अयोध्येतील तो काळ अन् तभा

0
110

प्रासंगिक
अयोेध्येच्या रामजन्मभूमीची मोगलांनी बळकावलेली जागा परत मिळविण्यासाठी इतिहासात अनेक आंदोलने झाली आणि लाखो रामभक्तांनी त्यात प्राणाची आहुती दिली. परंतु, स्वातंत्र्यानंतर १९४९ साली प्रथमच अशी स्थिती निर्माण झाली की, रामजन्मभूमीवरील राम बंदिवासात गेला! म्हणजे, बाबरी मशिदीच्या मधल्या गुंबजाखाली रामसीतेची मूर्ती, समोर दाराला भलेमोठे कुलूप, हातात बंदुका घेतलेल्या जवानांचा पहारा. भारतभरातील रामभक्तांनी सुमारे चार दशके याच ‘बंदि’रामाचे दर्शन घेऊनच समाधान मानले होते. या बंदिवासातून रामाची सुटका करण्याचे प्रयत्न न्यायालयीन स्तरावर सुरूच होते. परंतु, लोकभावनेचे प्रकटीकरण मात्र होत नव्हते. विश्‍व हिंदू परिषद, रा. स्व. संघ, आखाड्यांचे महंत आदी हिंदुत्ववादी मंडळी रामजन्मभूमी मुक्ती आंदोलनासाठी प्रयत्नशील जरूर होती. परंतु विषय जनमानसापर्यंत पोहोचत नव्हता. या मोहिमेत ‘तरुण भारत’ने किती मोलाची भूमिका वठविली, त्याची ही आठवण.
१९८५ सालचा उन्हाळा संपून पावसाळा नुकताच सुरू झाला होता. त्याच सुमाराला भारतीय पत्रकार महासंघाचे (इंडियन फेडरेशन ऑफ वर्किंग जर्नालिस्टस्) राष्ट्रीय अधिवेशन फैजाबाद (अयोध्य|चा जिल्हा) येथे ठरले होते. ही संधी असल्याचे फक्त एका माणसाने हेरले. त्यांचे नाव मोरोपंत पिंगळे. ते रा. स्व. संघाचे अ. भा. प्रचारक प्रमुख होते. त्यांनी शोध घेतला, नागपुरातून कोण कोण पत्रकार जाणार. नागपूर श्रमिक पत्रकार संघ हा महासंघाचा देशभरातील प्रमुख घटक होता. महासंघाचे नेते के. विक्रम राव यांचे, नागपूरचे मनोहरराव अंधारे, प्रकाश देशपांडे, राजाभाऊ पोफळी वगैरे मंडळींशी घनिष्ठ संबंध होते. त्याचा वापर करून, देशभरातील पत्रकारांना बंदिस्त राम दिसेल, याची व्यवस्था मोरोपंतांनी करवून घेतली. अधिवेशनाच्या कार्यक्रमात, अयोध्या सहल हा विषयच होता आणि त्यामुळे देशभरातील शेकडो पत्रकारांना बंदिवान रामाचे दर्शन झाले!
तथापि, या विषयावर लेख प्रसिद्ध होणे, हाही महत्त्वाचा मुद्दा होता. ही गोष्ट मोरोपंत फक्त तरुण भारत प्रतिनिधीला हक्काने सांगू शकत होते. मीही अयोध्येला जाणार म्हटल्यावर त्यांनी मला संघ मुख्यालयात बोलावून घेतले, रामजन्मभूमीची पार्श्‍वभूमी मला समजावून सांगितली आणि परतल्यावर सविस्तर लेख लिहिण्याचा ‘आदेश’ दिला. जमल्यास ताजी छायाचित्रे मिळविण्यासही आवर्जून सांगितले. मी आणि आमचे छायाचित्रकार जयंत हरकरे या मोहिमेत यशस्वी झालो, याचा मला आज तीन दशकांनंतरही सार्थ अभिमान आहे आणि रामायणातील खारीचे समाधानही आहे!
ज्या दिवशी आम्ही रामजन्मभूमीला गेलो, तेव्हा सुरक्षारक्षकांचा अक्षरश: गराडा पडला होता. तो संपूर्ण परिसर प्रतिबंधित क्षेत्र ठरवण्यात आला होता. त्यामुळे आत प्रवेश करणे सहजशक्य नव्हते. कडक तपासणी व्हायची. निव्वळ आम्ही लोक पत्रकार असल्यामुळे आम्हाला कॅमेर्‍यांसह आत जाऊ दिले गेले. कोणीही फोटो कढणार नाही, या सूचनेसह. माझ्या आणि हरकरेंच्या मनात मात्र फोटोंचाच विषय घोळत होता. कसे करायचे? यावेळी माझ्या मदतीला धावले माझे तंबाखूचे व्यसन! उत्तरप्रदेशात खैनीचे (तंबाखू-चुना घोटून खाण्याचे) प्रमाण फारच जास्त आहे. तरणे जवान तर खाणारच, हे हेरून मी खिशातून बार काढला आणि मुख्य दारावरील दोन्ही शिपायांना बोलण्यात गुंतवले. तेवढ्यात हरकरेंनी बाबरी मशिदीचे शक्य तेवढे फोटो घेतले. काम फत्ते! थँक्यू टोबॅको!!
नागपूरला परतल्यावर तरुण भारतच्या रविवार पुरवणीत फोटोसह पानभर लेख मी लिहिला. रामजन्मभूमीच्या प्रतिबंधित क्षेत्राचे फोटो तरुण भारतात प्रसिद्ध झाल्याची माहिती सरकारी सूत्रांकडून दिल्लीला पोहोचली. चौकशी करण्यासाठी दोन गुप्तचर अधिकारी नागपुरात आले. तभा कार्यालयात येऊन त्यांनी संपादक दि. भा. उपाख्य मामासाहेब घुमरे यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मामासाहेबांनी दिलेले बाणेदार उत्तर पत्रकारितेची शान वाढविणारेच आहे. हे फोटो कसे मिळाले ते मी न्यायालयातच सांगीन, असे त्यांनी ठणकावले. बिच्चारे गुप्तचर हात हलवत दिल्लीला परत गेले!
माझ्या लेखाच्या आधारे विविध भारतीय भाषांमध्ये बंदिस्त रामाची कथा प्रसिद्ध होईल, याची व्यवस्था मोरोपंतांनी केलीच होती. महिना-दोन महिन्यात हा विषय देशभर चर्चेचा झाला. पुढे जनआंदोलन उभे राहण्यात त्याची मदत झाली, हे वेगळे सांगायला नको. या उपक्रमात तरुण भारतचा हा सहभाग केवळ मोरोपंत पिंगळे यांच्यामुळेच शक्य झाला. रामजन्मभूमी आंदोलनाचे पडद्यामागील खरे सूत्रधार तेच होते. त्यांच्या दूरदृष्टीचे वर्णन ‘योजक: तत्र दुर्लभ:’ असेच करावे लागेल. मोरोपंतांचे स्वप्न लवकर पूर्णत्वास जावो, अशी श्रीरामचरणी प्रार्थना!
– विनोद देशमुख
९८५०५८७६२२