बंदीवानांचे श्रमसार्थक; ५५ लाखांची खरीकमाई

0
75

एमगिरीच्या मार्गदर्शनात
१८ कैद्यांची एलईडी बल्ब निर्मितीची कमाल
प्रफुल्ल व्यास

वर्धा, ३१ मार्च
बेरोजगारीवर मोठमोठाली चर्चासत्रे होतात… राजकारणातील विरोधकांनाही वेळप्रसंगी बेरोजगारांचा पुळका येतो… सरकारी नोकरीसह खाजगी नोकर्‍यांचीही आता वानवा होऊ लागली असताना स्वयंरोजगाराशिवाय पर्याय नसल्याने येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेने गेल्या पाच वर्षात कात टाकली असून, जवळपास ७ हजार बेरोजगारांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. एवढेच नव्हे तर अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहातील १८ कैद्यांना दिलेल्या प्रशिक्षणातून त्यांनी राज्यात ५५ लाख रुपयांचे एलईडी लाईट तयार करून विकले.
२००८ मध्ये स्थापन झालेल्या महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेला सुरुवातीपासूनच मरगळ आलेली होती. आजपर्यंत तीन संचालकांनी केवळ कागदी घोडे नाचवले. केंद्र सरकारच्या नियंत्रणात येत असलेल्या या संस्थेने २०१२ पर्यंत फारसा विकास केला नव्हता. परंतु, त्यानंतर महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेची (एमगिरी) जबाबदारी सांभाळणारे पहिले वैदर्भीय डॉ. प्रफुल्ल काळे यांनी या संस्थेला उर्जीतावस्था आणून दिली.
विदर्भातील बेरोजगारांना रोजगाराची संधी मिळावी यासाठी त्यांनी पुरेपूर प्रयत्न केले. भंगारावस्थेकडे जात असलेल्या एवढ्या मोठ्या संस्थेची वर्धेतीलही ओळख मिटत चालली असताना डॉ. काळे यांनी बाहेरच्या राज्यातून आलेल्या वैज्ञानिकांना वैदर्भीय भाषेत दम देऊन त्यांच्याकडून वेगवेगळे प्रयोग करून घेतले. परिणामी, ४० पेेटेण्ट या संस्थेने तयार केले असल्याची माहिती डॉ. काळे यांनी दिली. या संस्थेमार्फत बेरोजरांना प्रशिक्षण देऊन त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येते. वर्धेतील एमगिरीमध्ये काम करणार्‍या तज्ज्ञांनी अमरावती येथील मध्यवर्ती कारागृहातील १८ कैद्यांना एलईडी लाईट तयार करण्याचे प्रशिक्षण तेथे जाऊन दिले. त्या कैद्यांनी तब्बल ५५ लाख रुपयांचे लाईट तयार करून राज्यातील सर्व कारागृहांना विकले. यातून जेल प्रशासनाने कैद्यांना रोजी वाढवून दिली असून, राज्यातील सर्व जेलमधील ४० ते ५० टक्के विजेची बचत झाल्याचे त्यांनी सांगितले.
बाजारपेठेपेक्षा अतिशय माफक दरात एलईडी लाईट विकले. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर कैद्यांनी आपल्या मनोगतात शिक्षा भोगून बाहेर पडल्यानंतर पुन्हा वाम मार्गाकडे न वळता येथे मिळालेल्या प्रशिक्षणाचा लाभ घेत पुढे हाच व्यवसाय करू, असे सांगितले. त्यामुळे वर्धेतील एमगिरीने या गुन्हेगारांना पुन्हा त्या मार्गावर जाण्यापासून परावृत्त केले, हे उल्लेखनिय!
खादी व ग्राम विकास आयोगामार्फत एमगिरी १८ प्रोजेक्ट तयार करीत आहे. त्यातून शेतकरी तसेच सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
डॉ. काळे यांच्यापूर्वी डॉ. करुणाकरन यांची कारकीर्द चांगलीच वादग्रस्त ठरली होती. डॉ. काळे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर ही संस्था खर्‍या अर्थाने लोकाभिमुख झाली आहे. स्वत:चा रोजगार करण्याची मनीषा ठेवून या संस्थेत आलेला बेरोजगार युवक रोजगाराच्या शिक्षणानंतर बाहेर पडून पैसा कमवायला लागल्याची हजारो उदाहरणे असल्याने या संस्थेला कल्पवृक्ष म्हटल्यास चुकीचे ठरू नये!
विरजणाशिवाय सहदाने आरोग्यवर्धक दही
साधारणत: दही तयार करण्यासाठी दुधात विरजण घातले जाते. परंतु, येथील महात्मा गांधी ग्रामीण औद्योगिक संस्थेने (एमगिरी) तयार केलेल्या एका प्रयोगात आता विरजणाशिवाय सहदाच्या एका थेंंबाने दही तयार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्याला ‘प्रोबायोटिक हनी’ असे नाव देण्यात आले आहे. या प्रक्रियेत सहदामध्ये मायक्रो ऑर्गेनिझम टाकून त्यात लॅक्टो बॅसिलस बॅक्टेरिया तयार होतो आणि गोड दही तयार होत असल्याची माहिती डॉ. काळे यांनी दिली. या दह्यामुळे पोटाचे विकारही कमी होत असल्याचा प्रयोग सावंगी (मेघे) येथील महात्मा गांधी आयुर्वेदिक वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम भुतडा यांच्या मार्गदर्शनात करण्यात आला असून, त्याचा फायदाही काही रुग्णांना झाल्याचे डॉ. काळे यांनी सांगितले.