सत्यजित गौरव पुरस्कार गजानन निमदेव यांना जाहीर

0
109

मेहकर, ३१ मार्च 
महाराष्ट्र राज्य कार्यक्षेत्र असलेल्या व यंदा स्थापनेची २५ वर्ष पूर्ण करणार्‍या विश्‍वासपात्र सत्यजित अर्बन संस्थेच्या वतीने दिला जाणारा मानाचा सत्यजित गौरव पुरस्कार यावर्षी येथील मूळ रहिवासी तथा दैनिक तरुण भारत नागपूरचे मुख्य संपादक गजानन श्रीधर निमदेव यांना जाहीर झाला आहे.
सत्यजित अर्बनच्या संचालकांच्या बैठकीमध्ये सन २०१६-१७ वर्षासाठी दिल्या जाणार्‍या सत्यजित पुरस्कारासाठी गजानन निमदेव यांची एकमताने निवड करण्यात आली असून पुरस्काराचे स्वरूप शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व २५ हजार रुपये रोख असल्याचे संस्थेचे अध्यक्ष श्याम उमाळकर यांनी येथे सांगितले.
यावेळी उपाध्यक्ष सुदेश लोढे, कार्यकारी संचालक भूषणभैया देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी घनःश्याम जोशी यांच्यासह बाळासाहेब सावजी, सुरेश मुंदडा, डॉ. गाभणे, पाराशर, डॉ. महाजन, राधाताई उमाळकर, मंगला राजगुरू, सिखवाल, गिरी, निकम उपस्थित होते.
मेहकर येथे जन्मलेले गजानन निमदेव गेल्या ७ वर्षांपासून तरुण भारतचे मुख्य संपादक म्हणून कार्यरत आहेत.
या अगोदर गजानन निमदेव यांनी बुलढाणा जिल्हा नागरिक मंडळ नागपूरचा स्व. शक्तीकुमार संचेती स्मृती पुरस्कार, महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रपिता महात्मा गांधी व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार, ज्येष्ठ नागरी महामंडळ विदर्भ यांचा आप्पासाहेब पाडळकर स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्राप्त केला आहे.
आतापर्यंत संस्थेने साहित्यिक अजिम नवाज राही, ज्ञानाचार्य श्रीभगवान महाराज वरवंड, श्रीहरिचैतन्य स्वामी महाराज पळसखेड आश्रम, अंध व अपंग शाळा बुलढाणा, मेहकरचे तहसीलदार निर्भय जैन अशा विविध क्षेत्रातील व्यक्ती व संस्थांना या पुरस्कारासाठी निवडले आहे. समाजामध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या लोकांची चाचपणी करून संस्था पुरस्कार देते. (तभा वृत्तसेवा)