अकोला १ एप्रिल
जिल्ह्यातील पारस औष्णिक विद्युत केंद्रातील दोनपैकी एक संच बंद पडला आहे. बॉयलर ट्यूब लिक झाल्याचे कारण पुढे करत हा संच बंद झाल्याने राज्याला विजेचा पुरवठा कमी होणार आहे. त्याबरोबर चंद्रपूर, भुसावळ येथील विद्युत निर्मिती करणारे संच बंद पडल्याने राज्यातील ग्राहकांना पाच दिवसांपासून अघोषित भारनियमनाला सामोरे जावे लागू शकते.
राज्यात विजेची मागणी २१,५०० मेगावॅटवर पोहोचली आहे. राज्यात विजेचे उत्पादन हे १५ हजार मेगावॅट इतकेच तुर्तास होत असून त्यामुळे राज्यातील काही भागाला अघोषित भारनियमनाचा फटका
ेंयेत्या काही दिवस बसण्याची चिन्हे आहेत.
दरम्यान, परिस्थिती पूर्वपदावर येत असून दोन दिवसात सुरळीत वीज पुरवठा होईल, अशी माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली. पारस येथील युनिट क्रमांक ४ चा २५० मेगावॅट, भुसावळ येथील युनिट क्रमांक २ चा २०० मेगावॅट, चंद्रपूर येथील युनिट क्रमांक ९ ज्याची क्षमता ५०० मेगावॅट आहे, तेे संच विविध कारणांनी बंद आहेत.
जानेवारी महिन्यापासून चंद्रपूरचा युनिट ७ हा सुमारे ५०० मेगावॅट वीज निर्माण करणारा संच टर्बाइन समस्येच्या नावाखाली बंद आहे. कोराडी युनिट क्रमांक पाच, परळीचे दोन युनिटपण बंद आहेत. खाजगी वीज उत्पादकांकडून एक हजार मेगावॅट ऐवजी ५०० ते ६०० मेगावॅट वीज उपलब्ध होत आहे. विजेची वाढलेली मागणी आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेली वीज यात तफावत आहे. त्यामुळे अघोषित भारनियमन करावे लागत आहे.
सध्या राज्यात विजेची तूट ५०० ते ६०० मेगावॅट आहे. महावितरणकडून राज्यात सुरळीत वीजपुरवठा होण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. राज्यातील विजेची स्थिती सुधारण्यास मदत होणार आहे. (तभा वृत्तसेवा)
नागरिकांना फटका…
वातावरणातील उष्मा दिवसेंदिवस वाढत असताना दुसरीकडे शहरासह जिल्ह्यात विजेचे अघोषित भारनियमन सुरू झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अघोषित भारनियमनाचा बोजा वाढल्याने महावितरणच्या कारभाराविरुद्ध संताप व्यक्त करण्यात येत आहे.
गेल्या दोन आठवड्यांपासून पारा ४०-४१ अंशाच्या वर गेल्यामुळे घराघरांत पंखे, कुलर एसीचा वापर वाढला आहे. मात्र अघोषित भारनियमन दुपारच्यावेळीच होत असल्याने नागरिकांच्या मनातील उद्रेकाचा फटका महावितरणला बसण्याची शक्यता आहे.