाठविलेल्या पत्रात स्वामीजी म्हणतात, ‘‘तुमच्या मुलाने मला अजरामर केले. माझे बोलणे वार्‍यावर विरून गेले असते. मागे काही उरले नसते. मला अक्षर अस्तित्व प्रदान करणार्‍या एका सुपुत्राची माता म्हणून मी तुम्हाला प्रणाम करतो.’’ विवेकानंदांचे विचार आपल्या संस्कृतीचा अक्षरठेवा आहे. त्यांचे साहित्य जगातील अनेक भाषांत भाषांतरित झाले आहे. गुडविन भेटला नसता तर? पद, पैसा व प्रसिद्धी यापलीकडे काही लोक जीवनाचा अर्थ शोधतात. त्या दृष्टीने जगण्याचा प्रयत्न करतात. खरे तर त्याचेच नाव आध्यात्मिकता आहे.
समाजकार्याविषयी रामकृष्ण फार सुंदर उदाहरण देत. एक श्रीमंत माणूस मंदिरात देवदर्शनाकरिता जातो. मंदिराच्या बाहेर याचकांची गर्दी असते. तो त्यांना दान देतो. त्याच्या नावाचा जयजयकार होतो. तो त्यातच इतका रमतो की मंदिरातील दर्शनाची वेळ संपून जाते. दर्शन राहूनच जाते. अनेकदा कार्याचा प्राण, त्यामागील आध्यात्मिकता, त्याचे स्पिरीट हरवून जाते. आणि बाह्य गोष्टी, पद, प्रसिद्धी, जयजयकार यांनाच महत्त्व येते. एकदा देवदर्शन झाले की बाहेरच्या समाजकार्यातून मोह निर्माण होत नाही. आत एक व बाहेर एक, असे ढोंग करावे लागत नाही.
अशी माणसेच संस्कृतीची निर्माती असतात आणि तीच खरी महान असतात. बाकी कूपमंडूक वृत्ती ठेवून बेडकासारखे डबक्यावरच राज्य करण्यात धन्यता मानतात. थोडेतरी तुकोबाचे वेडेपण आपल्याला मिळो, म्हणजे आपल्यालाही गाता येईल,
अणुरणीया थोकडा | तुका आकाशाएवढा ॥
रवींद्र देशपांडे,८८८८८०३४११