‘सॉरी’ चालणार नाही, कारवाई होणारच!

ऍमेझॉनला अद्दल घडविण्याबाबत पंतप्रधानांचे संकेत

0
65

नवी दिल्ली, ३१ मार्च 
राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्या आणि चपला ऑनलाईन विक्रीसाठी ठेवल्याच्या प्रकरणी ऍमेझॉनने सॉरी म्हटले असले तरी पंतप्रधान मोदी यांनी संबंधितांवर कडक कारवाई करण्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. दरम्यान, अमेरिका आणि कॅनडातील दूतावासाकडे दस्तावेज पाठवले असून, राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा मुद्दा ऍमेझॉनच्या वरिष्ठांसमोर ठामपणे मांडा, अशा सूचना केल्याचे वृत्त आहे.
ऍमेझॉनने तीन महिन्यांपूर्वी आपल्या संकेतस्थळावर राष्ट्रध्वजाच्या रंगाच्या पायपुसण्या आणि चपला विक्रीसाठी ठेवल्या होत्या. त्यामुळे ऍमेझॉनविरोधात भारतात प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र सरकारनेही ऍमेझॉनची चांगलीच कानउघाडणी केली होती. आता मात्र मोदी सरकारने ऍमेझॉनविरोधात कडक कारवाई करण्याचे संकेत दिले आहे.
राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे कोणतेही उत्पादन ऍमेझॉनच्या कोणत्याही संकेतस्थळावर यापुढे दिसणार नाही, अशी हमीही  भारताने मागितली असल्याचे वृत्त आहे. यापूर्वीही ऍमेझॉनने
भारतीय देवी-देवतांची छायाचित्र छापून काही वस्तूंची विक्री केली होती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. (वृत्तसंस्था)
स्वराज यांचा कडक इशारा
मागील जानेवारी महिन्यात भारतीय राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी ऍमेझॉनला चांगलेच फैलावर धरले होते. अशा उत्पादनांची विक्री तत्काळ न थांबवल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी दिला होती. त्यानंतर ऍमेझॉनने लगेच माफी मागत ही सारी उत्पादने आपल्या साईट्सवरून हटवली होती. मात्र, माफीवरच हे प्रकरण थांबले नसून आता ऍमेझॉनवर कारवाई करण्यासाठी सुषमा स्वराज यांनी आणखी एक पाऊल उचलले असल्याचे समजत आहे.