‘कॉन्व्हेंट’ संस्कृतीत शासकीय शाळांवर गंडांतर!

0
102

• जिल्ह्यातील २४३ शाळा बंद होणार
• विद्यार्थी संख्येचा अभाव
राहुल जोशी

गोंदिया, ३१ मार्च 
अद्ययावत इमारत, प्रशिक्षित शिक्षकवर्ग व शासकीय निकषानुसार शिक्षण प्रणाली असतानाही आजघडीला सामान्य पालक शासकीय शाळांकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र आहे. जिल्ह्यातील १,०६९ शासकीय शाळांपैकी तब्बल २४३ शाळा पुढील २०१७-१८ शैक्षणिक सत्रात बंद होण्याचा मार्गावर आहेत. याचे मुख्य कारण विद्यार्थ्यांची रोडवणारी संख्या असली तरी, ही बाब शासकीय शाळांतील शिक्षण प्रणालीवर प्रश्‍नचिन्ह निर्माण करणारी ठरत आहे.
गोंदिया जिल्हा हा आदिवासीबहुल नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील जिल्हा आहे. इतकेच नव्हे तर मानव विकासाच्या कार्यक्रमात जिल्ह्याचा समावेश आहे. अशा जिल्ह्यातील नागरिकांना शिक्षण व आरोग्य या मूलभूत सेवा प्रशासनाच्या माध्यमातून देण्याची जबाबदारी शासनाची आहे. आरोग्य सेवांच्या दर्जांमध्ये सुधारणा होत असली तरी, शिक्षण क्षेत्र मात्र सातत्याने मागे पडत असल्याचे दिसत आहे.
एकीकडे गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्यासाठी शासनाने शिक्षणाचा कायदा तयार केला. शाळांचे संगणकीकरण, ‘गावची शाळा, आमची शाळा’, ‘गुढीपाडवा प्रवेश वाढवा’, यासारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना जिल्हा परिषद शाळांकडे आकर्षिक करण्याचे प्रयत्न प्रशासनाच्या माध्यमातून करण्यात येत असले तरी, सामान्य कुटुंबातील पालकांचा शैक्षणिक गुणवत्तेचा विश्‍वास संपादन करण्यात प्रशासन कुठेतरी कमी पडत असल्याचे दिसत असल्यानेच पालकांचा कल विनाअनुदानित असल्या तरी खाजगी शाळांकडे आहे. परिणामी शासकीय शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या रोडावत असल्याचे चित्र जिल्ह्यात पाहायला मिळत आहे.
आजघडीला जिल्ह्यात १,०६९ शाळा आहेत. परंतु यापैकी तब्बल २४३ शाळा पुढील शैक्षणिक सत्रात बंद होण्याच्या मार्गावर असून, त्यात अर्जुनी-मोर तालुक्यातील २५, आमगाव ३१, देवरी ५०, गोंदिया २९, गोरेगाव २७, सालेकसा ३९, सडक अर्जुनी २३ तर तिरोडा तालुक्यातील १९ शाळांचा समावेश आहे.
या सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या शून्य ते वीस दरम्यान असल्याने येथील विद्यार्थ्यांचे समायोजन दुसर्‍या शाळांमध्ये करण्यात येणार आहे. त्यामुळे अद्ययावत इमारत व तज्ज्ञ शिक्षक असतानाही या शाळांवर बंदचे गंडांतर येणार आहे.
सामाजिकीकरणासाठी समायोजन आवश्यक : नरड
या अनुषंगाने तभा प्रतिनिधीने शिक्षणाधिकारी उल्हास नरड यांना विचारणा केली असता एखाद्या शाळेत एक विद्यार्थी असला तरी, त्या ठिकाणी दोन शिक्षकांची नियुक्ती करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. परंतु अत्यल्प विद्यार्थी संख्या असलेल्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांमध्ये सामाजिकीरणाची भावना रूजत नसल्याने त्यांचे समायोजन दुसर्‍या शाळेत करणे आवश्यक असल्याते ते पुढे म्हणाले.