निराश होऊन रिझर्व्ह बँकेतून परतले नागरिक

0
182

‘निवासी भारतीय’चा अर्थच कळला नाही 
– पाचशे, हजारच्या जुन्या नोटा बदलून मिळाल्याच नाहीत

तभा वृत्तसेवा
नागपूर, ३१ मार्च
पाचशे व एक हजार रुपयांच्या जुन्या नोटा घेऊन मोठ्या आशेने विदर्भातीलच नव्हे तर विदर्भाच्या आजूबाजूच्या इतर राज्यांमधीलही नागरिक नागपुरातील रिझर्व्ह बँकेत पोहोचले होते. मात्र, त्यांना ‘निवासी भारतीय’चा अर्थच न कळल्यामुळे निराश होऊन परतावे लागले. ३१ डिसेंबरच्या आधी भारताबाहेर असलेल्या निवासी भारतीयांना जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेतून बदलवून देण्यात आल्या. मात्र, त्यासाठी ठोस पुरावे व कागदपत्रे सादर करावी लागली.
नागपूरच्या रिझर्व्ह बँकेतून नोटा बदलवून मिळणार, अशी माहिती प्राप्त होताच मोठ्या संख्येने लोकांनी बँकेच्या दिशेने धाव घेतली होती. मोठ्या प्रमाणावर गर्दी झाल्यामुळे या लोकांना रांगेत उभे करण्यात आले होते. मात्र, प्रत्यक्षात नंबर आल्यानंतर निवासी भारतीयाचा मुद्दा समोर येत होता आणि संबंधित व्यक्ती निराश अंत:करणाने परतत होती.
८ नोव्हेंबर २०१६ रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दूरचित्रवाणीवर जाहीर भाषण करून ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्यात येत असल्याची घोषणा केली होती. ज्यांच्याकडे या जुन्या नोटा आहेत त्यांना काही नियम आणि अटींच्या आधारे ३१ मार्च २०१७ पर्यंत त्या बदलवून देण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती. भारतात असलेल्या लोकांना नोटा बदलवून देण्यासाठी प्रत्यक्षात ३१ डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. मात्र, जे निवासी भारतीय ९ नोव्हेंबर ते ३१ डिसेंबर २०१६ या कालावधीत देशाच्या बाहेर होते, त्यांच्यासाठी ही ३१ मार्चपर्यंतची मुदत होती. अशा परिस्थितीत अफवा पसरविली गेली की, ज्यांच्याकडे जुन्या नोटा आहेत त्यांना त्या रिझर्व्ह बँकेतून ३१ मार्चपर्यंत बदलवून मिळणार आहेत. या अफवेमुळे नागपूर शहरच नव्हे तर विदर्भातील इतरही शहरे तसेच लगतच्या मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधीलही लोकांनी नागपुरातील रिझर्व्ह बँकेकडे धाव घेतली होती. यात ग्रामीण भागातील पुरुष व महिलांचा समावेश होता.
भारतीय नागरिकांची नोट बदलीची प्रक्रिया ३१ डिसेंबर २०१६ रोजीच संपली असल्याचे, तसेच केवळ त्या काळात देशाबाहेर असलेल्या निवासी भारतीयांनाच नोटा बदली करून मिळत असल्याचे ज्यावेळी येथे जाहीर करण्यात आले तेव्हा मात्र उपस्थितांना निराश व्हावे लागले.

साखराबाईची व्यथा
नोटा बदली करून मिळणार असल्याची माहिती कानावर पडताच जालना येथील ८० वर्षीय साखराबाई खारे या रिझर्व्ह बँकेत पोहोचल्या होत्या. त्यांच्याकडे जुन्या ५०० व १००० रुपयांच्या नोटांचे ३२ हजार रुपये होते. संजय गांधी निराधार योजनेंतर्गत मिळालेल्या आर्थिक अनुदानातून आपली ही पुंजी जमा केली होती. मुलांनी मला याआधी नोटा बदलीबद्दल सांगितले होते. मात्र मी त्यांना या नोटा बदलवून घेण्यासाठी दिल्या नव्हत्या. आता या नोटा कोणाच्याच कामात येणार नाही. आता मला पश्‍चात्तापाशिवाय अन्य कोणताही पर्याय नाही, असे सांगत त्यांनी आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली होती. दुसरीकडे नागपूरच्या मोहम्मद जुनेद याला सबळ पुरावा नसल्यामुळे पैसे बदलवून मिळाले नाही. तो ३१ डिसेंबरच्या आधी दुबईत होता. मात्र, त्याच्याकडे आवश्यक ती कागदपत्रे नसल्यामुळे त्यालाही निराश व्हावे लागले.

अनिवासी भारतीयांसाठी ३० जूनपर्यंत मुदत
अनिवासी भारतीयांना ५०० आणि १००० रुपयांच्या जुन्या नोटा येत्या ३० जूनपर्यंत बदलवून मिळणार आहेत. या नोटाही बदलवून देताना प्रत्येक व्यक्तीला २५ हजार रुपयांची मुदत राहणार आहे. देशातील मुंबई, दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि नागपूर या पाच ठिकाणच्याच रिझर्व्ह बँकेत या जुन्या नोटा बदलवून मिळणार आहेत. त्यासाठी अनिवासी भारतीयांकडे आवश्यक ती कागदपत्रे असणे गरजेचे आहे व त्यांना नोटा बदलविताना प्रत्यक्ष हजरही राहावे लागणार आहे.