शिष्यवृत्तीच्या आड आली प्रशासकीय वृत्ती

राज्यात १६ लाखांपैकी फक्त ६ लाख विद्यार्थ्यांना लाभ

0
58

विदर्भाचा यातही बॅकलॉगच
प्रमोद नागनाथे
गोंदिया, २ एप्रिल
राज्य शासनाकडून सन २०१६ -१७ या शैक्षणिक वर्षात शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क वाटपासाठी निधीची केंद्र सरकारकडे अपेक्षित मागणीच केली नसल्याने यंदा राज्यातील १६ लाख ९० हजार १२१ विद्यार्थ्यांपैकी फक्त ६ लाख ३२ हजार ५८० हजार विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून १० लाख ५७ हजार ५४१ विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिले आहेत. विदर्भातील विद्यार्थी यातही मोठ्या प्रमाणावर वंचित राहिले.
विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्काची रक्कम अदा करण्यासाठी चालू शैक्षणिक वर्षात केंद्र सरकारकडून ९५७.९२ कोटी तर राज्य शासनाकडून १९७६ कोटी असा २९३४ कोटी रुपयांचा निधी पुरविण्यात आला. दरम्यान यंदा ३० मार्च २०१७ पर्यंत शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्कासाठी राज्यातील १६ लाख ९० हजार १२१ विद्यार्थ्यांनी संबंधित विभागाकडे ऑनलाईन अर्ज सादर केले होते. ज्यापैकी एकूण विद्यार्थ्यांच्या तुलनेत फक्त ३७ टक्के म्हणजे ६ लाख ३२ हजार ५८० विद्यार्थ्यांनाच शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली तर ६३ टक्के म्हणजे १० लाख ५७ हजार ५४१ विद्यार्थी या लाभापासून वंचित राहिले असून वित्त विभागाच्या बिम्स प्रणालीनुसार पाहणी केली असता फक्त ७३ लाख ४९ हजार रुपयाचा निधी शिल्लक असल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे शिष्यवृत्तीच्या नावावर कोट्यावधी रुपयाचा निधी खर्ची झाला असला तरी एवढ्या मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वंचित कसे? प्रशासनाचे दुर्लक्ष हेच यामागील कारण असल्याचे दिसते. नागपूर जिल्ह्यात १ लाख ५३ हजार ६७९ विद्यार्थ्यांपैकी फक्त २४ टक्केच विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची देयके काढण्यात आली. ७६ टक्के विद्यार्थी वंचित राहिलेत. यापाठोपाठ सामाजिक न्याय व विशेष सहाय्यमंत्री राजकुमार बडोले यांच्या गोंदिया जिल्ह्यात ३३ टक्के विद्यार्थीच शिष्यवृत्तीचा लाभ घेवू शकले, याच विभागाचे राज्यमंत्री दिलीप कांबळे यांच्या सोलापूर जिल्ह्यात ५३ टक्के विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली आहे.
२९१६ कोटी ६६ लाख रुपयाचा निधी खर्च
केंद्र व राज्य शासनाकडून राज्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी २९३४ कोटी २४ लाख ५६ हजार रुपयाच्या निधीची तरतुद करण्यात आली असली तरी यंदाचे ६ लाख ३२ हजार ५८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीपोटी १५५५ कोटी २५ लाख रुपयेच वाटण्यात आले. मागील सत्रातील ७ लाख १० हजार ५९विद्यार्थ्यांवर १३६१ कोटी ४१ लाख रुपयाची शिष्यवृत्ती खर्च करण्यात आली असून असे एकूण १३ लाख ४२ हजार ६३९ विद्यार्थ्यांवर २९१६ कोटी ६६ लाख रुपयाची शिष्यवृत्ती खर्ची घालण्यात आली आहे.
पावणे तीन लाख विद्यार्थ्यांच्याच खात्यात रक्कम जमा
शिष्यवृत्ती वाटपाची आकडेवारी पाहता यंदा ६ लाख ३२ हजार ५८० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वाटप करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात १६ टक्के म्हणजे २ लाख ७९ हजार १७३ विद्यार्थ्यांच्याच खात्यात रक्कम जमा करण्यात आली असल्याचे वास्तव आहे.