भटक्यांच्या वस्तीतही आता ‘ए फॉर ऍपल’

0
59

भंडारा, ३१ मार्च 
हातात लेखणी घेऊन पाटीवर अक्षर गिरविण्याचे स्वप्नही कदाचित त्यांनी पाहिले नसावे. वणवण भटकंती अन् मिळेल ते खाऊन दिवस काढणे, हीच दिनचर्या अंगवळणी पडलेल्या भटक्यांची मुले आता पाटीवर अक्षर गिरवीत आश्‍चर्याचा धक्का देत आहेत. ज्या भटक्यांच्या वस्तीमध्ये भांडण, कल्लोेळ ऐकायला यायचा, तेथे आज ‘ए ऑर ऍपल’चे स्वर ऐकू येतात. भटक्यांकडे एक विशिष्ट ‘ग्रह’ करून पाहणार्‍यांसाठी कदाचित हे नवल असेल, मात्र गत अनेक वर्षांपासून भटक्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी धडपडणार्‍यांची ही स्वप्नपूर्तीच म्हणावी लागेल!
‘पालावरची शाळा’ आता केवळ भटक्यांचाच विषय राहिला नसून समाजातील दातृत्वाची ओढ असलेल्यांसाठी जिव्हाळ्याचा झाला आहे. संपूर्ण विदर्भात एकमेव भंडारा विभागात राबविल्या जात असलेल्या या उपक्रमाने भटक्यांनाही शिक्षणाच्या महत्त्वाची जाणीव करून दिली आहे.
शासनाने अनेक प्रयत्न केले. शाळाबाह्य मुले राहू नयेत, यासाठी यंत्रणा राबविली. परंतु यंत्रणेच्या नजरेत भटक्यांची मुले कधीच भरली नाही. गावकुसावर मोकळ्या जागेत बिर्‍हाडं टाकून राहणार्‍या भटक्यांच्या मुलांना शाळेत चला… अशी हाक कदाचितच दिली गेली. परिणामी शाळा, शिक्षण अन् अभ्यास याचा गंधही भटक्यंाना शिवला नाही.
स्थानिक भटके विमुक्त परिषदेने याच भटक्यांना माणूस म्हणून जगता यावे म्हणून प्रयत्न सुरू केले अन् ‘पालावरची शाळा’ आज त्याचे आलेले फळ आहे.
संपूर्ण विदर्भात केवळ भंडारा विभागात म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्यात ही पालावरची शाळा भरविली जात आहे. सकाळ आणि संध्याकाळच्या वेळात भरणार्‍या या शाळेत भटक्या वस्तीमधील अनेक मुले सहभागी होतात.
खेळ, वाचन, मनन, लिखाण अन् बरेच काही येथे शिकविले जाते. म्हणूनच आज भटक्या वस्त्यांमध्येही ‘ए फॉर ऍपल’ चे स्वर एकायला येऊ लागले आहेत.
नित्याने दोन तास भरणारी ही शाळा भटक्या मुलांच्या आयुष्याला दिशा देत असतानाच समाजातील दातृत्वाची जाण असलेले आज अशा शाळांना भेट देऊन मदतीचा हात पुढे करीत आहेत. शालेय तसेच खेळाचे साहित्य, वह्या-पुस्तके आणि इतर आवश्यक गोष्टी या शाळांना मिळू लागल्या आहेत. (तभा वृत्तसेवा)
समाज परिवर्तनाची नांदी : दिलीप चित्रीवेकर
पालावरची शाळा हा उपक्रम भटक्यांची दशा आणि दिशा बदलविणारा आहे. या ना त्या निमित्ताने भटक्यांच्या सुख-दुःखात सहभागी होणार्‍या संघ प्रचारक आणि इतरांच्या संकल्पनेतून पुढे आलेला हा उपक्रम आज भटक्यांचे आयुष्य घडविणारा आहे. पालावरच्या शाळेला समाजातील लोकांकडून मिळणारा प्रतिसाद नक्कीच कौतुकास्पद असल्याचे सांगताना भटक्यांच्या आयुष्यात घडणारे सकारात्मक बदल हे सर्वांच्याच अथक परिश्रमाचे फलीत असल्याची प्रतिक्रिया भटके विमुक्त विकास परिषदेचे विभाग संयोजक दिलीप चित्रीवेकर यांनी दिली.