‘जगदंबा’च्या विद्यार्थ्यांनी साकारली ‘गो कार्ट’

0
54

केवळ दीड लाख खर्च
जालंधरच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत प्रात्यक्षिक
यवतमाळ, ३१ मार्च 
येेथील जगदंबा अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांनी कल्पकता, जिद्द आणि कठोर परिश्रम यांच्या बळावर अत्यंत माफक किंमतीत केवळ दीड लाख रुपयांत ‘गो कार्ट’ या रेसिंग कारची निर्मिती करून जालंधर येथील आंतरराष्ट्रीय स्तरावरील गो कार्ट चॅम्पियनशिपमध्ये पहिल्यांदा सहभाग नोंदवत तिसर्‍या तांत्रिक फेरीपर्यंत मजल मारली.
वेगाने वाहन चालविण्याचा थरार अनुभवण्यासाठी ‘कार रेसिंग’ हा पर्याय असून जागतिक स्तरावर ‘फार्मूला वन’ वेगवान वाहने स्पर्धक चालवितात. त्याचेच छोटे रूप म्हणजे ‘गो कार्ट’ आहे. या गो कार्टचा थरार अनुभव सामान्यांसाठी आर्थिकदृष्ट्या न परवडणारा आहे.
जगदंबा अभियांत्रिकीच्या १९ विद्यार्थ्यांच्या चमूने केवळ दीड लाख रुपये खर्च करून, महाविद्यालयातील उपलब्ध प्रयोगशाळा व यंत्रसामुग्रीचा उपयोग करीत निर्माण केलेले ‘गो कार्ट’ हे रेसिंग वाहन प्रत्यक्षात जालंधरच्या जागतिक स्तरावरील स्पर्धेत उतरवून जागतिक कीर्तीच्या परीक्षकांची वाहवा मिळवली.
गो कार्टच्या निर्माणासाठी विद्यार्थ्यांनी दुचाकीचे इंजिन वापरले असून, चेसीस आणि आकार स्वत:च डिझाईन केला. त्याकरिता त्यांनी कटिया या सॉफ्टवेअरचा उपयोग केला. शक्य तितक्या कमी खर्चात वेगवेगळे पार्ट्‌स जोडून तयार करण्यात आलेले हे वाहन पेट्रोलवरच चालते.
या ‘गो कार्ट’चा अधिकाधिक वेग तासी ८० किमी आहे. हा वेग आणखीही वाढविता येऊ शकतो. पण स्पर्धेच्या नियमावलीनुसार वेगमर्यादा, डिझाईन, इंधन, ग्राऊंड क्लिअरनस या सर्व बाबींवर नियंत्रण ठेवण्यात आले आहे. या सर्वांसाठी विद्यार्थ्यांनी स्वत: अत्याधुनिक ‘ऍन्सीस’ या सॉफ्टवेअरचा वापर केला.
या प्रकल्पास विद्यार्थ्यांनी फोरजा (ऋजठनअ) हे नाव दिले आहे. हा शब्द फ्रेंच भाषेतील असून त्यांचा अर्थ वेगवान असा होतो. या प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानविषयक कौशल्य आत्मसात करून आंतरराष्ट्रीय स्तरावरील बर्‍याच बाबींचा अनुभव घेतला. महाविद्यालयीन प्रशासनाने या प्रकल्पासाठी ९० हजार रुपयांचे अर्थसाहाय्य केले असून उर्वरित रक्कम सहभागी विद्यार्थ्यांनी स्वत: जमा केली आहे.
या गो कार्ट निर्माण प्रक्रियेत अनुज संगावार, कल्पक बाहेकर, आदर्श गवई, सुजय चोरमोडे, रोहित दुबे, अमोल संगावार, सौरभ जयस्वाल, स्वप्निल बाहटकार, प्राजक्ता बर्डे, ऋतिका बुटले, समीर महाजन, ऋत्विक कदम, अक्षय देशमुख, शुभम दुद्दलवार, सौरभ आसटकर, प्रशांत चव्हाण, सौरभ कदम, अक्षय वानखेडे, शुभम पालवे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.
‘गो कार्ट’च्या निर्मितीत महाविद्यालयाचे सचिव डॉ. शीतल वातीले, प्राचार्य डॉ. हेमंत बारडकर, प्रा. स्वप्नील डहाके यांचे मार्गदर्शन लाभले. (तभा वृत्तसेवा)