वाघाच्या हल्ल्यात महिला ठार

0
204

तभा वृत्तसेवा
मूल, ३० मार्च
चिचपल्ली वनक्षेत्रात मोहफूल वेचण्यासाठी पतीसह गेलेल्या महिलेवर वाघाने हल्ला करून ठार केले. ही घटना गुरुवार, ३० मार्च रोजी सकाळी ७.३० च्या सुमारास घडली. ताराबाई बाबुराव तावाडे (रा. दाबगाव मक्ता, ता. मूल) असे मृतक महिलेचे नाव आहे.
गावाजवळील चिचपल्ली वनक्षेत्रातील वनविकास महामंडळाच्या कक्ष क्रमांक ५१६ मधील जंगलात तावाडे दाम्पत्य मोहफूल गोळा करीत असताना झुडपात दबा धरून बसलेल्या वाघाने ताराबाईवर अचानक हल्ला चढविला. वाघाला बघून घाबरलेल्या पतीने गावाकडे धाव घेऊन याबाबतची माहिती गावकर्‍यांना दिला. गावकरी त्वरित घटनास्थळी पोहचले. मात्र, तोवर महिलेला ठार करून वाघ पसार झाला होता.
घटनेची माहिती कळताच चिचपल्ली वनपरिक्षेत्राच्या अधिकार्‍यांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला व मृतकाच्या कुटुंबाला वनविभागातर्फे तत्काळ आर्थिक मदत
दिली.
यावेळी जिल्हा परिषद सदस्य पृथ्वीराज अवताडे, तुळशिदास कुंभारे घटनास्थळी उपस्थित होते. महिलेचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मूल येथे पाठविण्यात आला.